Home अंगण हणजुणचे अग्निकांड

हणजुणचे अग्निकांड

0
  • गुरुदास सावळ

हणजुण येथील अग्निकांडात यमराजाने थैमान घालून 25 निरपराध, निष्पाप लोकांचा बळी घेतल्याने गोवा सरकार आणि प्रशासनाची लक्तरे देशभर वेशीवर टांगली गेली आहेत. सदर नाईट क्लबकडे जानेवारी 2024 पासून म्हणजे गेली तब्बल दोन वर्षे कोणताही परवाना नव्हता. हे अग्नितांडव घडल्यानंतर सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीने काम सुरू करताच गोव्यातील सर्वच नाईट क्लब बेकायदा असल्याचे उघडकीस आले. एखाद्या क्लबमध्ये आग लागली तर सुरक्षाव्यवस्था नाही, मग अग्निशामक दलाच्या अनेक अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पदकांनी गौरविण्यात आले ते कशासाठी? हणजुणचे अग्निकांड गेले 15 दिवस गाजत आहे. चौकशी चालू आहे. पण पुढे काय? काही होणार आहे की…?

शनिवार 6 डिसेंबरची रात्र. नेहमीप्रमाणे मोबाईल घेऊन दिवसभरात आलेले व्हॉट्सॲपवरील संदेश वाचून उत्तरे देत होतो. एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रात्रीचे सव्वाबारा वाजले होते. ‘एवढ्या रात्री कोण फोन करतोय’ असे म्हणत फोन बघितला तर पोलिस खात्यातील एका जुन्या मित्राचे नाव दिसले. ‘हणजुण येथील एका नाईट क्लबला आग लागून 23 लोक मेले!’ पलीकडील व्यक्तीने एका दमात सांगून टाकले. या गोष्टीवर विश्वास न बसल्याने फोन बंद करून यूट्यूब चालू केला तर ब्रेकिंग न्यूज चालू होती. बरोबर व्हिज्युअल्सही चालू होत्या. ‘मानलं या चॅनलवाल्यांना’ असे म्हणत बातमी पाहत राहिलो.
गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात आजवर घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे, असे नमूद करीत असतानाच मृतांची संख्या 25 असल्याचे सांगण्यात आले. नाईट क्लबमध्ये आग म्हणजे मेलेले लोक पर्यटक असणार, आणि भरपूर दारू ढोसलेली असल्याने स्वतःला वाचवू शकले नसणार, असा विचार मनात आला. प्रत्यक्षात आगीत बळी पडलेल्या 25 लोकांपैकी केवळ चौघेच पर्यटक होते व उरलेले 21 जण नाईट क्लबचे कर्मचारी होते, हे ऐकून आणखीन एक जबरदस्त धक्का बसला. आग लागताच या कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मागच्या दाराने क्लबमधून जीवाच्या आकांताने प्रयत्न केला. तो दरवाजा बाहेरून बंद होता, त्यामुळे हे कर्मचारी तळघरातील स्वयंपाकघरात गेले आणि गुदमरून मेले. मागचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला आहे याची कल्पना असती तर जीव वाचविण्यासाठी हे कर्मचारी तळघरात गेलेच नसते. त्यामुळे ज्या कोणी त्या दाराला बाहेरून कडी लावली होती त्याला या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला प्रामुख्याने जबाबदार धरले पाहिजे.
ही रडकथा आहे हणजुण येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’ या नाईट क्लबची. ‘नाईट क्लब’ या शब्दाची कोणतीही व्याख्या गोवा सरकारच्या कोणत्याही कायदा किंवा नियमावलीत नाही. त्यामुळे गोवा सरकारचे कोणतेही खाते नाईट क्लब चालविण्यासाठी परवाना देऊच शकत नाही. नाईट क्लबला परवाना देण्याची तरतूदच जर सरकारच्या कायदा पुस्तकात नसेल तर सदर नाईट क्लब बेकायदा आहे, असा दावा सरकार कोणत्या कायद्याखाली करू शकते?
‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’ दुर्घटनेत तब्बल 25 निष्पाप लोकांचा बळी गेल्याने केवळ गोवाच नव्हे तर भारताच्या राष्ट्रपती- पंतप्रधानांपासून सारा देश हादरला. या राष्ट्रीय महनीय व्यक्तींपासून हणजुणमधील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना अतीव दुःख झाले. दु:ख झाले नाही ते फक्त सौरभ व गौरव लुथरा या दोन बंधूंना! हो, हे दिल्लीस्थित दोन बंधू या बेकायदेशीर आणि वादग्रस्त नाईट क्लबचे मालक आहेत. आपले 21 कर्मचारी आणि 4 अतिथी आगीत होरपळून आणि आगीच्या धुरात गुदमरून मृत्युमुखी पडलेले असताना या दोघांनी गोव्यात येऊन मृत लोकांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे सोडून संभाव्य अटक टाळण्यासाठी विदेशात पलायन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानी ही दुर्दैवी घटना पडताच ते व्याकूळ झाले. झोपमोड झालेली असतानाही त्यांनी तातडीने दुर्घटनास्थळ गाठले. ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’ या आगीत जळून भस्मसात झालेल्या, मिठागारात उभ्या असलेल्या वास्तूची प्रत्यक्ष पाहणी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. डॉ. सावंत यांच्या जागी इतर कोणी मुख्यमंत्री असता तर मध्यरात्री घटनास्थळी जाणे कदाचित त्याने टाळले असते. मुख्य सचिव व पोलिसप्रमुखांना वायरलेसद्वारे आदेश देऊन भर थंडीत वातानुकूलित खोलीत आरामशीर झोपले असते. पण माणुसकी नावाची एक चीज असते. ते गेली 6 वर्षे मुख्यमंत्री असूनही माणुसकी अजून शिल्लक आहे. त्यामुळेच रस्त्यावर एखादा अपघात दिसला तर आपला मोटारींचा ताफा ते थांबवितात. मोटारीतून स्वतः खाली उतरून सूचना देतात. एकदा तर जुवारी पुलावर एक दुचाकीस्वार तरुणी अपघातग्रस्त झाली असता मुख्यमंत्र्यांनी तिची वैद्यकीय तपासणीही केली होती. मुख्यमंत्री झोपमोड करून हणजुणला मध्यरात्री धावतात आणि ही अमीर पोरं अटक झाल्यास थंडगार फरशीवर कुडकुडत झोपावे लागणार म्हणून अटक चुकविण्यासाठी थायलंडला पलायन करतात. त्यांना व्हिसा मिळाला असता तर विजय मल्ल्या व नीरव मोदी यांच्याप्रमाणे तेही भारतीय पोलिसांच्या हाती कधीच लागले नसते. हे प्रकरण राष्ट्रपती व पंतप्रधानांपर्यंत पोचले नसते तर कोणी सांगावे, गौवर व सौरभ लुथरा बधूंनी गोव्यातील विकावू सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणेच परराष्ट्र मंत्रालय अधिकाऱ्यांनाही विकत घेऊन आपले पासपोर्ट वाचविले असते. पण पासपोर्ट रद्द झाल्याने त्यांची हद्दपारी अपरिहार्य ठरली. कायदेशीर अडचणी निर्माण करण्यासाठी भारतीय वकिलांची एक टीम बँकॉकला पोचली होती पण त्यांची डाळ शिजली नाही.

तब्बल 10 दिवसांच्या अनिश्चिततेनंतर मंगळवार दि. 16 डिसेंबरला लुथरा बंधूंना ‘सीबीआय’कडे सुपूर्द करण्यात आले आणि या 25 लोकांच्या हत्याऱ्यांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्यंत कडक सुरक्षेत त्यांचे आगमन झाले. ट्रान्झिट रिमांडवर त्यांना गोव्यात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना रिमांडसाठी म्हापसा न्यायालयात उभे करण्यात आले. सौरभ व गौरव हे आजारी असल्याने त्यांना पोलिस कोठडीत जमिनीवर आरामात झोपण्यासाठी फोमच्या विशेष गाद्या आणि कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी विशेष ब्लँकेट वापरण्याची सवलत मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांच्या वकिलांनी केली. सरकारी इस्पितळात तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे नमूद केले आहे, ही गोष्ट सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. हे दोघेजण आजारी आहेत, त्यांची प्रकृती गंभीर आहे तर दिल्लीत वैद्यकीय उपचार घेण्याचे सोडून ते विदेशात का गेले, असा मुद्दा सरकारी वकिलांनी उपस्थित केला तेव्हा लुथरा बंधूंचा वकील निरुत्तर झाला. मात्र आपले अशील आजारी आहेतच, असा आग्रहच लुथरा बंधूंच्या वकिलांनी धरल्याने त्या दोघा बंधूंची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. या दोघांनी आपले आरोग्य बरोबर नाही असे दाखवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण वैद्यकीय तपासणीत तशी कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे या संशयित आरोपींच्या दबावाला बळी न पडता त्या दोघांचीही तब्येत ठणठणीत असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला. या दोघा संशयित आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळवायची असल्याने किमान 10 दिवस पोलिस कोठडी मंजूर करावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती. मात्र पोलिस चौकशीत आपले अशील संपूर्ण सहकार्य करतील असे स्पष्ट आश्वासन त्यांच्या वकिलांनी दिल्याने न्यायालयाने लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली, तसेच पोलिस कोठडीत असताना कोणत्याही विशेष सवलती देण्यास नकार दिला.

गेले चार दिवस लुथरा बंधूंची पोलिस कोठडीत चौकशी चालू आहे, पण पोलिसांच्या हाताला काहीच लागलेले नाही. आम्ही फक्त मालक होतो, नाईट क्लबचा सर्व व्यवहार, कारभार, व्यवस्थापन गोव्यातील आमचे सरव्यवस्थापक व इतर व्यवस्थापकच पाहत होते, एवढीच माहिती आतापर्यंत पोलिसांंच्या हाती आली आहे.
अर्थात, आतापर्यंत कोणतीही महत्त्वाची व उपयुक्त माहिती पोलिस वदवून घेऊ शकलेले नाहीत. लुथरा बंधू एखाद्या सराईत व निर्ढावलेल्या गुंडाप्रमाणे वागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे संशयित आरोपी पोलिस चौकशीत कोणतेही सहकार्य करत नाहीत, याचा पाढा न्यायालयासमोर वाचून आणखी पाच दिवस पोलिस कोठडी मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांना करावा लागेल. तरीही लुथरा बांधूंनी तोंड न उघडल्यास त्यांना पोलिसी खाक्या दाखवावाच लागेल, असे काही कनिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.

हणजुण येथील या अग्निकांडात यमराजाने थैमान घालून 25 निरपराध, निष्पाप लोकांचा बळी घेतल्याने गोवा सरकार आणि प्रशासनाची लक्तरे देशभर वेशीवर टांगली गेली आहेत. सदर नाईट क्लबकडे जानेवारी 2024 पासून म्हणजे गेली तब्बल दोन वर्षे कोणताही परवानाच नव्हता. सदर क्लब बेकायदा असल्याने तो पाडण्याची नोटीस हणजुण ग्रामपंचायतीने बजावली होती; मात्र पंचायत संचालकांनी त्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर या प्रकरणी अनेक वेळा सुनावणी ठेवली होती, पण सरपंच एकदाही उपस्थित राहिले नाहीत. पंचायत संचालकांनीही या स्थगिती आदेशावर पुढे कोणतीही कारवाई केली नाही. 2-3 वेळा झालेल्या या सुनावणीला सरपंच गैरहजर का राहिले हे फक्त सरपंचच सांगू शकतील. हणजुण पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले तर लोकांनी मोर्चा आणून त्यांची सुटका केली. या प्रकरणात पंचायत सचिवांना पोलिसांनी बोलावले तर त्यांनी अंतरिम जामीन अर्ज करून हे प्रकरण रखडत ठेवले आहे.
हणजुण नाईट क्लब अग्नितांडव घडल्यानंतर सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीने काम सुरू करताच गोव्यातील सर्वच नाईट क्लब बेकायदा असल्याचे उघडकीस आले. एखाद्या क्लबमध्ये आग लागली तर सुरक्षाव्यवस्था नाही, मग अग्निशामक दलाच्या अनेक अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पदकांनी गौरविण्यात आले ते कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.
हणजुण अग्निकांड गेले 15 दिवस गाजत आहे. चौकशी चालू आहे. पण पुढे काय…? काहीच होणार नाही!