स्वीस बँकेत ११९५ भारतीयांची खाती

0
99

काळ्या पैशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
जिनिव्हातील एचएसबीसी बँकेच्या गोपनीय खातेदारांची एक यादी प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणली असून त्यात ११९५ भारतीयांची नावे आहेत. त्यांच्या खात्यांमध्ये वर्ष २००६-०७ अखेरीस पंचवीस हजार कोटी रूपये होते असे तपासात आढळून आले आहे. यापैकी किती खातेदारांनी करबुडवेगिरी केली याचा शोध घेण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारवर आली आहे.एचएसबीसीच्या स्वीस शाखेतील खातेदारांच्या या यादीतील भारतीयांमध्ये मुकेश अंबानी, अनिल अंबानी, यशोवर्धन बिर्ला यांच्यासारखे आघाडीचे उद्योगपती, नारायण राणे, परिणत कौर यांच्यासारखे राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे, तसेच अनेक हिरे व्यापारी व विदेशस्थ भारतीयांचा समावेश आहे. एका गोमंतकीय बड्या उद्योगपतीच्या पत्नीचे नावही या यादीत आहे, असा दावा या वृत्ताचा गौप्यस्फोट करणार्‍या ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकाने केला आहे.
एकूण २०३ देशांतील एक लाखांहून अधिक जणांची एचएसबीसीच्या जिनिव्हा शाखेत गोपनीय खाती होती असे उघड झाले असून त्यांची तेथे साठवलेली एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीमध्ये १,६८८ भारतीय खातेदारांची नावे असून त्यापैकी काही नावे दोनवेळा आली आहेत, काही पाकिस्तानात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे ती नावे वगळल्यावर ११९५ भारतीय खातेदारांची खाती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पॅरीसच्या ली मॉंदे या दैनिकाच्या पत्रकाराला फ्रान्स सरकारमधील स्त्रोताकडून ही यादी मिळाली होती. त्यानंतर वॉशिंग्टनमधील इंटरनॅशनल कन्झॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्टस्‌ची त्या दैनिकाने या माहितीच्या विश्लेषणासाठी मदत घेतली. या संस्थेने जगभरातील ४५ देशांंतील १४० पत्रकारांशी या तपासासंदर्भात करार केला. भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राच्या रितू सरीन यांनाही त्याअंतर्गत करारबद्ध करण्यात आले. या पत्रकारांच्या समूहाने तीन महिने संशोधन करून या खातेदारांविषयी अधिक माहिती मिळवली.
यापूर्वी फ्रान्स सरकारने भारताच्या हाती ६२८ स्वीस खातेदारांची नावांची यादी सोपविली होती. त्या यादीतील अनेक नावे या नव्या यादीतही आहेत, त्याच बरोबर अनेक नवी नावेही या यादीत आढळून आली आहेत.
ही सगळी यादी काळापैसेवाल्यांचीच असेल असे म्हणता येणार नाही, कारण काही खातेदारांनी आपल्या या खात्यांची माहिती सरकारला दिलेली असू शकते असे ‘इंडियन एक्स्प्रेस’ ने यासंदर्भातील वृत्त देताना म्हटले आहे.
एचएसबीसी ही खासगी स्वीस बँक असून आपण आता आपल्या ग्राहकांना नवे निकष लावीत असून जुन्या खातेदारांपैकी ७० टक्के खातेदारांनी आपली खाती बंद केली आहेत असा दावा बँकेने केला आहे.
ज्या भारतीयांचे खाते या स्वीस बँकेत असल्याचे आढळले आहे, त्यापैकी किमान २७६ खातेदारांच्या खात्यात किमान १० लाख डॉलरची रक्कम आढळून आली आहे. यापैकी ८५ भारतात राहतात. लंडनमधील प्रख्यात उद्योगपती स्वराज पॉल यांच्या खात्यात ३८६ दशलक्ष डॉलर एवढी सर्वाधिक रक्कम आढळली असून सर्वांत कमी रक्कम गुजरातमध्ये जन्मलेले ब्रिटीश नागरिक नमन मलीक यांच्या खात्यात असल्याचेही ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
नोव्हेंबर २०१२ मध्ये आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काळा पैसेवाल्यांची एक यादी जाहीर केली होती. त्यापैकी अनेक नावेही या नव्या यादीत आहेत.
फ्रान्स सरकारने यापूर्वी जी यादी भारताच्या हवाली सुपूर्द केली होती, त्या खातेदारांकडून एकूण ३,१५० कोटी रुपये अघोषित संपत्तीवर कर आकारण्यात आला आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. २०० खात्यांमध्ये काहीही रक्कम आढळली नाही व २११ जण हे विदेशस्थ भारतीय आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.