ताप : मोठ्या आजाराचे छोटे लक्षण!

0
1871

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
साधारणपणे वर्षाला एकदा-दोनदा ताप आला तर नेहमीचेच वाटते. ताप, खोकला, नाक गळणे वर्षाला एकदा तरी यायलाच हवे, असे कित्येकांना वाटते. वर्षाकाठी एकदातरी नाक गळून गेल्याने बरे वाटते. मी ना त्या डॉक्टरकडे गेलेले… नाक भसाभसा गळत होते. मी म्हटले, ‘नाक गळणे चालूच ठेवा!’ पण डॉक्टर कुठले ऐकतात. त्यांच्या औषधांनी नाक, घसा सगळे सुजून गेले! हे असे नसते. नाक गळणे म्हणजे तुम्हांला कोणता तरी आजार झालाय. तेव्हा त्या आजारावरती योग्य तो उपचार करायला नको?त्या दिवशी मालतीबाई दवाखान्यात आल्या. त्यांना चार दिवस ताप येत होता. आल्या आल्या त्यांनी विचारले, ‘‘रोजचाच आजार झालाय हो आपल्याला?’’ मी त्यावर उत्तर देऊ शकलो नाही. कारण पहिल्याच दिवशी तो ताप रोजचाच हे सांगायला मी काही ‘ब्रह्मदेव’ नाही. असो. पूर्वरंग झाला, आता कथानकाकडे वळणे योग्य ठरेल.
ताप हे लक्षण साधेसुधे नव्हे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आजकाल तापावर डॉक्टर तर शेकडो गोळ्या देतात. इलाजाविषयी रुग्णाला विचारले तर तो म्हणतो, मी ऍनासीन, ऍक्शन ५००, क्रोसीन वगैरे गोळ्या घेतल्या. गोळ्या फक्त ‘पॅरासेटामॉल’च घ्या. बाकी सर्वकाही डॉक्टरी सल्ल्यानुसार करा. केव्हा केव्हा चुकीच्या गोळ्या घेतल्याने ताप बाजूला राहतो व वेगळाच आजार बळावतो. तेव्हा डॉक्टरी सल्ल्यानुसारच गोळ्या घ्या.
तापाचे प्रकार :
१) अंगमोडून येणारा ताप.
२) थंडी वाजत हुडहुडी भरत येणारा ताप.
३) अंगावर शिरशिरी मारत येणारा ताप.
४) दिवसाच्या अमुक वेळेवर येणारा ताप.
५) किंचित थकवा येत येणारा ताप.
६) जखमेला पूं भरून येणारा ताप.
७) जांघेवर फुगवटा येऊन येणारा ताप.
८) अंगावर पुरळ उठून येणारा ताप वगैरे.
वर्षाच्या अमुक महिन्यात म्हणजे जास्त करून मार्च, एप्रिल, मे महिन्यांत तापमान जंतूचा विस्तार होण्यास चांगले असते. या महिन्यांत कित्येक प्रकारचे ताप फैलावतात. त्यात व्हायरल, घशाचे, नाकाचे आजार, गोवर, चिकनपॉक्स, सर्दी वगैरे आजार बळावतात.
गोव्यात तर लोक सर्रास तापावर गोळ्याच खाणे पसंत करतात. वॉट्‌सऍपवर तर तर सध्या प्रत्येकजण डॉक्टरच झालाय. एकटा तर उपचार डाउनलोड करून प्रत्येकाला पाठवतो. मी त्याला विचारले, ‘‘अरे बाबा, असा आमच्या पोटावर पाय का ठेवतोय?’’ थोडी मस्करी केली. हे घरगुती उपचार तर प्रत्येकजण करतो. तुम्हीही करा. ऍलोपॅथी डॉक्टर रोगावर उपचार करतो, होमिओपॅथी डॉक्टर काढे देतो… शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतो. काहीही करा, पण स्वतःस जपा. घरगुती उपचार किती दिवस करावेत. खोकल्यावर सुंठ, तुलसी, कांदा, लसूण वगैरे घ्या; पण घेत राहू नका. ताप साधाही असू शकतो व भयंकरही… तेव्हा भयंकर तापावर हे घरगुती उपाय करणे बरोबर होणार नाही… ते चुकेचे होईल. सांभाळा हं!
तर तापाच्या प्रकारावरून आम्ही तापाचा उगम जाणून घेऊया.
१) अंग मोडून येणारा ताप –
वर्षाकाठी अमुकच महिन्यात येणारा ताप हा जास्त व्हायरलच असतो. तापाबरोबर अंग मोडणे, नाक गळणे, घसा खवखवणे, दुखणे, डोकेदुखी ही सगळी लक्षणे त्याबरोबर आलीच. साधारणपणे हा ताप तीन-चार दिवस टिकतो. माणसाच्या प्रतिकारशक्तीप्रमाणे तो ताप निघून जातो. जाताना पेशंटला चक्कर, थकवा, मरगळ देऊन जातो. जर नुसती प्रतिकारशक्ती कमी असली तर त्या तापाबरोबर इन्फेक्शनही येते. खोक पिवळी होते, थुंकीतून जाड पिवसळ खोक जाणे हे लक्षण बरोबर नव्हे… खोकल्याबरोबर काही वेळा रक्तही पडते… सावधान! आजार फुप्फुसामध्ये पसरलेला आहे. न्यूमोनिया, फ्लारसी होऊ शकते… योग्य तो उपचार करा. अंग मोडून येणार्‍या तापाबरोबर तोंडाची चव जाते. सात्त्विक आहार घेणे गरजेचे आहे. कित्येक वेळा गोवेकरी काढा करतात. पेजच जेवतात. तसे करू नका. चांगल्या फळांनी भरलेला सात्त्विक आहार घ्या. विश्रांती घेणे जरुरी आहे.
२) थंडी, हुडहुडी येत भरणारा ताप –
तापाबरोबर येणारी हुडहुडी वाजणारी थंडी ही लक्षणे थोड्याच आजारात दिसून येतात. रोग्याला बघितल्यावर रोगाचे मूळ लक्षात येते. हे रोग मलेरिया, टायफाईड, लघवीचे आजार असू शकतात. तेव्हा लवकरात लवकर मलेरियाकरता रक्ततपासणी व लघवी तपासून घेणे महत्त्वाचे व तातडीने घेणे गरजेचे आहे. त्यात वयोवृद्ध व लहान बालकांसाठी मलेरिया घातक ठरू शकतो. याबाबत घरगुती उपाय करणे अयोग्य ठरेल.
३) अंगावर काटा येत येणारा ताप –
संध्याकाळी थंडी वाजत अंगावर काटा येत येणारा थंड ताप हे कदाचित टी. बी.चे लक्षण असू शकते. या तापाबरोबर पुष्कळ दिवस येत असलेला खोकला हेही एक लक्षण असते. तेव्हा पुष्कळ दिवस जर खोकला औषधाने जात नसेल तर तो आजार टी. बी.चाही असू शकतो.
४) अमुक वेळेवर येणारा ताप –
केव्हा केव्हा रोगी तुम्हांला आपला रोग दाखवत असतो. जर दिवसाच्या अमुक वेळेत येणारा ताप असेल तर हमखास समजावे तो टायफाईड असू शकतो. तेव्हा रक्ततपासणी करून घ्या. तापाच्या चार दिवसानंतरच टायफाईडची रक्ततपासणी करून घेणे योग्य ठरेल. कारण तेव्हाच रोगाचे निदान करणे किंवा रक्ततपासणी पॉझिटिव्ह येईल. त्यासाठी चार दिवस थांबायला हवे! पेशंट केव्हा केव्हा एक दिवसपण थांबायला तयार नसतात.
५) किंचित थकवा येत येणारा ताप –
हा ताप थोडा वेगळा समजायचा. थोडाच ताप, पण कित्येक दिवस येणारा ताप… रक्ताशय किंवा रक्ताचा कॅन्सर होऊ शकतो. सावध रहा.
६) जखमेबरोबर येणारा ताप –
शरीराच्या कोणत्याही भागावर जर जखमी झाली असेल, त्यात पु भरलेला असेल तर समजा तुमच्या शरीरात पानिपतची जोरादार लढाई चालू आहे व मोक्याच्या ठिकाणी ती चालू आहे. ते जखमेच्यावर जांघेला, काखेला उठलेला फुगवटा हे निश्‍चित सांगतो. डॉक्टरी सल्ला घ्या. योग्य उपचार करा. ह्या तापातही हुडहुडी भरते – कडाडून ताप येतो.
७) अंगावर पुरळ उठून येणारा ताप –
केव्हा केव्हा पेशंटला सणकून ताप येतो. डोके जड होते. मात्र, तापाचे कारण समजत नाही. पेशंटला लवकरात लवकर बरे व्हायचे असते; पण निदान होत नाही. चांगले चार-पाच दिवस ताप येतो. रक्ताच्या तपासणीचे निकष हाती येतात – सर्व ठीक. पण ताप चालूच असतो. रोगी दिवसाआड डॉक्टर बदलत राहतो. शेवटी अंगावर पुरळ उठतो. गोवर, चिकनपॉक्स, जर्मनमिसळचे ते पुरळ असतात. तेव्हा तो ताप कमी होईपर्यंत रोगी व त्याचबरोबर डॉक्टरांचाही नाच चालू असतो. तेव्हा डॉक्टरी सल्ल्यानुसार वागा. उगाचच दिवसाआड डॉक्टर बदलून काहीही होणार नाही. फक्त मानसिक थकवा मात्र वाढीस लागणार.
आणखीही वेगवेगळ्या प्रकारचे ताप वेगवेगळ्या आजारात आपल्याला दिसून येतात. त्यावर काही न बोलता नेहमी आढळणारे ताप व त्यावर चिंता करणे महत्त्वाचे ठरावे. बाकी फी घेणार्‍या त्या डॉक्टरांवर विश्‍वास दाखवत सोडावे.
शेवटी सारांश लिहिताना मी एवढेच म्हणेन की, ताप कोणताही असला तरी एक दिवसभर त्यावर घरगुती किंवा डॉक्टरांकडून मिळणार्‍या गोळ्यांनी उपचार करू नका.
ज्येष्ठ नागरिक व बालक यांच्यावर लवकरात लवकर चांगले उपचार करून घ्या.
आमच्या गोव्यात विमानातून बाहेरच्या जगतातून रोग यायला लागलेत व ते येणारच! पूर्वी आम्ही म्हणायचो, पंचविसाव्या मजल्यावर येणारे डास लिफ्टीतून वर यायला लागलेत – तेव्हा स्वतःला जपा, काळजी घ्या.
त्या दिवशी पुरोहित भेटले. मी म्हटले पुढे काय – दिसला नाहीत! ते म्हणाले – तुमचे ते पेपरवर दर मंगळवारी येणारे लेख वाचतो व त्यावर कृती करतो. आता बरे आहे! आजार पळाले. आता मलाही पळावे लागेल. कारण पेशंट कमी झालेत असे म्हणत माझे सहकारी डॉक्टरांचा मोर्चा बहुधा आमच्याच घरावर चालत येतोय! बरे तर मंडळी, स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका!