स्वमग्नता (अणढखडच) भाग – १

0
527
  • वृंदा मोये
    (संचालक- आनंद निकेतन, म्हापसा)

ऑटिझम असलेली मुलं काही गोष्टी उत्तमरीत्या करू शकतात. एखाद्या कठीण इंग्लिश शब्दाचं स्पेलिंग सांगणं, कोडी सोडवणं, अनेक गाणी चालीसकट पाठ असणं, एखाद्या दिवशी कोणता वार, कोणती तारीख, कोणता महिना हे न शिकवता पटापट सांगतात.

विशेष मुलांची शाळा असल्याकारणाने प्रवेश घ्यायला येणार्‍या पालकांना आम्ही कधीही परत पाठवत नाही. याचं कारण स्पेशल स्कूल म्हटल्यावर आपल्या मुलांच्या वर्तनात इथे काहीतरी सकारात्मक बदल घडेल अशी आशा ठेवून हे पालक निराश आणि खचलेल्या अवस्थेत आमच्याकडे आलेले असतात याची पूर्ण जाणीव आम्हाला ठेवावीच लागते. कारण या मुलांना स्पेशल स्कूलशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो. फक्त आवश्यक असलेली कागदंपत्रं बघूनच मुलांना प्रवेश देण्यात येतो.

एक दिवस अशीच… शाळेचं काही काम हातावेगळं करूया म्हणून मी ऑफिसमध्ये बसले होते. तेवढ्यात शाळेतील शिपाई कर्मचारी आत येऊन म्हणाला, ‘‘मॅडम, बाहेर आपल्याला भेटायला कोणी आलं आहे. त्यांच्यासोबत एक मुलगादेखील आहे.’’
‘‘त्यांना आत पाठव’’, म्हणून मी शिपायाला सांगितलं. थोड्याच वेळात एक मध्यवयीन जोडपं आणि त्यांच्यासोबत एक- अगदी उंच, शिडशिडीत बांध्याचा, कुरळ्या केसांचा, नजर सतत भिरभिरती, चेहर्‍यावर मिश्कील हास्य, दिसायला अगदी नॉर्मल, स्वस्थ असा तो मुलगा होता. आईवडिलांना ‘बसा’ म्हणून सांगण्याचा अवकाश इतक्यात पाठीमागून त्यांचा मुलगा धावत आला आणि खुर्चीचा आधार घेऊन माझ्या टेबलवर चढला आणि हसायलाच लागला. हा सगळा प्रकार बघून मी पुरती भांबावून गेले. भीतीने माझी गाळणच उडाली. कारण एखाद्या मुलाची अशी ही वागणूक मी पहिल्यांदाच बघत होते. काय करावं, क्षणभर काही सुचेना. त्या मुलावर चिडणं किंवा ओरडणं- हा त्यावरचा मार्गच नव्हता. त्याचे आई, वडील दोघंही गडबडले. आपल्या परीनं त्याला खाली उतर म्हणून सांगण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो ऐकेना. मीही थोडा वेळ त्याला तसाच राहू दिला व माझी सगळी कागदंपत्रं बाजूला केली आणि त्या मुलाच्या आईवडिलांना बाजूला बोलावून घेतले. थोड्या वेळाने वडलांनी त्या मुलाची समजूत काढून त्याला खाली उतरवलं.

त्यानंतर त्यांनी आपली व्यथा मला सांगायला सुरुवात केली. वडील पेशाने वकील तर आई डॉक्टर! दोघेही देवभक्त. त्यांच्या बोलण्यातूनच ते श्रद्धाळू असल्याचं शब्दाशब्दाला जाणवत होतं. त्या वात्सल्यमूर्ती आईच्या डोळ्यातून तर सतत अश्रूंच्या धारा ओघळत होत्या. तिला शब्दही फुटत नव्हते. खूप खचलेली अन् निराश वाटत होती ती. तिच्याकडे बघून मीही थोडा वेळ भावनावश झाले. परंतु क्षणात स्वतःला सावरलं आणि धैर्य एकवटून तिला धीर दिला आणि नेमकं काय झालंय हे कळल्याशिवाय आम्ही काहीही करू शकणार नाही याचा विश्‍वास दाखवला आणि शांत होण्यास तिला थोडा वेळ दिला.

आमचा मंदार ‘स्वमग्नते’(ऑटिझम)ने ग्रासलेला असल्याचे त्यांनी सांगितले. ही ऑटिस्टिक मुलं स्वतःच्याच विश्‍वात रमणारी, गोल गोल फिरणारी, नजरेस नजर न मिळवणारी अशी काही गुणवैशिष्ट्ये या ऑटिझमच्या मुलांमध्ये असतात याची थोडीफार माहिती मला या शाळेच्या कामात लक्ष घातल्यामुळे कळली होती. त्यानंतर अजून जास्त माहिती मिळावी म्हणून मी या विषयावरील दोन पुस्तकं वाचलीत.
‘ऑटिझम’ म्हणजे स्वतःत गुंतून राहणारी. ‘ऑटोस’ या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘स्वतः’ असा होतो. त्यापासून ऑटिझम हा शब्द आला. ऑटिझमची मुलं बाहेरील जगाशी काहीही संबंध नसल्यासारखी वागतात. खरं म्हणजे आपण साधारण माणसंसुद्धा अनेकदा स्वतःच्या विचारात किंवा आत्ममग्न असतो, समोर एखादी व्यक्ती आली तर आपलं तिच्याकडे दुर्लक्ष होतं. पण हे क्वचित कधीतरी घडतं. इतर वेळेस आपल्याला बाहेरील जगाचं पूर्ण भान असतं. ऑटिझम असलेल्या मुलांच्या मेंदूमध्ये जन्मतःच दोष असतो. पण तो दोष दोन-तीन वर्षानंतर दिसून येतो. मतिमंद मूल जन्मलं तर त्याच्या चेहर्‍यावरील हावभावांमुळे कल्पना येते की ते मूल मतिमंद आहे. परंतु ऑटिस्टिक मुलं दिसायला सर्वसाधारण असतात आणि जरा बोलायला, चालायला लागले की त्यांच्या वेगळ्या वर्तनावरून कळतं की ते मूल ‘ऑटिस्टिक’ आहे. या मुलांना ओळखण्याची काही ठरावीक लक्षणे आहेत…
– ही मुलं नजरेला नजर देत नाहीत.
– ती स्वतःच्याच विश्‍वात रममाण होणारी, एककल्ली असतात.
– समोरची व्यक्ती आणि स्वतः यातला फरक त्यांना समजत नाही म्हणून समोरच्याने विचारलेला प्रश्‍न त्याच शब्दात पुन्हा ही मुलं बोलत राहतात. विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तर त्यांना देता येत नाही.
– ही मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात.
– कारणाशिवाय हवेत हातवारे करत राहणे, विनाकारण हसत राहणे, फिरत राहणार्‍या वस्तूकडे किंवा पंख्याकडे एकटक बघत राहणे.
– या मुलांना भाषेचं ज्ञान नसतं, त्यामुळे योग्यरीत्या ती संभाषण करू शकत नाही.
– इतर मुलांमध्ये ही मुलं मिसळत नाहीत. त्यांना एकटंच राहायला आवडतं.
– रोज ठरावीक गोष्टी करत राहतात आणि यात बदल झाला तर खूप चिडचिड करतात. केलेला बदल त्यांना अजिबात सहन होत नाही.
त्याचबरोबर ऑटिझम असलेली मुलं काही गोष्टी उत्तमरीत्या करू शकतात. एखाद्या कठीण इंग्लिश शब्दाचं स्पेलिंग सांगणं, कोडी सोडवणं, अनेक गाणी चालीसकट पाठ असणं, एखाद्या दिवशी कोणता वार, कोणती तारीख, कोणता महिना हे न शिकवता पटापट सांगतात. पण या गोष्टींचा त्यांच्या वाढीशी किंवा विकासाशी काहीही संबंध नसतो.

पुस्तकात वाचलेली माहिती आणि प्रत्यक्ष मंदारला बघितल्यानंतर माझं मन तीस-पस्तीस वर्षे मागे गेलं. त्या काळात मला वाटतं, पालकांमध्ये किंवा समाजामध्ये अशा डिसऍबिलिटीजच्या संदर्भात हवी तशी जागरुकता नव्हती आणि अशा प्रकारचं एखादं मूल घरात असेल तर त्याला चक्क मनोरुग्ण म्हणून संबोधलं जायचं.

माझ्या माहेरी आमच्या घराशेजारी चार-पाच घरं सोडून एका घरातील चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. त्या घरात एक १०-१२ वर्षांचा मुलगा आम्ही नेहमी बघत होतो. त्याच्या चेहर्‍यावर इतर मुलांसारखे कुठलेही हावभाव दिसत नव्हते. तोंडातून सारखी लाळ गळायची. त्याला बोलताही यायचं नाही. तोंडातून सतत चित्रविचित्र आवाज तो करायचा. दिवसभरात अधूनमधून चाललेली त्याची आरडाओरड आमच्या घरापर्यंत ऐकू यायची. संधी मिळताच रस्त्यावरून कशाही अवस्थेत तो धावत सुटायचा. अनेकवेळा विशिष्ट हातवारे करून काही सांगण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःला तो व्यक्त करू शकत नव्हता. बहुतेकवेळा या मुलाला दोरी बांधून त्याचं टोक बांधलेलं असायचं जेणेकरून तो धावत सुटू नये म्हणून! आजही हे चित्र डोळ्यांसमोर येताक्षणी अंगावर काटा उभा राहिला. त्या मुलालाही अशीच डिसऍबिलिटी होती का? त्या मुलामुळे संपूर्ण कुटुंबावर झालेला परिणाम असे अनेक विचार डोक्यात आले आणि मन सुन्न झालं.
मंदार व त्याचे आईवडिल यांच्याबरोबरच्या पहिल्याच भेटीत मंदारने आम्हाला त्याची पूर्ण वागणूक दाखवली होती. या तासा-दीडतासाच्या अवधीमध्ये मंदार क्षणभरही एका जागी स्वस्थ बसलेला नव्हता. एका वर्गातून दुसर्‍या वर्गात धावणं त्याचं सतत चालू होतं. त्याला बोलता येत नसल्यामुळे आम्हाला त्याच्या अशा धावण्याचा अर्थही लागत नव्हता. मंदारच्या पालकांशी बोलत असताना शिक्षिका व मी, दोघींनाही एक गोष्ट कळून चुकली होती की ज्या शाळेत मंदार आजपर्यंत जात होता, त्या शाळेतून एका छोट्या तक्रारीच्या कारणाने काढून टाकण्यात आलं होतं. त्यावरून त्याची आई जास्तच निराश झाली होती. मानसिकदृष्ट्या ती खचली होती. त्यासाठी ती आम्हाला तिच्या मुलाला आम्ही आमच्या संस्थेत घ्यावं म्हणून विनवणी करत होती.

चेहर्‍यावर कायम गोड हास्य आणि निरागस भाव असलेल्या मंदारकडे पाहून माझ्या मनात आतून एक कळ उठली आणि अशा बिलकुल समज नसलेल्या निष्पाप मुलांना अशा प्रकारची शिक्षा एखाद्या शाळेकडून व्हावी, म्हणजे काय म्हणावं? पण संयम राखत मंदारच्या आईवडलांना सांगितले, ‘‘तुम्ही शांतपणे घरी चला. आम्ही तुमच्या मंदारला नक्की प्रवेश देऊ असं आश्‍वासन दिलं आणि मंदारच्या वडलांना आवश्यक कागदपत्र घेऊन रीतसर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा दोन दिवसांनी शाळेत बोलावलं.

माझ्यासोबत असलेल्या शिक्षिकेने एकाग्रतेचा अभाव असल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळे मंदारला शांत करण्यासाठी त्याच्यामधील या त्रुटीवर सर्वप्रथम मेहनत घ्यावी लागेल असंही सुचवलं होतं. अर्थातच ही एकाग्रता काही लवकर येत नाही. त्यासाठी खूप वेळ लागणार होता. या मुलांनी दहा मि. एका जागी बसून एखाद्या कार्यात स्वतःला गुंतवणं ही सुद्धा आमच्यासाठी या मुलांनी मिळवलेलं एक प्रकारचं यश होतं. प्रत्येक मुलामध्ये हायपरऍक्टिव्हिटीची पातळी वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे अशा प्रत्येक मुलाकडे वेगळं लक्ष द्यावं लागतं. एक शिक्षक- एक विद्यार्थी अशा तत्वावर त्यांना शिकवावं लागतं. हे प्रकरण खूप गंभीर असल्याचं तेव्हाच माझ्या लक्षात आलं. शाळेत येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्यांच्यामधील त्रुटींवरच आम्हाला काम करायचं आहे, अशी पक्की खुणगाठ मनाशी बांधलेली असल्यामुळे आम्ही मंदार व त्याच्या पालकांसाठी हे आव्हान स्वीकारलं. आणि मंदारच्या पालकांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्‍वासन दिलं. अश्रूभरल्या डोळ्यांनी आमचे आभार मानून मंदारचे आईवडील माझ्या सांगण्यानुसार घरी जायला निघाले.
लगेच दोन दिवसांनी मंदार आपल्या वडिलांसोबत बॅग घेऊन शाळेत दाखल झाला. रीतसर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंदार नियमित शाळेत यायला लागला. शाळेतील त्याच्या उपक्रमांविषयी पुढील अंकात पाहू या.
(क्रमशः)