आम आदमी पार्टीने अमेरिकेच्या न्यायीक विभागाने उजेडात आणलेल्या सीडीएम स्मिथ लाच प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे. येत्या तीस दिवसात स्मिथ लाच प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास कामाला सुरूवात करावी, अशी मागणी आपचे राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी केली. भाजप सरकार भ्रष्टाचाराविरोधात कारवाईचा मुद्दा घेऊन पुढे जात आहे. परंतु, या कारवाईबाबत जनतेमध्ये संशयाचे वातावरण आहे. भाजपच्या काळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु, एकाही भ्रष्टाचार प्रकरणाचा अंतिम छडा लागलेला नाही. सरकारची भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई प्रामाणिक आहे का ?, विरोधातील राजकीय लोकांना दबावाखाली ठेवण्यासाठी कारवाई केली जाते ? असे प्रश्न सरचिटणीस पाडगावकर यांनी उपस्थित केले. येत्या तीस दिवसात या लाच प्रकरणी कारवाई न केल्यास आम आदमी पार्टी गप्प बसणार नाही. या प्रकरणाच्या सखोल चौकशी करण्याची मोकळीक द्यावी , अशी माहिती तक्रारदार वाल्मिकी नाईक यांनी दिली. स्मिथ लाच प्रकरणी २०११ -२०१५ या काळातील तत्कालीन मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, बांधकाम खात्याचे अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी नाईक यांनी केली.