मडगाव खूनप्रकरणी दोघांना अटक

0
95

शांतीनगर रावणफोंड येथील गुदिनो बारमध्ये गोळी घालून अब्दुल कादर याचा खून केल्याप्रकरणी फरारी असलेल्या फैयाज खतीब (३६) याच्यासह पिस्तुल बाळगणार्‍या अकबर शेख (२८) या दोघांना मडगाव पोलिसांनी काल अटक केली. फैय्याज खतीब पर्वरी येथील सासर्‍याच्या घरी लपून राहिला होता. पोलिसांनी पिस्तुल व गोळ्या हस्तगत केल्या.

मंगळवार दि. २६ रोजी दुपारी गुदिनो बारमध्ये ही घटना झाली होती. फैय्याज खतीब हा मूळ कर्नाटकांतील असून तो मुड्डी नावेली येथे राहत होता. मॅकनिक असलेल्या फैय्याजची अकबरशी मैत्री होती. त्या दिवशी तो दुपारी दारू पिण्यासाठी बारमध्ये गेला होता. त्याआधी अब्दुल कादर हा तेथे दारू पीत बसला होता. त्या टेबलजवळ बसून फैयाजने दारू मागितली व दारू पिताना पिस्तुलावर चर्चा सुरु झाली. खिशांत असलेले पिस्तुल काढून त्याने गोळी घालू काय असे सहज विचारले. त्याने घाल असे सांगताच पिस्तुलची गोळी झाडली ती कानातून जावून कादर ठार झाला. त्यानंतर तो पिस्तुल घेऊन पळाला. खुनासाठी वापरलेले पिस्तुल अकबर शेख यांचे असल्याचे फैयाजने सांगितले होते. हे पिस्तुल तसेच पाच गोळ्या जप्त केल्या. फैयाज व अकबरकडे पिस्तुलचा परवाना नाही. अकबर हा मूळ पुणे येथील असल्याचे समजते.

फैयाज व अकबर यांच्याकडे हे पिस्तुल असल्याचे कारण समजू शकले नसून, याआधी त्यानी या पिस्तुलने काही गुन्हा केला होता काय की विनापरवाना पिस्तुल विकणारी टोळी असावी याचा तपास चालू आहे. पोलिस निरिक्षक चेतन पाटील तपास करीत आहेत.