स्मिथ, कमिन्सचे प्रथमस्थान भक्कम

0
121

>> आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून कसोटी क्रमवारी जाहीर; विराट कोहली द्वितीय

ऍशेस कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात २११ व ८२ धावांची दमदार खेळी केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीतील आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले आहे.

९३७ रेटिंग गुणांसह स्मिथने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर ३४ गुणांची मोठी आघाडी मिळविली आहे. कांगारूंचा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने सामन्यात १०३ धावा मोजून ७ बळी घेत गोलंदाजांच्या यादीतील आपले पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक ९१४ गुणांची कमाई केली आहे. दुसर्‍या स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याच्यापेक्षा कमिन्सने ६३ गुण जास्त आहेत. भारताचा जसप्रीत बुमराह तिसर्‍या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याने यंदाच्या कॅलेंडर वर्षात प्रथमच ‘अव्वल १०’मध्ये प्रवेश करताना १२व्या स्थानावरून आठवे स्थान गाठले आहे. जोस बटलर (+ ४, ३७वे स्थान), रॉरी बर्न्स (+ ६, ६१वे स्थान) या इंग्लंडच्या तर टिम पेन (+ ६, ६० वे स्थान) या ऑस्ट्रेलियाच्या कप्तानाने फलंदाजीत प्रगती साधली आहे.

चट्टोग्राम कसोटीत बांगलादेशवर ऐतिहासिक विजय मिळविलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनादेखील मोठा फायदा झाला आहे. माजी कर्णधार असगर अफगाण (९२ व ५० धावा) याने ११०व्या स्थानावरून थेट ६३वा क्रमांक आपल्या नावे केला आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी शतकवीर रहमत शाह याने ९३वरून ६५व्या स्थानी झेप घेतली आहे. गोलंदाजीत १०४ धावांत ११ बळी घेतलेला अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने ६९व्या स्थानावरून ३७वा क्रमांक प्राप्त केला. अष्टपैलूंमध्ये राशिद ३४व्या स्थानावर पोहोचला आहे. मोहम्मद नबी याने गोलंदाजीतील ८५व्या स्थानासह कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला. बांगलादेशचा शाकिह अल हसन (२१वे स्थान) व ताईजुल इस्लाम (२२वे स्थान) यांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे.