स्मिथची कर्णधारपदावरून उचलबांगडी

0
210

>> बॅन्क्रॉफ्टसह केली चेंडूशी छेडछाड

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीतील चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर स्टीव स्मिथ याला ऑस्ट्रेलियन सरकारच्या दबावाखाली कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही आपल्या उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू बॅन्क्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केल्याची घटना कॅमेर्‍यात कैद झाली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने स्वतःदेखील चेंडूशी छेडछाड केल्याचे पत्रकार परिषदेत कबूल केले होते. सामन्यातील हीच चूक स्मिथला भारी पडली आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी चेंडूशी छेडछाड प्रकरणी दु:ख व्यक्त करत, ही घटना निराशजनक असल्याचेही म्हटले होते. ऑस्ट्रेलिया सरकारने या घटनेबद्दल लवकरात लवकर कारवाई करण्याचेही आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले होते. ऑस्ट्रेलियन स्पोटर्‌‌स कमिशनचे (एएससी) अध्यक्ष जॉन विली आणि सदस्य केट पामर यांनी ऑस्ट्रेलिया सरकारच्या वतीने या घटनेचा निषेध केला. ही घटना निषेधार्ह आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करताना खिलाडूवृत्ती दाखवावी अशी अपेक्षा असल्याचे एएससीने स्पष्ट केले. टीम पेनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

आजीवन बंदीचा धोका
स्टीव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिला आहे. केवळ आयसीसीच्या कारवाईमुळे ‘सीए’चे समाधान झालेले नसून या प्रकरणाची सखोल चौकशी इयान रॉय व पॅट होवार्ड यांना केपटाऊनला पाठविण्यात आले आहे. स्मिथ व वॉर्नरची कारकिर्द यामुळे धोक्यात आली असून त्यांच्यावर आजीवन बंदीदेखील घातली जाऊ शकते.

एका कसोटीसाठी निलंबन
चेंडूशी छेडछाडप्रकरणाची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेताना हटविण्यात आलेला कांगारूंचा नियमित कर्णधार स्टीव स्मिथ याला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित केले आहे. तसेच त्याच्या सामना मानधनातील १०० टक्के रक्कम कापून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्मिथला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या व शेवटच्या कसोटीत खेळता येणार नाही. पिवळ्या रंगाची टेप चेंडूवर घासताना कॅमेर्‍यात कैद झालेला सलामीवीर कॅमेरुन बॅन्क्रॉफ्ट याला मानधनाच्या ७५ टक्के रक्कम दंडाच्या रुपाने भरावी लागणार असून त्याच्या खात्यात ३ दोषांक जमा करण्यात आले आहेत.