स्मार्ट सिटीच्या कामांबाबत सामान्यांच्या तक्रारी नाहीत

0
10

>> पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचा दावा

पणजी महानगरपालिका क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांबाबत सामान्य लोक तक्रार करत नाहीत, फक्त काही घटकांकडून तक्रार केली जात आहे, असा दावा पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
पणजी अधिक स्मार्ट सिटी अंतर्गत कामे मार्गी लावण्यासाठी संयम बाळगण्याची गरज आहे, असा सल्ला मंत्री मोन्सेरात यांनी दिला. शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तसेच शहरात अनेक अपघातही घडत आहेत.

पणजी शहराजवळील तेल गळतीबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल घेतला जाणार आहे. तेल गळती कोठून होत आहे याची आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चौकशी करेल, असेही मोन्सेरात यांनी सांगितले. कामगार खात्याच्या कामगार कल्याण निधीचा अधिक चांगला वापर करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. कामावरून कमी केलेल्या कामगारांसाठीच्या प्रलंबित अंदाजे 6 कोटी रुपयांच्या निधीचा योग्य वापर करण्यासाठी समिती सूचना करणार आहे. तसेच कामगार योजनांची व्याप्ती वाढविण्यावरही समिती लक्ष देईल, अशी माहिती कामगारमंत्री मोन्सेरात यांनी दिली.