स्पेन फायनलमध्ये

0
221

युरोपियन विजेत्या स्पेनने मालीचा ३-१ असा पाडाव करत फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. बुधवारी नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या लढतीत स्पेनकडून आबेल रुईझ (१९वे मिनिट, पेनल्टी व ४३वे मिनिट) तसेच फेर्रान टॉरेस (७१वे मिनिट) यांनी गोल लगावले. मालीचा एकमेव गोल ७४व्या मिनिटाला लस्साना एनदियाये यानेे केला. कालच्या पराभवामुळे सलग दुसर्‍यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याचे माली संघाचे स्वप्न अपूर्ण राहिले. स्पेनने हा सामना जिंकला असला तरी मालीने स्पेनला कडवी टक्कर दिली. त्यांच्या चेक ओमर याने लगावलेला एक फटका बारला लागून बाहेर गेल्याने त्यांची गोलसंधी हुकली. मालीच्या संघाने चेंडूवरदेखील बर्‍यापैकी ताबा राखताना स्पेनच्या गोलक्षेत्रात शिरकाव करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु, प्रसंगावधानतेचा अभाव त्यांच्यात दिसून आला. यामुळेच त्यांचा पराभव झाला. २८ रोजी ५ वाजता कोलकाता येथे ब्राझिल व माली यांच्यात तिसर्‍या स्थानासाठी सामना होणार आहे. यानंतर रात्री ८ वाजता इंग्लंड व स्पेन जेतेपदासाठी झुंजणार आहेत.