स्पाईस जेटच्या प्रवाशांची दुसर्‍या दिवशीही कोंडी

0
78

संध्याकाळी तीन विमानांचेच उड्डाण
स्पाईस जेटची विमाने अचानक रद्द झाल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दाबोळी विमानतळावर निर्माण झालेल्या गोंधळात कालही सुधारणा दिसून न आल्याने विमान प्रवाशांची बरीच गोची झाली. संध्याकाळी ६ पर्यंत एकही विमान गेले नाही. मात्र तद्नंतर सव्वा सात व साडे सात यावेळेत तीन विमाने उड्डाणासाठी सज्ज झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या स्पाईस जेट कंपनीच्या विमानांना वेळेवर इंधन पुरविण्यात आले नाही. तसेच भारतीय विमान प्राधिकरणानेही थकबाकीची मागणी करीत उड्डाण घेण्यास हरकत घेतल्याने मंगळवारी दाबोळी विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. गोव्यातून विविध ठिकाणी जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर शेकडोंच्या संख्येने प्रवासी यामुळे अडकून पडले होते. रात्री ९.३०च्या सुमारास मुंबई-दिल्लीला जाण्यासाठी एक विमान मंगळवारी रात्री सोडण्यात आले होते.
काल दुपारी दीड वाजल्यापासून स्पाईस जेटची विमाने उड्डाण घेणार होती. पण प्रत्यक्षात सायंकाळी ७.१५ वाजता पहिले विमान निघाले. त्यामुळे कालही शेकडो प्रवाशांना दाबोळी विमानतळावर ताटकळावे लागले. त्यानंतर आणखी दोन विमाने मुंबई, दिल्लीला प्रवाशांना घेऊन गेली.