दहशतवाद संपविण्यास वचनबध्द : नवाज शरीफ

0
63

पाकिस्तान-अफगाणिस्तानकडून नव्याने मोहीम
पेशावर येथील आर्मी स्कूलवर हल्ला करून तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अमानुष हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर काल पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांनी या भागातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी नव्याने मोहिमा हाती घेण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रदेशांमधील दहशतवाद संपविण्याबाबत वचनबध्दतेची ग्वाही दिली आहे.येथे आयोजित एका सर्वपक्षीय परिषदेवेळी शरीफ म्हणाले, ‘दहशतवादापासून या प्रदेशाला मुक्त करणे हे आमचे ध्येय आहे. केवळ पाकिस्तान व अफगाणिस्तानच नव्हे तर हा संपूर्ण प्रदेश दहशतवादापासून मुक्त व्हायला हवा.’
पेशावरमधील शाळेवरील तालिबान्यांच्या हल्ल्यात १३२ विद्यार्थी व ९ कर्मचारी ठार झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद संपवण्यासाठी केलेल्या आवाहनाच्या पार्श्‍वभुमीवर शरीफ यांनी वरील भाष्य केले आहे. ‘ही बलिदाने व्यर्थ जाणार नाहीत आणि आम्हा सर्वांना पाकिस्तानमधून दहशतवाद संपलेला हवा आहे’ शरीफ म्हणाले. दहशतवादप्रकरणातील आरोपींच्या स्वघोषित मृत्यूदंडाच्या शिक्षेवरील बंदी उठविल्याचे शरीफ यांनी यावेळी जाहीर केली.
‘आम्हाला ही दृश्ये विसरता येणार नाहीत…. ज्या पध्दतीने त्यांनी (अतिरेक्यांनी) निष्पाप मुलांच्या अंगांवर गोळ्या झाडून भोके पाडली, ज्या पध्दतीने त्यांनी या मुलांचे चेहरेही गोळ्यांनी छिन्न विच्छिन्न केले ते पाहिल्यानंतर ती दृश्ये विसरणे अशक्यच’ अशी टिप्पणीही शरीफ यांनी केली.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी आपण मंगळवारी रात्री संपर्क साधून उभय देश दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी काय करू शकतील त्याविषयी बोललो असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर अतिरेक्यांविरोधात नव्याने मोहिमा सुरू करण्यास उभयतांमध्ये एकवाक्यता झाल्याचेही त्यांनी सांगितले.