स्पर्धात्मक परीक्षेद्वारेच सरकारी नोकरभरती

0
10

>> मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा स्पष्ट; ताळगावातील दोन दिवसीय रोजगार मेळाव्याला सुरुवात

यापुढे सरकारी नोकरभरती ही कर्मचारी निवड आयोगातर्फे करण्यात येणार असून, या आयोगातर्फे स्पर्धात्मक परीक्षा घेऊन ही भरती करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ही नोकरभरती १०० टक्के कर्मचारी निवड आयोगातर्फे होईल व स्पर्धात्मक परीक्षेत चांगली कामगिरी करणार्‍यांची निवड जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये काल आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कामगार व रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, कामगार सचिव संदीप जॅकीस व कामगार आयुक्त राजू गावस उपस्थित होते. कालपासून सुरू झालेल्या दोनदिवसीय नोकरभरती मेळाव्यासाठी १८५०० बेरोजगारांनी नोंदणी केली आहे.

आमदार व मंत्री यांच्या वशिल्याद्वारे नोकरी मिळवणे हे चुकीचे आहे. सरकारी नोकर्‍यांसाठी यापुढे एक ते दोन वर्षांचा अनुभव हा सक्तीचा केला जाणार आहे. त्यासाठी भरती नियमांत आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नोकरभरती नियमांत गेल्या ३० वर्षांपासून बदल करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍यांनी एका ठिकाणची नोकरी सोडून दुसर्‍या ठिकाणी नोकरी पत्करली, तरी त्यांची वेतनश्रेणी चालू राहील असा जो अध्यादेश केंद्र सरकारने काढला आहे, त्याचा लाभ गोव्यातील खासगी क्षेत्रात काम करणार्‍या नोकरदारांना मिळावा यासाठी सरकार आवश्यक ते सर्व काही करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याशिवाय वेतनात सुधारणा, गृहकर्ज आदी सुविधाही त्यांना मिळतील याकडे सरकार लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.

गोवा मनुष्यविकास महामंडळामार्फत ज्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे, त्यांना पोलीस, अग्निशामक दल व वन खात्यातील नोकर्‍यांत २ टक्के आरक्षण देण्याबाबत सरकारचा विचार चालू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लवकरच मडगावातही नोकरभरती मेळावा
दक्षिण गोव्यातील बेरोजगारांसाठी लवकरच मडगाव येथेही अशाच प्रकारचा एक भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कुशल मनुष्यबळाच्या बाबतीत गोवा स्वयंपूर्ण व्हायला हवे, असेही ते म्हणाले.