केपेच्या आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची

0
10

>> केपेतील क्रीडा संकुलाच्या पाहणीवेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासमोरच दोन्ही गट भिडले

केपे येथील क्रीडा संकुलाच्या पाहणीवेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासमोरच केपे मतदारसंघाचे आजी-माजी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील पुन्हा एकदा शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र गावडे यांनी वेळीच मध्यस्थी करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. यापूर्वी बेतूल येथील पंचायत घरावरून मुख्यमंत्र्यांच्यासमोरच हे दोन्ही आजी-माजी आमदार भिडले होते.
केपे क्रीडा संकुलातील समस्या आणि वॉकिंग ट्रॅकची पाहणी करण्याकरिता मंत्री गोविद गावडे हे सकाळी येथे आले होते.

यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा व त्यांचे कार्यकते, तसेच केपेचे माजी आमदार चंद्रकांत कवळेकर आणि त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी गोविंद गावडे यांनी संकुलाचा आढावा घेण्यास सुरुवात करून अधिकार्‍यांची चर्चा केली. यावेळी एल्टन डिकॉस्टा यांनी कोणत्या समस्या आहेत, त्या मांडल्यानंतर कवळेकर यांनी गावडे यांच्याशी चर्चा सुरू केली. त्याचवेळी देवेंद्र नामक एका व्यक्तीने कवळेकर यांनी मध्ये बोलूच नये, त्यांना बोलण्याचा काहीएक अधिकार नसल्याचे सांगत गोंधळ घातला. त्यावर नगरसेवक दयेश नाईक यांनी कवळेकर यांना का बोलण्याचा अधिकार नाही, असा प्रश्न केल्यावर दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी एल्टन डिकास्टा आणि चंद्रकांत कवळेकर यांच्यामधेही बराच वेळ वाक्‌युद्ध सुरू राहिले. त्याचवेळी मंत्री सुभाष फळदेसाई तेथे पोचले आणि त्यानंतर उपस्थित दोन्ही मंत्र्यानी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

सुरवातीला दोन महिन्यांत क्रीडा संकुलातील सर्व समस्या सोडवल्या जातील असे सांगितले होते; मात्र आता सहा महिने उलटले, तरी समस्या आहेत. केपेच्या जनतेला आम्हाला उत्तर द्यावे लागते. त्यामुळे अधिकार्‍यांनी मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत कामे वेळेत पूर्ण करावी.

  • एल्टन डिकॉस्टा, आमदार, केपे

स्थानिक आमदारांच्या सूचनेनुसार या क्रीडा संकुलाची पाहणी केली. संकुलातील समस्या फार मोठ्या नाहीत; मात्र त्याकडे लक्ष दिले नसल्याने त्या मोठ्या बनल्या आहेत. व्यायामशाळा व जलतरण तलावाच्या समस्या सोडवल्या जातील. तसेच अन्य सर्व समस्या देखील डिसेंबरपर्यंत सोडवल्या जातील.

  • गोविंद गावडे, क्रीडामंत्री