स्नानगृहात पैसे दडवणार्‍याचा गोव्यात कॅसिना

0
61

>> के. सी. वीरेंद्रला सीबीआयकडून अटक

 

ज्याच्या स्नानगृहातील छुप्या कप्प्यात दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांत तब्बल ५ कोटी ७० लाख रुपये आढळले होते, त्या के. सी. वीरेंद्र नामक जनता दल सेक्युलरच्या नेत्याचा गोव्यात कॅसिनो असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीबीआयने काल त्याला, तसेच त्याला नोटा बदलून देण्यात मदत करणारा रिझर्व्ह बँकेचा अधिकारी के मायकल यांना अटक केली.
वीरेंद्र याच्या घरावर शनिवारी आयकर अधिकार्‍यांनी छापा टाकला होता. विशेष म्हणजे त्याचे नाव यापूर्वी क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी गोव्यात पकडल्या गेलेल्या टोळीशी जोडले गेले होते. एका सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचा तो जावई आहे. ३५ टक्के दलाली घेऊन काळ्या पैशाचे पांढर्‍यात रूपांतर करणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकार्‍यालाही अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी ग्राहक असल्याची बतावणी करीत जाळ्यात पकडले. आणखी सात दलालांनाही आजवर पकडण्यात आले आहे.
गोव्यात कॅसिनो चालवणारा के. सी. वीरेंद्र हा चित्रदुर्ग जिल्ह्यातील छल्लकेरी येथील असून त्याच्या घराच्या स्नानगृहात एक छुपा कप्पा तयार करण्यात आल्याचे व त्यात कोट्यवधी रुपये आणि सोन्याच्या विटा दडवल्याचे आढळून आले होते. स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, कोटक महिंद्रा बँक व आयसीआयसीआय या चार बँकांमार्फत त्याने काळा पैसा पांढरा केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. कर्नाटक बँक आणि धनलक्ष्मी बँकेतूनही अशाच प्रकारे नोटा बदलण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
वीरेंद्र याला पकडून देण्यात गोव्यातील एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. वीरेंद्रने गोव्यातील आपल्या एका मित्राकडून कर्नाटकातील घराच्या कामासाठी मजूर नेले होते. त्याच्याकडून त्याने स्नानगृहात आणि शयनगृहात छुपे कप्पे बनवून घेतला, पण त्याचे पुरेसे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या मजुराने आपल्या मालकाला याची कल्पना दिली. त्या व्यक्तीनेच गोव्यातील आयकर अधिकार्‍यांना या प्रकाराची माहिती दिली व तिच्या आधारे कर्नाटकातील त्याच्या घरी छापा घातला गेला असे समजते. वीरेंद्र याला काल हुबळीत अटक झाली. सीबीआयने त्याला सहा दिवस कोठडी मिळवली आहे. आयकर अधिकार्‍यांनी यासंदर्भात वीरेंद्र, सागर फायनान्स कंपनीचा समुंदरसिंग व गोव्यातील तीन कॅसिनो मालकांचे जबाब नोंदवले आहेत.