सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष

0
91

>> औपचारिक घोषणा २३ ऑक्टोबरला शक्य

>> सचिवपदी जय शहा

>> खजिनदारपदी अरुण सिंग धुमल

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित झाली आहे. काल सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. जय शहा यांची सचिवपदी, तर अरुण धुमल यांची खजिनदारपदी निवड होणेही जवळपास पक्के आहे. २३ रोजी होणार्‍या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी १५ ऑक्टोबरला जाहीर केली जाईल. तर १६ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला निवडणूक पार पडून नव्या पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात येणार आहे.

विजयनगरच्या महाराजानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून निवड होणारा सौरव गांगुली हा पहिला खेेळाडू ठरणार आहे. सुनील गावसकर व शिवलाल यादव यांनी २०१४ साली हंगामी अध्यक्षपद भूषविले होते. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी १९३६ साली भारतीय संघाचे इंग्लंड दौर्‍यावर तीन कसोटींत नेतृत्व केलेल्या विजयनगरच्या महाराजांनी १९५४ ते १९५६ या कालावधीत मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

बीसीसीआयचा ‘बिग बॉस’ गांगुली
टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेला सौरव गांगुली प्रशासनातही अनुभवी आहे. २०१५ सालापासून तो क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष आहे. जगमोहन दालमिया याच्यानंतर त्याने अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. २०१२-१३ पासून राज्य संघटनेच्या कार्यकारी समितीत होता. २०१४ जुलैपासून त्याने संयुक्त सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. २००३ साली त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती स्वीकारल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संचालन परिषदेचा सदस्य तसेच बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचा प्रमुख म्हणूनही त्याने जबाबदारी पार पाडली आहे. लोढा समितीच्या नियमांमुळे गांगुलीला केवळ १० महिने अध्यक्षपद भूषविता येणार आहे. पुढील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये त्याला पायउतार व्हावे लागणार आहे.