सोहिरोबांचे साहित्य इंग्रजीतून सर्वदूर पोचवा : मुख्य सचिव

0
117
टपाल तिकीट-लिफाफ्याचे प्रकाशन करताना केवल शर्मा, फैझी हश्मी, चार्लस लोबो, कार्लोस फर्नांडिस व प्रसाद लोलयेकर. (छाया : किशोर स. नाईक)

टपाल तिकीट-लिफाफ्याचे प्रकाशन; ग्रंथ प्रदर्शनाचेही उद्घाटन
संताची शिकवण आपण अंगिकारली पाहिजे. संत सोहिरोबानाथ आंबिये यांचे साहित्य इंग्रजीत अनुवादित करून सर्वांपर्यंत पोचवले पाहिजे, कारण त्याचे महात्म्य मोठे आहे, असे प्रतिपादन गोवा प्रशासनाचे मुख्य सचिव केवल शर्मा यांनी येथे केले.संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्ताने पोस्ट खात्याने त्यांच्यावर काढलेल्या टपाल तिकीटासह लिफाफ्याचे काल शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने शर्मा बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुणे कला व संस्कृती खात्याचे सचिव फैझी ओ. हश्मी, गोवा विभागाचे पोस्ट मास्टर जनरल चार्लस लोबो, कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्युरेटर कार्लोस फर्नांडिस व कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.
आपल्या संविधानाच्या घटनेत आध्यात्माला स्थान नाही. परंतु चीन सारख्या देशात अध्यात्माला विशेष स्थान आहे याकडे लक्ष वेधून श्री. शर्मा यांनी सोहिरोबानाथांवर टपाल तिकीटासह लिफाफा काढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चार्लस लोबो म्हणाले, आपल्या देशात अनेक संत होवून गेले. त्यांच्यापासून आर्दश घेऊन परंपरा चालू ठेवायला हवी. श्री. हाश्मी यांनी सांगितले, की भारतात संतांचा इतिहास खूप मोठा आहे. या संत परंपरेचा आपण आदर करायला हवा. त्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत केले. कार्लोस फर्नांडिस यांनी आभार मानले.
ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी पर्वणी
दरम्यान, कला अकादमीच्या दर्यासंगमावर संत सोहिरोबानाथ आंबिये याच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भक्ती संमेलनानिमित्त संत सोहिरोबानाथ ग्रंथ प्रदर्शनही भरविण्यात आले असून त्याचे काल ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री सुरेश आमोणकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ग्रंथोत्सवात मेहता पब्लिकेशन, अंजनी प्रकाशन पुणे, सुयश बुक सेलर्स, पुणे, मिरर पब्लिशिंग पुणे, आदींची विविध विषयांवरील पुस्तकांची दालने वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याला मुख्य सचिव केवल शर्मा, कला व संस्कृती खात्याचे सचिव फैझी हाश्मी, कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तक प्रदर्शनात ग्रंथ खरेदीवर सवलतही असल्याने वाचकांना जास्तीत जास्त पुस्तके विकत घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या काही पुस्तकांवर पन्नास टक्के सवलत आहे. रॉबिन कुक यांची डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी अनुवादित केलेली पुस्तके, ‘टॉक्सिन’,‘सीजर’, ‘क्रायसिस’, जेफ्री आर्चर यांची लीना सोहोनी यांनी मराठीत अनुवादित केलेली कॅट ओ नाईन टेल्स, टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, केन ऍण्ड एबल, अ प्रिझन ऑफ बर्थ ही पुस्तके शिवाय मराठीतील कादंबर्‍या, चरित्रे, बाल साहित्य, अनुवादित इतर साहित्य अशी हजारो पुस्तके या दालनावर उपलब्ध आहेत. ‘कळेल का त्याला आईचे मन’ हे अरुण शौरी यांचे सुप्रिया बकील यांनी मराठीत अनुवाद केलेले पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल असे विक्रेते म्हणाले.
विद्या विकास पब्लिशर्स, नागपूर, अंजली प्रकाशन, पुणे, सुयस बुक सेलर्स, पुणे, वैशाली प्रकाशन पुणे, मधुश्री प्रकाशन पुणे, नार्वेकर एजन्सी गोवा, गोमंतक बुक सर्व्हिस यांच्या दालनावर मराठीतील वाङ्‌मय विषयक अनेक पुस्तके आहेत. सुयश बुक सेलर्सच्या दालनात १० ते २५ टक्के सवलत आहे. कथा, कादंबरी, ज्योतिष, धार्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, चरित्र अशी विविध विषयांवरची पुस्तके इथे आहेत. त्यांच्या मुक्तांगण प्रकाशनने काढलेली गोव्यातील साहित्यिकांची पुस्तके इथे पहायला मिळतात. त्यात मनोहर कोरगावकर, अपूर्वा कर्पे, कृष्णा शेटकर, प्रदीप तळावलीकर यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. अण्णाभाऊ साठेंचे ‘फकिरा’ हे गाजलेले पुस्तक या दालनात आहे. मधुश्री प्रकाशन पुणेच्या दालनात ‘प्रेमातून प्रेमाकडे’ हे अरुणा ढेरे यांचे अलीकडील पुस्तक उपलब्ध आहे. या दालनात २०१३-१४ मध्ये प्रकाशित झालेली बहुतेक पुस्तके आहेत.
प्रोफेशनल बुक हाऊस गोवा स्टॉलवर टॅक्सेशन, लॉ, मॅनेजमेंट, ही पुस्तके, रिडर्स वर्ल्ड, मुंबईच्या स्टॉलवर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, सायन्स, सेल्फ हेल्प, फ्रिक्शन अशी पुस्तके तसेच मेहूल बुक सेल्स स्टॉलवर इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, सोशियल सायन्स, गणित, फिल्म स्टडिज, लाइफ सायन्स, फूड सायन्स आदी विषयांवरील पुस्तके आहेत. ग्रंथ कॉर्नर, नॅशनल बुक टॅस्ट्र, ब्रॉड वे, श्री एंटरप्रायजेस, व्हिवा बुक्स लि. मुंबई, कॅम्ब्रीज विद्यापीठ प्रेस, वर्ल्ड पावर, कोल्हापूर, व्हिनडम बुक्स (टेक्स बुक, मेडिकल, डेंटल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग विषयक), ऑक्सफोर्ड विद्यापीठ प्रेस, डायमंड पब्लिकेशन, पुणे (पर्यावरणशास्त्र, इंग्रजी साहित्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, बालवाङ्‌मय, स्पर्धा परीक्षा, वाणिज्य, भूगोल, कथा, चरित्र, अनुवादित अशी पुस्तके) ही दालने पुस्तकांनी सजली आहेत. कला संस्कृती खात्याने प्रकाशित केलेल्या प्रकाशनांचे एक दालन या प्रदर्शनात आहे. हे प्रदर्शन २५ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत वाचकांसाठी खुले राहणार आहे.