चेल्लाकुमार गोव्यात दाखल कॉंग्रेस आमदारांशी आज बैठक

0
117

अ. भा. कॉंग्रेसचे सचिव तसेच गोव्याचे प्रभारी चेल्लाकुमार यांचे काल गोव्यात आगमन झाले असून आज सकाळी येथील कॉंग्रेस भवनात कॉंग्रेस आमदार पक्षाचे पदाधिकारी यांची ते बैठक घेतील. या बैठकीत पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक, जिल्हा पंचायत निवडणूक व प्रादेशिक आराखडा या विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.दरम्यान, काल संध्याकाळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांच्या उपस्थितीत दक्षिण गोवा जिल्हा समितीची बैठक घेऊन सदस्य नोंदणीच्या प्रश्‍नावर चर्चा केली.
फुर्तादो यांचा आज अर्ज
पणजी पोट निवडणुकीचे कॉंग्रेस उमेदवार सुरेंद्र फुर्तादो आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. फुर्तादो यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपचे काही नेते प्रयत्न करीत असल्याचे वृत्त पसरल्याने कॉंग्रेस वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. गोव्याचे प्रभारी चेल्लाकुमारही या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. फुर्तादो यांना निवडून आणण्यासाठी पक्षाच्या सर्व नेत्यांनी पणजी मतदारसंघात सक्रीयपणे प्रचारकार्य करावे, या दृष्टीने चेल्लाकुमार आजच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.