सोबत

0
35
  • – गिरिजा मुरगोडी

‘मैत्र’ हे जगण्यासाठीच एक आवश्यक टॉनिकच! अगदी लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत हे नातं आपलं विशेष स्थान टिकवून असतं. मनात, जीवनात, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारे भेटत, समजत, उलगडत जाणारं हे नातं… निखळ आनंदाचं, आश्‍वासक विश्‍वासाचं, निरंतर सोबतीचं… आजच्या मैत्री दिवसानिमित्त…

तू असतेस सतत
आत आत कुठेतरी
मूक सोबत करत…
शब्दांच्या कोलाहलात
वा मौनाच्या किनार्‍यावर
कुठेही असले तरी
तू असतेस सोबत…
खूप आनंदात असते तेव्हा
हसत हसत टाळी देत
क्षणाक्षणाची फुलं बनवत
रुणझुणत राहतेस…
मनाची कवाडं मिटून
माझ्यातच मी रुतत जात असते तेव्हा
अलगद हात हाती घेतेस
पापण्यांशी जमलेली आसवं
हलकेच पुसतेस…
मी ‘कविते’च्या संदर्भात लिहिलेल्या ‘सोबत’ या कवितेतील या काही ओळी… कविता माझी सखी, आणि ती सतत सोबत असते या भावनेतून लिहिलेल्या… पण खरं तर कोणतीही जिवलग मैत्रीण वा जवळचा मित्र- आणि ते अनमोल मैत्र, ती साथ-संगत याबाबत अगदी याच भावना माझ्या किंबहुना आपल्या प्रत्येकाच्याच मनात असतात. या आणि अशा अनेक भावना व्यक्त करण्याचा, समजून घेण्याचा, जपण्या-जोपासण्याचा दिवस म्हणजे- फ्रेंडशीप डे! मैत्र दिवस!
‘मैत्र’ हे जगण्यासाठीचे एक आवश्यक टॉनिकच खरेतर. अगदी लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत हे नातं आपलं विशेष स्थान टिकवून असतं. मनात, जीवनात, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारे भेटत, समजत, उलगडत जाणारं हे नातं… निखळ आनंदाचं, आश्‍वासक विश्‍वासाचं, निरंतर सोबतीचं…

शाळेत असताना बाकावर शेजारी बसणारी मैत्रीण व वर्गातल्या इतर मैत्रिणी यांच्याबरोबर बागडताना, चिमणीच्या दातांनी कैर्‍या-पेरू खाताना, अखंड किलबिलत एकत्र बसून डबा खाताना, डबा भराभर संपवून मैदानावर हुंदडायला धावताना, शाळा सुटल्यावर गप्पा मारत- कधी फुलपाखरांमागे फिरत- तर कधी झाडांखाली फुलं, पानं, लेखणीचे बोरू असं काही काही वेचत केलेली धमाल… या आठवणी हा अक्षय आनंदाचा झराच असतो. घराजवळच्या मैत्रिणी तर काय… हुंदडण्यासाठी वेगवेगळी ठिकाणं धुंडाळून लपंडाव, सूरपारंब्या, काचापाणी, लगोरी, गोट्या, विटी-दांडू असे अनंत खेळ तहान-भूक, वेळेचं भान विसरून मनसोक्त खेळण्याचं आणि कुठल्याही वेळी एकदम जमून गुलुगुलु गप्पागोष्टी करण्याचं हक्काचं ठिकाण! या सगळ्यांसोबत कधी भांडणं, रुसवेफुगवे, वितंडवाद हेही स्वाभाविक आणि काही क्षणात पुन्हा हातात हात गुंफून खेळायला पळणं हे त्याहून स्वाभाविक. कधी अबोला झाला आणि एखादा दिवस टिकलाच तर होणारी घालमेलही तशीच.
कॉलनीत खेळताना आमचे काही बालमित्रही सोबत असत. मग लपंडाव, काठ्या-काटक्यांचे धनुष्यबाण तयार करून केलेली युद्धे, त्यात असणारे दोन गट, खास हेरगिरी करून एकमेकांच्या गोटात घुसून केलेली कुरघोडी… असे आक्रमक खेळ. तसेच गोट्या, विटी-दांडू, पतंग उडवणे असे खेळ अटीतटीने खेळत असू. आणि त्यांच्याबरोबर खेळून झाल्यानंतरही मैत्रिणींबरोबरची वेगळी धमाल आणि खास गप्पा सुरूच असत. आमच्या लहानपणी सामाजिक परिस्थिती सुरक्षिततेची आणि आईवडिलांना मुलं काय, कुठे आणि किती धिंगाणा घालताहेत याचा पत्ताही नसण्याची अशी असल्याने आम्ही सर्व सवंगड्यांबरोबर खूप मुक्त बालपण अनुभवले.
कॉलेजमधलं मैत्र हे थोडं वेगळं. आपलं आपलं जग असणारं. वर्गात लेक्चर चालू असतानाही वहीच्या मागच्या पानावर कवितेच्या ओळी, कधी एकमेकांना संदेश पाठवणे, क्लासनंतरचं प्लॅनिंग, कँटीन आणि हॉटेल (फर्ग्युसन, पुणे फेम), अनेकानेक मॅटिनी शोज, गॅदरिंग, रात्रीच्या गप्पा, कधी क्लास बुडवून केलेली भटकंती, कधी काही कार्यक्रमासंदर्भात भेटीगाठी, एकमेकींची छोटी-छोटी गुपितं सांभाळणं, परीक्षा जवळ आली की केलेले अभ्यास (यापुढे प्रश्‍नचिन्ह वा स्माईल घालू शकता वाचताना…) अशा अनंत गोष्टींनी बहरत या नात्याचे वेगळे पदर उलगडणारं.
पुढे विवाहानंतर जीवनसाथी मित्र असतोच; पण त्यासोबत अनेकानेक इतर ओळखीही होतात. वेगळं जग, वेगळं वातावरण आणि अशातच कोणा-कोणाशी जुळलेल्या तारा आणि अनुबंध. त्यातून हाती लागलेले कांचनक्षण. मनात साठलेलं खूप काही व्यक्त करण्यासाठीचं, विचार, मत-मतांतरे, भावना, आकांक्षा, स्वप्ने, अपेक्षा, अपेक्षाभंग, रोजच्या जीवनातले आनंदाचे क्षण, व्यथांचे क्षण, काही निर्णय घेण्याचे प्रसंग, घेतलेल्या निर्णयाची योग्यायोग्यता पडताळून पाहण्याची आवश्यकता जाणवण्याचे प्रसंग, एकत्र केलेली खरेदी, पाहिलेले चित्रपट, वाचलेली चांगली पुस्तके, केलेले लेखन, मुलांचे जन्म, त्यांचे वाढणे, त्यांच्या वाढीच्या प्रवासात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळत गेलेला आनंद आणि त्या-त्या टप्प्यावरची आंदोलने, मानसिक- भावनिक- शैक्षणिक बाबतीतल्या अडचणी, समस्या, आपल्या कामाच्या क्षेत्रातले अनुभव, अडचणी, आव्हानं, या आणि अशा असंख्य गोष्टींबाबत व्यक्त होण्याचं, चर्चा करण्याचं एक खास हक्काचं स्थान म्हणजे मैत्र. कोणीतरी म्हटलंय ना- ‘फ्रेंडशीप इजन्ट अ बिग थिंक, इट्‌स अ मिलियन लिटल थिंक्स…’ अगदी तसं! या टप्प्यावर या नात्याचे अधिक प्रगल्भ असे पदर उलगडत जातात.

आयुष्याच्या उतरणीवर पोहोचल्यानंतर तर हे नातं अधिक मुरून अधिक गुणकारी, आवश्यक आणि संजीवक ठरत असतं. विषय बदलतात, परिस्थिती बदललेली असते. कधी व्यक्त करावंसं वाटतं, कधी मौन राहावंसं वाटतं. हे सगळं समजून घेणारं आणि सोबत असणारं नातं या टप्प्यावर वेगळं समाधान देतं.
तसं तर आपापल्या व्यापात आकंठ बुडालेले असताना नेहमीच भेटणं शक्य नसतं. पण निखळ मैत्र नेहमीच सोबत असतं. जिव्हाळा असणारं, काळजी करणारं… फ्रेंडशीप-डे, फ्रेंडशीप बँड, शुभेच्छापत्रं, भेटीगाठी असं काही प्रत्येकवेळी आवश्यकही असतं नाही का? आपलं ‘असणं’ जितकं खरं, स्वाभाविक, तितकंच हे नातंही. ते असतं! अर्थात मनातल्या मनात व्यक्त करण्याची साधने, माध्यमे असलेल्या या गोष्टी आनंद देतात, आपल्या भावनाही अधोरेखित करतात हेही तितकंच खरं.

निखळ मैत्रीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिथे आपण जसे असतो तसेच दिसू शकतो, असू शकतो. गुण-दोषांसकट आपलं म्हणतानाच न रुचणारं, तरी आवश्यक असणारं असंही काही एकमेकांना स्पष्टपणे सांगू शकतो, स्वीकारू शकतो. कोणतेही उपचार मुखवटे, देखावे, सारवासारव या कशाचीही गरज वा अपेक्षा नसते. गैरसमज झालेच तरी मोकळेपणाने त्याबद्दल बोलून मळभ दूर करू शकतो. कोणत्याही सुखाच्या वा दुःखाच्या, समस्येच्या वा कृतार्थतेच्या क्षणी ज्याची सर्वप्रथम आठवण येते तो वा ती मित्र वा मैत्रीण-सखी!
खष ींहशीश ळी ीेाशेपश र्ूेी लरप ींरश्रज्ञ ींे
खष ींहशीश’ी ीेाशेपश र्ूेी लरप श्रर्रीसह ुळींह
खष ींहशीश’ी ीेाशेपश र्ूेी लरप लरश्रश्र ेप
ुहशप र्ूेी पशशव र हशश्रळिपस हरपव
खष ींहशीश ळी ीेाशेपश र्ूेी लरप र्लेीपीं ेप
ींे रर्वींळीश रपव र्ीपवशीीींरपव…

या ‘स्पेशल फ्रेंड’ इंग्रजी कवितेत म्हटल्याप्रमाणे असं मैत्र जे सतत आठवत राहतं आणि असा स्पेशल फ्रेंड जर तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही फार भाग्यवान आहात. खरंच विशुद्ध मैत्री, निखळ नातं हे असंच असतं. आणि ते आपल्याला लाभणं हे वरदानच. प्रत्येकाला ते लाभत असतंच, कोणा ना कोणाच्या रूपात!
खरं तर आपल्याला मैत्रिणी पुष्कळ असतात. प्रत्येकीत काही ना काही भावणारे, आपल्याला जोडून ठेवणारे गुण असतात. या सर्वांबरोबर आपण अनेक प्रकारचे आनंद अनुभवत असतो. ते हवेहवेसे असतात… जीवनात झुळझुळत्या झर्‍यासारखे. पण सख्ख्या सख्या अगदी मोजक्या. आतल्या कप्प्यातल्या. मनाचा गाभा उलगडता यावा अशी तर अगदी एखादी. पण या प्रत्येकीचं मैत्र अमूल्य.

आपल्याला कधीकधी मित्र-मैत्रीण आप्तस्वकीयांमध्येही गवसतात, जी फिलोसोफर गाईड असतात. कधी आसपासचा निसर्ग, कधी समंजस सोबत देणारे लडिवाळ प्राणी हीसुद्धा मैत्र जुळून आनंद देणारी ठिकाणं असतातच. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे’ हे ज्ञानदेवांचे बोल सार्थ ठरवणारे.
कृष्ण-सुदामा यांची मैत्री वा द्रौपदीसाठी कृष्ण सखा ही वेगळ्या उंचीवरची नाती. पण ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ म्हणत एकमेकांसाठी जिवाची बाजी लावण्याची तयारी असलेली सामान्य माणसेही या नात्याचे अमूल्यत्व जाणणारी, जपणारी.

ज्या व्यक्तीसोबत आपल्याला अतिशय कंफर्टेबल वाटतं, काहीही बोलता, मनमुक्त व्यक्त होता येतं, सहवास आनंददायी वाटतो ती व्यक्ती आपली मैत्रीण वा मित्र हे अगदी सहजसत्यच. समोरच्याला आहे तसं स्वीकारणं हे निखळ मैत्रीतलं एक स्नेहभान, हे जितकं खरं तितकंच आपणही जसे आहोत तसेच तिथे असणं हाही सहजभाव असतो. हे घडण्यासाठी प्रथम स्वतःला आहे तसं स्वीकारणं आवश्यक असतं आणि त्याही प्रवासात मैत्रीच मदतीला येते.
हे मैत्राख्यान लिहीत असतानाही काही जवळच्या मैत्रिणींना साद दिली होती आणि त्यांच्या आत्मीय प्रतिसादाने या नात्याचे अनन्यत्व अधोरेखित झाल्याची भावना दाटून आली.
प्रत्येक आनंदाच्या क्षणी हसत-हसत, टाळी देत आनंद द्विगुणित करणार्‍या आणि मनाची कवाडं मिटून आत रूतत जाण्याच्या उद्विग्नतेत आश्‍वासक हात देऊन सोबत करणार्‍या, आयुष्याच्या सर्व टप्प्यांवरच्या सर्व स्तरांवरच्या सर्व सख्यांना अधिकाधिक स्नेहल मैत्र जुळण्याचे योग जीवनात नित्य येत राहोत आणि नितनूतन आनंदाचे निर्झर निरंतर झुळझुळत राहोत ही आजच्या दिवशी शुभेच्छा!