सोपटेंच्या पुतळ्याची हरमल तिठ्यावर होळी

0
163
दयानंद सोपटे यांच्या पुतळ्याची होळी करण्यासाठी जमलेले कॉंग्रेस कार्यकर्ते.

हरमल (न. वा.)
दयानंद सोपटे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हरमल-तिठ्यावर आयोजित केलेल्या कोपरा सभेत सोपटेंचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
दयानंद सोपटे यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजप पक्षात प्रवेश करून मांद्रे मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात केला आहे. माणुसकी विसरलेला नीतिभ्रष्ट नेता स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपला विकला गेला. मांद्रेतील जनतेने मोठ्या अपेक्षेने बदल घडवून आणला. मात्र, त्यांनी आपली प्रवृत्ती दाखवून दिली. मांद्रेतील मतदारांना फसवणार्‍या सोपटेंना येणार्‍या पोटनिवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन हरमल तिठ्यावर आयोजित निषेध बैठकीत करण्यात आले.
यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते इनासियो डिसोझा म्हणाले की, निवडून येऊन दुसर्‍या पक्षात जाण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने निवडून दिले नव्हते. तर मतदारांची कामे होणार या अपेक्षेने निवडून दिले होते. मात्र, सोपटेंनी लोकांच्या विश्वासाला तडा दिला. मांद्रेतील मतदार पोटनिवडणुकीत सोपटेंना जागा दाखवून देतील असे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाचे हरमल ग्रामप्रमुख अनिल बर्डे म्हणाले की, सोपटेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र, तसे न करता कार्यकर्त्यांचा विश्वासघात करून जनतेशी त्यांनी प्रतारणा केली. या स्वार्थी सत्तांध व्यक्तीला मतदारांनी पुन्हा दारांतसुद्धा उभे करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र साटेलकर यांनीही सोपटेवर शरसंधान करताना मांद्रेतील जनतेने पाच वर्षांसाठी दाखवलेला विश्वास केवळ दीड वर्षांतच गमावल्याची टीका केली. पावणेदोन वर्षांत कसलीच समस्या सुटली नाही. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारांना वेठीस धरण्याचे काम केले. सोपटेंच्या या चुकीला कधीच माफी नसेल असे ते म्हणाले. यावेळी फ्रान्सिस डिसोझा, संतोष मांद्रेकर, उदय म्हालदार, सदानंद वायंगणकर, उदय वायंगणकर व अन्य कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.