पाचव्या फेरीत अनुरागचा पराभव

0
111

पणजी (क्री.प्र.)
गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याला पहिल्या गोवा आंतरराष्ष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत ग्रँडमास्टर तेर साहाकयान सामवेल याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे सलग चार विजयांची त्याची मालिका खंडित झाली. चौथ्या फेरीअंती संयुक्त प्रथम स्थानी राहिलेला अनुराग पाचव्या फेरीनंतर १९व्या स्थानी फेकला गेला आहे. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रित्विज परब याने सनसनाटी कामगिरी करत ग्रँडमास्टर अभिजित कुंटेला ५४ चालींनंतर बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. ३.५ गुणांसह रित्विज ४४व्या स्थानी आहे. पाचव्या फेरीनंतर सामवेल, इदानी पावयो व सियुक विताली हे त्रिकुट प्रत्येकी ५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या लक्ष्मणन याने मॅरेथॉन लढतीत युक्रेनच्या तुखाएव ऍडमला पराभूत करत आपली गुणसंख्या ४.५ केली. महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीला कार्तिक साईने बरोबरीत रोखले. चौथ्या फेरीतील पराभवानंतर अमेय अवदी याने पाचव्या फेरीत रामकृष्ण जे. याला हरवून ५५व्या स्थानापर्यंत प्रगती साधली. नीरज सारिपल्ली, ओम बर्डे, रुबन कुलासो, उमंग कैसरे, विल्सन क्रुझ आदींनी पाचव्या फेरीत विजय मिळविले.