सोनसोडोवरील आग तीन दिवसांत नियंत्रणात आणणार

0
187

>> मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चाधिकार समितीची बैठक

सोनसोडो, मडगाव येथील कचर्‍याला लागलेली आग विझविण्यासाठी माती व पाण्याचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली असून आग व धूर येत्या तीन दिवसांत पूर्णपणे नियंत्रणात आणली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोनसोडो कचरा आग प्रश्‍नी आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, मडगावचे आमदार दिगंबर कामत, मुख्य सचिव परिमल राय, मुंबई येथील अग्निशामक दलाचे प्रमुख डॉ. प्रभात रहांगदाळे, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित राय, अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, गोवा प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगावकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, मडगावच्या नगराध्यक्ष बबिता आंगले प्रभुदेसाई, मुख्याधिकारी व इतरांची उपस्थिती होती.

सोनसोडो कचर्‍याला लागलेल्या आगीची पाहणी केली असून आग पूर्ण बंद करण्यासाठी मुंबईतील अग्निशामक दलाचे प्रमुख डॉ. प्रभात यांची मदत घेतली जात आहे. कचर्‍यास लागलेली आग बंद करण्यासाठी माती व पाण्याचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली सार्वजनिक बांधकाम खाते आणि अग्निशामक दलाचा समावेश असलेला खास गट तयार करून आग विझविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोनसोडो येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. येत्या ४ जूनला उच्चाधिकार समितीची पुन्हा बैठक घेतली जाणार असून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या सोनसोडो कचरा प्रश्‍नी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कचर्‍याला लागलेली आग विझविण्यासाठी केवळ पाण्याच्या वापरामुळे धूर तयार होत आहे. आग विझविताना धूर तयार होऊ नये म्हणून मातीचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. पहिल्यांदा मोठी आगीची घटना घडली आहे. खाली असलेला कचरा पेटत आहे. आग विझविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी खालीपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी नाविक दलाच्या मदतीने सुमारे ३.५ टन क्षमतेच्या पाण्याच्या बकेटच्या माध्यमातून आगीवर पाण्याची फवारणी केली जाऊ शकते. कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे कचरा डंप सुपूर्द करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असेही सरदेसाई म्हणाले.