- वृंदा मोये
(खोर्ली-म्हापसा)
आज करीमला आईबरोबर स्वतः चालत शाळेत येताना पाहिलं की विश्वास बसत नाही की हाच करीम पाच वर्षांपूर्वी चालू शकत नाही म्हणून आईच्या कडेवर बसून यायचा… अविश्वसनीय!!
त्या दिवशी आमच्या शाळेचं स्नेहसंमेलन चालू होतं. ‘शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा’ या गीतावर शाळेतील विशेष मुलांचं नृत्य सुरू होतं. प्रत्येक विद्यार्थ्याला या गीतामधील प्राण्यांच्या भूमिकेमध्ये मंचावर एन्ट्री घ्यायची होती. पालक तसेच शिक्षकांनी भरपूर कष्ट घेऊन मुलांना ससा, पोपट, मांजर, हरीण, माकड, मोर अशा विविध प्राण्यांच्या वेशभूषेमध्ये तयार केलं होतं. मंचावर विद्यार्थ्यांचं नृत्य उत्तमरीत्या चालू होतं. तेवढ्यात प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. मी विंगेमधूनच स्टेजवर लक्ष दिलं तर शाळेतील ६-७ वर्षाच्या आमच्या करीम या विद्यार्थ्याने ‘मोर म्हणाला…… नाच मी करीन’ या ओळीला स्टेजवर एन्ट्री घेतली होती. निळ्याशार रंगाच्या मोराच्या वेशभूषेत सुंदर, आकर्षक मोरपिसारा पाठीला बांधून छोटासा करीम दोन्ही हातांच्या मुद्रा करून स्टेजवर नाचत होता. मंचावरील त्याच्या थिरकत्या पदन्यासाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. माझ्या बाजूलाच असलेल्या करीमच्या आईकडे मी बघितलं तर तिला आनंदाश्रू आवरत नव्हते. कृतज्ञतापूर्वक तिने माझ्याकडे बघितलं आणि तिच्या भावनांचा बांध फुटला. हमसाहमशी ती रडायलाच लागली. आनंदाश्रूंचे पाट तिच्या डोळ्यातून ओघळत होते आणि त्याला कारणही तसंच होतं. दोन वर्षांपूर्वी कडेवर घेऊन शाळेत आलेल्या करीमच्या आईला आपला मुलगा चालू शकेल की नाही याचीच धास्ती वाटत होती. चिंताग्रस्त चेहर्याने ती शाळेत आली होती आणि आज आपल्या मुलाला मंचावर नृत्य करताना पाहून अभिमानाने तिचा उर भरून आला होता.
करीमला कडेवर घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी करीमची आई आली होती, तो दिवस मला आठवला. दिसायला अगदी तरुण आणि संस्कारी वाटत होती ती. करीमला मांडीवर घेऊन ती आमच्यासमोर बसली होती. चेहर्यावर अत्यंत त्रासलेले भाव आणि तरीही अगदी विनम्र स्वरामध्ये आपली व्यथा ती आम्हाला सांगत होती. अधूनमधून डोळ्यांतून टपकणारे अश्रू लपवण्याचा ती प्रयत्न करत होती. तिची व्यथा ऐकताना एखादी कथा वाचते किंवा चित्रपट पाहतेय, असं वाटत होतं. ती एम्.कॉम्.पर्यंत शिकलेली. करीमचा जन्म झाल्याबरोबर दीडएक वर्ष खूप सुखासमाधानात गेले तिचे. परंतु दोनेक वर्षांनंतर करीमच्या वागण्यामध्ये वेगळाच बदल जाणवू लागला होता. त्याच्या तोंडातून सतत लाळ गळत असे. शरीराचा तोल सांभाळून उभे राहण्यात तसेच चालण्यामध्ये त्याने खूप उशीर केला होता. तो बोलूही शकत नव्हता. खरं तर बघताना करीम खूप शांत आणि आज्ञाधारक वाटत होता. पण काहीतरी वेगळेपण त्याच्यात जाणवत होतं. म्हणून एक दिवस करीमची आई त्याला घेऊन डॉक्टरकडे गेली. बरीचशी मुलं उशिरा चालतात, उशिरा बोलतात हे ऐकून तिला माहीत होतं. पण घरातील इतर लोकांच्या आग्रहास्तव तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. करीमला तपासल्यानंतर डॉक्टरने तिला काही चाचण्यांबरोबरच करीमचा बुद्ध्यांक काढण्याचा सल्ला दिला. काही दिवसातच या सगळ्या चाचण्यांमधून निदान निघालं की करीम मतिमंद आहे, त्याचबरोबर सेरेब्रल पाल्सी या डिसऍबिलिटीने ग्रासलेला आहे.
कानांनीपण त्याला ऐकू येत नव्हतं, त्यामुळे तो बोलू शकत नव्हता. डॉक्टरने तिला करीमसाठी विशेष शाळेत प्रवेश घेऊन त्याच्या गरजेनुसार शिक्षण आणि फिजिओथेरपी, स्पीच थेरपी व ऑक्युपेशनल थेरपी घेण्याचा सल्ला दिला. जितक्या लहान वयात करीमसाठी हे उपचार सुरू होतील तेवढी त्याच्यामध्ये लवकर सुधारणा होऊन या सगळ्या अडचणींवर मात करणं सोपं जाईल… असं सांगितलं.
हे सगळं ऐकल्याबरोबर करीमच्या आईची पायाखालची जमीनच सरकली. तिला मोठा धक्का बसला. सेरेब्रल पाल्सीग्रस्त असल्यामुळे करीमच्या शारीरिक हालचाली अनियंत्रित होत्या. या प्रकारामध्ये शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवणार्या मेंदूच्या भागाला इजा झालेली असते. त्यामुळे मूल शांत बसलेलं असलं तरीही त्याच्या शारीरिक हालचाली अनियंत्रित असतात… हे कटू सत्य स्वीकारणं आणि पचवणं करीमच्या आईसाठी खूप कठीण होतं. परंतु म्हणतात ना, प्रत्येक जखमेवर काळ हेच औषध असतं. काही दिवसातच तिने स्वतःला सावरलं आणि काहीही झालं तरी करीम आपल्या काळजाचा तुकडा आहे. कुठल्याही परिस्थितीत त्याला मोठं करून स्वावलंबी बनवायचं हे स्वप्न उराशी बाळगून ती करीमसाठी अहोरात्र झटू लागली.
एखाद्या माणसाच्या जीवनात संघर्ष सुरू झाला की त्याला वारंवार अशा वेगवेगळ्या संघर्षमय परिस्थितीचा सामना करावा लागतो असं काहीसं करीमच्या आईच्या बाबतीत घडलं. सेरेब्रल पाल्सीग्रस्त आणि मतिमंद मूल जन्माला घातलंय म्हणून नवर्यासहीत सासरच्या लोकांनी तिच्याबरोबर असलेले संबंध तोडले. नियतीचा दुसरा एक फटका तिला सहन करावा लागला आणि एकेरी पालकत्वाचं ओझं तिच्या वाट्याला आलं. पण माहेरच्या लोकांनी तिला आणि करीमला आधार दिला. माहेरी राहून तिने आपल्या बाळाला वाढवायचा निर्णय घेतला. अशा कठीण परिस्थितीतही एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी मिळवली आणि स्वतःचा धीर खचू न देता विशेष मूल म्हणून सरकारकडून मिळणार्या आर्थिक सुविधांचा लाभ घेऊन करीमसाठी धडपडू लागली. आर्थिक बोजा सांभाळता सांभाळता एक आई म्हणून करीमसाठी तिचं हृदय पिळवटून जात होतं. बॉसची परवानगी घेऊन वेळ मिळेल तेव्हा ती छोट्याशा करीमला घेऊन फिजिओथेरपी, स्पीच थेरपी व ऑक्युपेशनल थेरपीसाठी सगळीकडे जात होती आणि दिवसागणिक करीममध्ये थोडीफार सुधारणा होत असल्याचं तिच्या लक्षात येत होतं. साधारण पाच-साडेपाच वर्षाच्या करीमला घेऊन ती आमच्या शाळेत आली होती. करीमला शाळेत प्रवेश मिळाल्यास एकाच ठिकाणी त्याला हे उपचार तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळतील आणि करीममध्ये सुधारणा होईल या आशेपोटी ती आमच्या शाळेत आली होती. तिची सगळी जीवनकहाणी ऐकून करीमचं नाव रीतसरपणे शाळेत नोंदवण्यात आलं आणि दुसर्या दिवसापासून करीम न चुकता शाळेत यायला लागला.
छोट्याशा करीमची एक खासियत म्हणजे वयाने लहान असूनही सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला तो उत्सुक असायचा. डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, कानाला ऐकण्याची मशीन, पायात जाडजूड बूट असे नकली अलंकार छोट्याशा शरीरावर चढवून करीम लडखडत लडखडत सगळीकडे फिरायचा. शिक्षिकेबरोबर बसून त्याच्यासाठी घेतलेले सगळे उपक्रम आनंदाने करायचा. वहीमधील उपक्रम पूर्ण झाल्यानंतर चेहर्यावर आनंदी भाव आणून नाचत नाचत तो आपली वही सगळ्यांना दाखवून प्रत्येकाकडून तो ‘हाय-फाय’ घ्यायचा. ही त्याच्यासाठी मोठी शाबासकी असायची. शाळेतील स्पीच स्थेरपीस्ट व फिजिओथेरपीस्ट या दोघींच्या प्रयत्नांमुळे करीम आता स्वतः तोल सांभाळून चांगल्या प्रकारे चालत होता. इतरांच्या आधाराची त्याला गरज भासत नव्हती. काही शब्द बोलत होता. काही इंग्रजी शब्द वाचू- लिहू शकत होता. इतकंच नव्हे तर स्वतःच्या वस्तू आवरणे, स्वतःच्या हाताने खाणे-पिणे या सगळ्या गोष्टी स्वतः करण्याइतपत करीम स्वावलंबी झालेला आहे. पाच-सहा वर्षातील त्याची ही प्रगती बघून शिक्षक तसेच करीमच्या आईच्या चेहर्यावर एक समाधानाची झळ, आनंदाची लकेर उमटलेली पाहून अत्यंत आनंद होतो.
आज करीमला आईबरोबर स्वतः शाळेत चालत येताना पाहिलं की विश्वास बसत नाही की हाच करीम पाच वर्षांपूर्वी चालू शकत नाही म्हणून आईच्या कडेवर बसून यायचा… अविश्वसनीय!!
यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती ती म्हणजे जितक्या लहान वयात या मुलांच्या पुनर्वसनाचा विचार करून आवश्यक प्रयत्न होतील तितकी सुधारणा मुलांमध्ये योग्य प्रकारे होत असल्याचे दिसून येत होते.
……….
याच सेरेब्रल पाल्सी व्याधीने जडलेल्या, २४ वर्षे वयाच्या आपल्या संदीपला घेऊन शाळेच्या अगदी शेजारील घरात राहणारे श्री. व सौ. कारखानीस नावाचे दांपत्य शाळेत आले होते. उंच-पुरा तरण्याबांड संदीपला बघितल्याबरोबर आणि त्याच्या आईवडिलांनी सांगितलेलं ऐकून आम्हाला प्रचंड धक्काच बसला. २४ वर्षांच्या आयुष्यात या संदीपने बाहेरील जगही बघितलेलं नव्हतं. तो कायम घरातील चार भिंतीच्या आड बसलेला असायचा. चालताना त्याला दुसर्यांचा आधार घ्यावा लागायचा. त्याला बोलताही येत नव्हते. केवळ खुणेनं किंवा आरडाओरड करून तो थोडंफार सांगायचा प्रयत्न करायचा. याचं कारण म्हणजे आम्ही शाळा सुरू करण्यापूर्वी म्हापशामध्ये या मुलांसाठी एकही शाळा नव्हती. आणि संदीपला घेऊन दूरवर असलेल्या कुठल्याही विशेष शाळेमध्ये ने-आण करणं त्याच्या पालकांना परवडण्यासारखं नव्हतं. कारण परिस्थिती बेताचीच. त्यामुळे संदीप जन्मापासून घरातच असायचा. संदीपला सुधारण्याची आशा सोडूनच त्याच्या आईवडिलांनी संदीपला शाळेत आणलं होतं आणि आमच्यासाठीदेखील वयाची चोवीस वर्ष पूर्ण केल्यानंतर एखाद्याचं पुनर्वसन म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. परंतु संदीपसाठी जमेल तेवढे प्रयत्न करू असं संदीपच्या आईवडलांना सांगून संदीपला शाळेत प्रवेश देण्यात आला होता. या निमित्ताने संदीपला थोडंसं इतरांबरोबर मिसळण्याची संधी, बाहेरचं जग अनुभवण्याची संधी मिळाली होती. आणि त्याच्या पालकांनाही संदीप शाळेत जातोय हा दिलासा.
एकंदरित वरील दोन्ही उदाहरणं पाहिल्यास एवढच वाटतं की डिसेबल्ड मूल जितक्या लवकर एखाद्या विशेष शाळेत किंवा पुनर्वसन केंद्रात जाऊन शिक्षण व उपचार घेईल तितक्या लवकर त्यांच्यात सुधारणा होऊन स्वावलंबी होण्याच्या शक्यता जास्त असतात. म्हणूनच वाचकांना विनंती की अशी मुलं आपल्या नजरेत आल्यास त्यांच्या पालकांना भेटून त्यांना अशा शाळांची किंवा पुनर्वसन केंद्रात जाण्यासाठी जरूर कळवावे. तीही आपणा सर्वांकडून समाजसेवाच होईल नाही का?
या लेखनप्रपंचाचा हाच तर हेतू आहे!