पालकत्त्व ः एक प्रयोगशील शाळा

0
138
  •  बीना नायक

आपल्या प्रेमाला आणि आपल्या बुद्धीला सतत आव्हान करुन आपल्यातला माणूस सतर्क ठेवण्याचा प्रयत्न आपली मुलं जाणीवपूर्वक करत असतात. माणसातलं निरागसपण जपायचं असेल तर मुलांच्या सहवासात राहण्यासारखं औषध नाही.

सकाळी चहा झाल्याबरोबर वर्तमानपत्रावर एक ओझरती दृष्टि टाकण्याची रोजची सवय. पण इथे आल्यापासून कन्नडमध्ये ‘विजयवाडी’ आणि इंग्रजी ‘हिंदू’. कितीही झालं तरी नवीन पेपर. इथले लोक वेगळे, त्यांच्या परंपरा, भाषा, चालणंबोलणं सगळंच वेगळं. काही केल्या ते पेपर आपलेसे वाटेनात. मग सुरुवातीला हिंदू फक्त वरचेवर चाळायची सवय लावून घेतली. तसंच काही वाचण्यासारखी ठळक मथळ्यात बातमी असेल तरच ती मी वाचत असे. कन्नड तर वाचण्याचा प्रश्‍नच नव्हता. आज नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र उघडलं तर आतमध्ये चिन्मय आश्रमची जाहिरात. इथे आल्यापासून जवळपासची ठिकाणं, नवीन रस्ते, काही पाहण्याजोगी स्थळं पाहण्याचा मी शिरस्ताच लावला होता. जाहिरात वाचून ‘अरे, इथेसुद्धा चिन्मय मिशन आश्रम’ आहे तर… म्हणून बरं वाटलं. मुलाला म्हटलं संध्याकाळी जाऊन बघून येऊया. त्यांचे काही कार्यक्रम असतील तर तीही माहिती मिळेल. नव्या ओळखी होतील.

संध्याकाळी जरा लवकरच गाडी बाहेर काढली. नारायणपूरचा रस्ता कुठे म्हणून विचारत विचारत गेलो. खुद्द नारायणपूर पोचल्यावर मात्र पंचाइत. तिथे कुणालाच चिन्मय आश्रम माहीत नव्हता. एकतर आम्हाला भाषा बरोबर येत नव्हती. त्यांनी कानडी बोललेलं आम्हाला कळत नसे, आम्ही विचारलेलं त्यांना… कुणी कुणी दाखवलेल्या वाटा, वळणं घेत घेत शोधून एकदाचा बोर्ड दिसला आणि जीव भांड्यात पडला. जरा तिथे काही वेळ थांबून घरी परतावं म्हटलं तर मला गोंधळल्यासारखं झालं. काही दुकानाच्या पाट्या, लँडमाकर्‌‌स मी आठवणीत ठेवले होते. देवाचं नाव घेत गाडी स्टार्ट केली. मुलाला म्हटलं, ‘‘अरे, पोहचू ना रे आम्ही सारखी घरी? मला तर पार गोंधळल्यासारखं झालंय. रस्ता बरोबर आहे ना रे?’’ तर म्हणतो कसा, ‘‘मम्मा का उगाच डिस्टर्ब होतेस, याच्या आधी आमच्यावर कितीतरी संकटं आली आहेत ना? पोचणार आम्ही व्यवस्थित. शांत हो आणि चालव गाडी.’’ त्याचे ते शब्द खरंच अनुभवाचे बोल होते. एकेरी पालकत्व झेलताना आलेल्या असंख्य अडचणींवर मात करतच आम्ही आयुष्य जगत आलेलो होतो. त्या एवढ्याशा जिवाने सगळं बघितलेलं होतं.

तसं पाहिलं तर खरंच रोजच्या रोज आपल्या गळ्यात पडणारी आपलीच मुलं आपल्याला खूप काही शिकवत असतात. हे वाक्य ऐकायला थोडं जड असलं तरी खरं आहे.
थोडंसं मागे वळून पाहिलं तरी आपल्याला याची सहज प्रचिती येईल. त्यांच्या बाललिलांमध्ये आपण हरखून जातोय याचं भान आलं की एक निरागस प्रेम आपल्याला मिळाल्यामुळे आपल्यातच खूप बदल झालाय हे आपल्याला कळायला लागतं आणि आपण विचाराभिमुख होऊ लागतो. आपल्या पालकत्वाला एक वेगळी दिशा मिळू लागते. मला तर वाटतंय की पालकत्व ही मोठ्या वयातील एक ‘प्रयोगशील शाळा’ आहे. त्या शाळेत लेखी परिक्षा नसते, पण रोजच एका तोंडी परिक्षेला आणि एका अटीतटीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आपण आपसुकपणेच इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, भाषा या विषयांचा अभ्यास करतो आणि मुख्य म्हणजे न कंटाळता करतो. (आपण शाळेत असताना हा कंटाळा केलेला असतो बरं!!) आणि असा हा अभ्यास करताना मज्जा येत असते. केवढा मोठा आणि चांगला बदल होतो आपल्यात.
आपणच मुलांकडून खूप नवीन गोष्टी शिकतो आणि त्या त्या नवीन गोष्टींना आपण खूप चांगल्या प्रकारे सामोरे जातो. आपल्यातल्या संयमाची तर क्षणोक्षणी परीक्षा असते. ‘प्रेम आणि आपुलकी’ या दोन शब्दांना आपली मुलं जो अर्थ प्राप्त करुन देतात, त्याला तर काही तोडच नसते. खूप साधे आणि वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या या शब्दांमध्ये प्राण ओतण्याचं काम आपली ही मुलं करतात आणि आपल्या आयुष्याचा सगळा नूर अगदी बदलून जातो. हा बदललेला नूर आपल्याला खूप काही शिकवत असतो. अजून आपल्याला खूप काही करायचं आहे याची जाणीव आणि सोबत बळही देत असतो.

आपल्याच एका नवीन रूपाला सामोरं जाताना आपलाच एक अंश आपल्या सतत मदतीला धावून येत असतो. ‘माझं अंशरूप – माझं मूल’ ही भावना खूप सुखावणारी असते. माझ्या अंश रूपाला स्वतंत्र अस्तित्व आहे, हे मान्य करतानाच आपल्याला त्याच्याकडून खूप शिकायला मिळतंय ही भावनाही सुखावह असते. किती किती गोष्टी शिकतो आपण मुलांकडून? जीवनातल्या अनेक गोष्टी आपल्या मुलामुळे बदलून जातात हे मात्र सत्य. प्लान नसणारं आपलं आयुष्य एकदम वळणदार होतं. ‘सेट’ होतं. एक मानसिक गुंतवणूक असते आपल्या सगळ्या करण्यात. ‘‘बस, आता आपल्या मुलाशिवाय आपल्या आयुष्यात कशालाच स्थान नाही’’ ही भावना आपल्याला खूप कार्यप्रवृत्त करणारी असते.

आपल्या मुलांना सहज जगण्याचं शिकवताना आपणही खूप सहज होऊन जातो आणि आपल्याला सगळ्या नात्यांकडे बघण्याची एक निकोप दृष्टि मिळू लागते. नात्यातला कडवटपणा दूर सारण्याची आणि सुसंवादाचं नातं निर्माण करण्याची एक प्रेरणाही आपली मुलंच देतात. आपल्या प्रेमाला आणि आपल्या बुद्धीला सतत आव्हान करुन आपल्यातला माणूस सतर्क ठेवण्याचा प्रयत्न आपली मुलं जाणीवपूर्वक करत असतात. माणसातलं निरागसपण जपायचं असेल तर मुलांच्या सहवासात राहण्यासारखं औषध नाही.