सृष्टीची विविधता

0
67

योगसाधना – ५३१
योगमार्ग – राजयोग
अंतरंग योग – ११६

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपले पूर्वज समाजाबद्दल जागरूक होते. म्हणून विविध समस्यांवर उत्कृष्ट शास्त्रीय उपाय शोधण्यात ते प्रयत्नशील असत. कारण मानवाचा सर्व पैलूंनी योग्य जीवनविकास व्हावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती व त्याबरोबर त्या दिशेने प्रयत्नसुद्धा होते.

सृष्टी ही विविधतेने भरलेली आहे हे आपण जाणतोच. हीच तर तिची सुंदरता आहे. सर्वांत आधी पंचमहाभूते – पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. प्रत्येकाचे रंग, रूप, कार्यसुद्धा विविधतेने नटलेले. या पृथ्वीचीही विविध रूपे- विविध प्रकारच्या रंगांची माती-दगड-धोंडे-रेती… जलाची विविध रूपे – गोड पाणी, खारट पाणी त्याचबरोबर द्रव-बाष्प-बर्फ. वायूमध्येसुद्धा विविध घटक- प्राणवायू, कर्बवायु, हायड्रोजन हे प्रमुख. त्याशिवाय इतर अनेक वायू. अग्नी म्हणजे तेज- तेही विविध रूपात- सूर्याचे कोवळे ऊन- कडक ऊन. थंडीच्या दिवसात ऊब देणारा, पाणी गरम करणारा, भोजन बनवणारा व काही वेळा जाळून नाश करणारा. आकाश म्हणजे पोकळी. त्याचेही विविध आकार, रंग.
अशीच विविधता जीव-जंतू-कृमी-कीटक-पशू-पक्षी-प्राणी-वृक्ष-वनस्पती यांमध्येदेखील आहे. मानवामध्ये तर विचारूच नका- राष्ट्र, वंश, वर्ण, लिंग, रंग. संस्कृती, शिक्षण, स्थिती, परिस्थिती…यांमध्ये विविधता पण या सर्वांमध्ये एकसूत्रतासुद्धा आहे. म्हणून जीवनात सुखशांती आहे.

भारतीय संस्कृतीनुसार या संपूर्ण सृष्टीचा एक निर्माता आहे; एक सांभाळ करणारा आहे व एक संहारकसुद्धा आहे. त्याचीही वेगवेगळी रूपे आहेत. हेच तर भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ती सर्वग्राही व सर्वसहिष्णू आहे. हे सर्व तत्त्वज्ञान आपल्या ऋषीमहर्षींच्या घोर साधनेतून, तपश्‍चर्येतून आले आहे.
सर्वत्र ईश्‍वराचे अस्तित्व स्वीकारले तर प्रत्येक पैलूंत फायदे दिसतात.
पू. पांडुरंगशास्त्री सांगतात…
१. नैतिकता – मनुष्याचे जीवन नैतिक बनते व त्यामुळे विशुद्ध बनते.
२. सांस्कृतिक जीवन – भगवंताच्या प्रेमाने प्रकटणार्‍या आवेशामुळे स्वाभाविकरीत्या क्रियाशील बनते.
३. आध्यात्मिक उन्नतीमध्येही ईश्‍वराच्या कोणत्यातरी एका रूपात रमत असलेले त्याचे मन त्याला फारच साहाय्यक बनते.
या तीनही उन्नत जीवनाचे प्रतिबिंब त्याच्या भौतिक जीवनावर सकारात्मक परिणाम करते. त्यामुळे * भौतिक जीवनही शांत, स्तब्ध व समाधानी बनते.
खरेच एका महापुरुषाने किती खोल विचार व चिंतन केले आहे या विषयावर! आपणही थोडाफार अभ्यास व विचार केला तर या मुद्याचे महत्त्व लक्षात येईल.

भारतात भगवंताच्या रूपातही पुष्कळ विविधता आहे- लिंग, कार्य… यांच्यानुसार आणि विविध रूपे आहेत.

  • देवी ः सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी ः प्रत्येकीचे कार्य वेगळे –
    सरस्वती- ज्ञान, विद्येची देवता, दुर्गा- शक्तीची देवता, लक्ष्मीची अनेक रूपे- वित्तलक्ष्ी, विचार लक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, प्रेमलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी.
    दुर्गा – शांत शांतादुर्गा तर उग्र रूपात महिषासुर मर्दिनी, माता पार्वतीही तिचेच रूप.
  • देव – ब्रह्मा विष्णू महेश.
    विष्णूचे अनेक मानवी अवतार. त्यात मुख्य म्हणजे राम, कृष्ण, बुद्ध.
    त्याशिवाय वेगवेगळ्या रूपातदेखील देव आहेत जसे हनुमान – वानर रूपात; गणेश – गजमुख रूपात.
    मुख्य म्हणजे यातील प्रत्येक रूपामागे एक उच्च तत्त्वज्ञान आहे. त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
    व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वरूपाची- आपल्या इष्ट देवतेची पूजा करतो. आपल्या संस्कृतीत या संदर्भात कुठलाही दुराग्रह नाही. प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, रुचीनुसार कुठल्याही देवदेवतेची उपासना करू शकतो. भगवंताची सर्वच रूपे सुंदर, आकर्षक, मनोहारी आहेत. या विषयावर एक छान श्‍लोक आहे…
    ‘दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव|
    तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् ॥
  • खरेच, दही, मध, द्राक्ष सगळेच मधुर आहेत. पण प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी मधुरता जाणवेल. तसेच भगवंताच्या रूपाचे आहे. प्रत्येकाची आवडनिवड वेगळी. शेवटी भोजनातील वस्तू प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे निरनिराळ्या असतात. त्याबद्दल आग्रह धरू नये.

भारतात या विषयावर पुष्कळ विचार झालेला आहे. या संदर्भात शास्त्रीजी भारतीय तत्त्वचिंतकांनी केलेली धर्माची छान व्याख्या सांगतात –

  • प्रामाण्यबुद्धि वेदेषु साधनानां अनेकता |
    उपास्यानां अनियमः एतद् धर्मस्य लक्षणम् ॥
  • मानवाने स्वतःच्या जीवनात कोणतातरी उपास्य देव स्वीकारला पाहिजे. मूर्तीचे महत्त्व चित्त एकाग्र करण्यासाठी असल्यामुळे मानवाने स्वतःची ध्यानमूर्ती सतत एकच राखली पाहिजे, ज्याच्यामुळे साधनेत सरलता राहील.

सूक्ष्म विचार केला तर लगेच लक्षात येते की सृष्टिचालक नि विश्‍वसंचालक शक्ती एकच आहे. विविध व्यक्तींनी आपापल्या समजुती-ज्ञान-अभ्यास- अनुभव व अनुभूतीनुसार त्याला विविध नावे दिली आहेत. त्यामुळेच विविध रूपे, तथाकथित धर्म, संप्रदाय…निर्माण झाले. एकाच धर्मात अनेक मते व त्यामुळे मतभेद उत्पन्न झाले. धर्मावर आधारित लढायादेखील झाल्या. मूळ तत्त्वज्ञान बाजूलाच राहिले व समाजात तेढ मात्र निर्माण झाली. दिवसेंदिवस हे गैरसमज वाढतातच आहेत. गरज आहे ती म्हणजे या विषयावर पुन्हा एकदा विचार करण्याची.
इतिहासाकडे नजर फिरवली तर आपल्या सनातन धर्मामध्येही अशा समस्या होत्या. त्यांच्यामध्ये संघर्ष झाले. शास्त्रीजी हा विषय समजावताना म्हणतात –

  • वैष्णव ‘शिव’ शब्दाचा उच्चारच करीत नाहीत.
  • शैवपंथी एकादशीच्या दिवसात कांदा खातात.
    इथपर्यंत द्वेषजन्य बालिशता विभिन्न संप्रदायात पाहायला मिळते.
  • श्रीमद् आद्य शंकराचार्य शिवोपासक आहेत असे मानून कित्येक वैष्णव शंकराचार्यांच्या नावाचा जणुकाय विटाळ मानतात. परंतु आद्यशंकराचार्यांनी श्रीकृष्णभक्तीची भाववाही व रसवाही स्तोत्रे रचली आहेत.. याबद्दल त्यांचे घोर अज्ञान आहे.
    या सर्व घटनांवर एक उत्तम उपाय म्हणून शंकराचार्यांनी जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. या पूजेनुसार – * गणपती * शिव *हरी *भास्कर आणि * अंबा या पाच देवतांचे पूजन झाले पाहिजे.

या पाच देवतांतील कोणती देवता मुख्य असेल त्याचा निर्णय प्रत्येकाने स्वतःची बुद्धी, ज्ञान, भावानुसार घेण्याची प्रत्येकाला सूट आहे,. जी देवता प्रधान असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करावी. त्यामुळे विविध प्रकारचे पंचायतन समाजात दिसतात- गणेश पंचायतन, शिव पंचायतन वगैरे. याचे अनेक फायदे झाले…
१. प्रत्येक व्यक्तीला भावनिक समाधान प्राप्त झाले.
२. समाजातील विभिन्न संप्रदायातील रागद्वेष कमी झाले.
आपले पूर्वज समाजाबद्दल जागरूक होते. म्हणून विविध समस्यांवर उत्कृष्ट शास्त्रीय उपाय शोधण्यात ते प्रयत्नशील असत. कारण मानवाचा सर्व पैलूंनी योग्य जीवनविकास व्हावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती व त्याबरोबर त्या दिशेने प्रयत्नसुद्धा होते.
पंचायतन पूजा योग्य रीतीने समजली तर अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. मानवी जीवनाचे विविध पैलू अत्यंत प्रभावी असायला पाहिजेत.

  • व्यक्तिजीवन, * कुटुंबजीवन, *समाजजीवन * राष्ट्रजीवन * वैश्‍विक जीवन… या प्रत्येक पैलूत योग्य उन्नती अपेक्षित आहे.
    ‘‘कृण्वंन्तो विश्‍वं आर्यं’’.
    मानवाला ज्या पाच तत्त्वांची गरज असते आणि सूज्ञांना त्यांची भूक आहे त्यांना या पूजेत आवश्यक मार्गदर्शन लाभते.
  • गणपतिपूजन म्हणजे बुद्धी पूजन.
  • शिवपूजन म्हणजे ज्ञानपूजन
  • हरीपूजन म्हणजे लक्ष्मीपूजन
  • भास्कर पूजन म्हणजे तेज पूजन
  • अंबापूजन म्हणजे शक्तीपूजन
    सुरुवातीपासूनच आपण वैश्‍विक विविधतेवर विचार करत आहोत. पण यात पंचायतनपूजन करून पूर्वजांनी कशी सुसूत्रता आणली याचा विचार केला तर त्यांचा अभिमान वाटतो. त्यांची वैचारिक व बौद्धिक उंची समजते.
    योगसाधक पंचायतन पूजन करीतच असतील. आता त्यामागील तत्त्वज्ञान समजल्यामुळे ही पूजा भावपूर्ण होईल, निःसंशय!