सूर्यावर थुंकणारा काजवा

0
31

भारत जोडायच्या नावे मतांचा जोगवा मागायला निघालेल्या राहुल गांधींनी नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुन्हा गरळ ओकली. आम्हाला आठवते त्याप्रमाणे, काही वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर ‘भारत बचाव’ रॅलीत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर ‘माफी मागायला मी सावरकर नव्हे’ असे कुजकट वक्तव्य त्यांनी केले होते. तेव्हा ‘तुम्ही सावरकर नव्हेच’ असा अग्रलेख आम्ही लिहिला होता. ‘सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्याचे आजवर कॉंग्रेसने प्रचंड भांडवल केले. ते करीत असताना सावरकरांनी या देशासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, जो असीम त्याग केला, जे असामान्य धैर्य दाखवले, ज्या हालअपेष्टा भोगल्या, त्यांच्याप्रती कणमात्र कृतज्ञता दाखविण्याचे सौजन्य त्यांच्या नेत्यांपाशी कधीच नव्हते.’ असे आम्ही त्यात म्हटले होते. ज्या कॉंग्रेसने पंडित नेहरूंचे कर्तृत्व झाकोळू नये म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोसांपासून शहीद भगतसिंगांपर्यंत आणि सरदार पटेलांपासून लालबहादूर शास्त्रींपर्यंत सगळ्यांना अडगळीत ढकलण्याचा सतत प्रयत्न केला, त्या पक्षाचा वारसा सांगणार्‍या राहुल गांधींकडून दुसरी अपेक्षा ती काय करायची? जी व्यक्ती लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या एका पराभवानंतर पक्षाध्यक्षपद सोडून रातोरात पळून गेली, तिने मार्सेलिसच्या समुद्रात त्रिखंडात गाजलेली उडी टाकणार्‍या, पन्नास वर्षांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेला धैर्याने सामोरे गेलेल्या, जुलुमी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र चळवळ उभारण्याचा प्रयत्न करणार्‍या सावरकरांवर बोलावे? सावरकरांना जे भोगावे लागले, ते भोगण्याची वेळ आली असती, तर राहुल गांधींचे काय झाले असते त्याची तर कल्पनाही करवत नाही. केस पांढरे झाले तरी त्यांच्या बाललीला अजून सरताना दिसत नाहीत, ही आधीच रसातळाला चाललेल्या कॉंग्रेससाठी मोठी शोकांतिकाच आहे.
राहुल गांधींनी सावरकरांचा जो कथित माफीनामा फार मोठा शोध लावल्यागत परवा झळकावला, त्यावर यापूर्वी खूप चर्वितचर्वण झाले आहे. कॉंग्रेसच्याच मणीशंकर अय्यर यांनी अंदमानातील सेल्युलर तुरुंगापुढील सावरकरांच्या नावाची पाटी उखडण्याचा नीचपणा केला होता, तेव्हाही हा विषय विस्ताराने चर्चिला गेला होता. परंतु राहुल गांधींचा कंडू अद्याप शमताना दिसत नाही. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्याच्या नादात ते पोथीनिष्ठेपेक्षा बुद्धिनिष्ठ वैज्ञानिकवादाचा आग्रह धरणार्‍या, जातिनिर्मूलनाचे कृतिशील पुरस्कर्ते असलेल्या आणि गोपूजनापेक्षा गोरक्षण महत्त्वाचे असे ठासून सांगणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांना मध्ये का खेचत आहेत? सावरकरांविषयी गरळ ओकून आणि तीही त्यांची तथाकथित ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आलेली असताना, यातून मने जोडली जातील की तुटतील हेही ज्यांना कळत नाही, त्यांच्या अपरिपक्वतेविषयी काय बोलावे? जे राहुल सावरकरांविषयी पुन्हा पुन्हा ही गरळ ओकत आहेत, त्यांच्याच आजीने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख ‘ब्रिटिशांचा निधेडपणाने प्रतिकार करणारा वीर’ असा केला होता, त्यांच्यावर टपाल तिकीट काढले होते हे बघण्याची तसदीही राहुल यांनी घेतलेली दिसत नाही. सावरकरांच्या माफीनाम्याचे जे कथित पत्र राहुल गांधी फडकवत आहेत, त्यातील केवळ शेवटची ओळ उद्धृत करीत आहेत. लक्षात घ्या, अवघ्या २८ वर्षांच्या त्या तरुणाला पन्नास वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. आजही दुर्गम असलेल्या अंदमानच्या कारागृहाचा कराल जबडा ३० जून १९११ रोजी त्यांना आत घेऊन पन्नास वर्षे कुजविण्यासाठी उघडला गेला होता. सहा महिन्यांचा एकांतवास आणि नंतर छोट्याशा कोठडीत तब्बल दहा वर्षे प्रत्यक्ष शिक्षा त्यांनी भोगली. कोलू पिसण्यासारखा तेथील सगळा छळ सोसला. पहिल्या आठ वर्षांत त्यांना त्यांच्या कुटुंबालाही भेटू दिले गेेलेले नव्हते. हे सगळे सोसूनही आपले प्रखर मनोबल शेवटपर्यंत टिकवलेली ही व्यक्ती आहे. सावरकर उच्चशिक्षित होते, बॅरिस्टर होते. त्यामुळे या काळकोठडीत सडत पडून सगळा जन्म वाया घालवण्यापेक्षा येथून बाहेर पडता आले, तर काही देशसेवा आपल्या हातून घडू शकेल असे जर त्यांना वाटले असेल तर त्याच चुकीचे काय? छत्रपती शिवाजी महाराजांनाही आग्रा भेटीआधी पुरंदरचा तह करून तत्पूर्वी जिंकलेल्या तेवीस किल्ल्यांवर पाणी सोडावे लागले होतेच ना? म्हणून त्यांना पळपुटे म्हणाल? सावरकरांनी तुरुंगातून ब्रिटिश सरकारला वेळोवेळी ज्या याचिका केल्या आहेत, त्या वाचल्या तर त्यात मुत्सद्दीपणा स्पष्ट दिसतो. ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण | तुज सकल चराचर शरण’ म्हणणार्‍या त्यांच्या प्रखर देशभक्तीला त्यातून कुठेही उणेपण येत नाही. सावरकरांवरील राहुल गांधींची टीका हा काजव्याने सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.