सूर्यनमस्कार जीवनाचा घटक बनावा!

0
27
  • – डॉ. पंकज अरविंद सायनेकर

नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे मानसिक स्थैर्य, भावनांवरील ताबा, हजरजबाबीपणा वगैरे अनेक फायदे होतात. मुख्य म्हणजे स्वतःमध्ये शिस्तता, शिस्तबद्धता येते. आणि ही शिस्त फक्त नमस्कारांपुरतीच नाही तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत दिसून येते.

आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने|
आयुः प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते॥
सूर्यनमस्कार! सूर्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता. तीसुद्धा आपल्या शरीरवर्धनासाठी उपयुक्त अशा पद्धतीची आसने. म्हणजे सूर्यदेवापुढे नतमस्तक होणे आणि त्याचा फायदाही स्वतःच्या शरीराला होणार. त्यासाठी ना वयाचे बंधन ना विशिष्ट समाजाचे, न जागेचे बंधन आणि ना सूर्यनमस्कारांच्या आकड्यांचे! यथाशक्ती आपण जितके, जिथे आणि जसे करू शकू तसे सूर्यनमस्कारांची आवर्तने करावीत. जसे आपण रोज जेवतो, इतर रोजची कामे करतो, तसेच ‘सूर्यनमस्कार’ जीवनाचा घटक बनवण्याचा प्रयत्न करावा.

वरील श्लोकात जसे म्हटले आहे की, मी प्रत्येक दिनी सूर्याला नमस्कार करीन, जेणेकरून आयुः म्हणजे आरोग्य, प्रज्ञा म्हणजे बुद्धी (चुणूकता किंवा तीक्ष्णता ज्यामध्ये प्रकर्षाने जाणवेल), बल म्हणजे पिळदार शरीर आणि वीर्य म्हणजे वीरता (कोणत्याही परिस्थितीला खंबीरपणाने सामोरे जाणाची क्षमता).

सूर्यनमस्कार हे आठ, दहा, बारा, तेरा, अठरा किंवा एकवीससुद्धा आसनांमध्ये केले जाऊ शकतात. प्रत्येकाने जो सूर्यनमस्काराचा प्रकार आहे तो नीट समजून घ्यावा आणि रोज सराव करण्याचा प्रयत्न करावा. साधारणपणे बारा आसने असलेला सूर्यनमस्कार खूपकडे पाहावयास मिळतो. यामध्ये नमस्कारस्थिती, हस्त-उत्तानस्थिती, पदहस्तासन स्थिती, अश्वसंचालन स्थिती, दंडासन किंवा चतुरंग दंडासन स्थिती, अष्टांग-प्रणिपादासन स्थिती, भुजंगासन स्थिती आणि पर्वतासन स्थिती अशी आठ आसने केली जातात.

सूर्यनमस्कार करताना शांत, रम्य वातावरण (नदीकिनारी किंवा तत्सम ताजेतवाने ठिकाणी) अथवा स्वतःच्या खोलीत (शक्यतो खेळती हवा असावी) प्रसन्न चित्ताने करावा. समजा मंत्रोच्चारण होत नसेल किंवा जमत नसेल तर फक्त आसनांचा सराव योग्य क्रमाने करावा. सुरुवातीला बारा सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करावी. (एका नमस्कारात बारा आसने) आणि हळूहळू ती संख्या वाढवावी. साधारणपणे दरदिवशी एकशे आठ सूर्यनमस्कार आपण करू शकतो. पण त्यासाठी शरीरसाथ, वेळ, थकवा, जागा, मनाची तयारी इत्यादी निकष लक्षात घ्यायला हवेत. समजा थकवा असेल किंवा तब्येत बेताची असेल तर मोजकेच केले तरी हरकत नाही; परंतु शक्यतो नमस्कार करण्यास टाळाटाळ करू नका. हा फक्त शारीरिक व्यायाम नसून जो सूर्याप्रती कृतज्ञतेचा भाव आहे तो लक्षात घ्यावा. सूर्य, जो आपल्याला शक्ती देतो, ज्याच्यामुळेच हे जग चालते आणि चालू शकते, त्याच्या चरणी आपली प्रार्थनारूपी सेवा अर्पित करावी. सकाळचे कोवळे ऊन शरीराला किती आवश्यक आहे हे आपण सर्वच जाणतो. त्वचेचे विकार खूप प्रमाणात बरे होतात. ‘विटामीन-डी’सारखी जीवनसत्वे अनायसे आपणास मिळून जातात. सबंध शरीरास व्यायाम मिळतो, जेणेकरून शरीरवर्धनात्मक फायदे मिळतात. रक्ताभिसरण संस्थेची कार्यप्रणाली सुधारते. शरीरातील जवळपास सर्वच स्नायूंना व्यायाम मिळाल्यामुळे ते डौलदार आणि सुदृढ बनतात.

श्वसनसंस्थेचे कार्य सुधारते. फुफ्फुसे मजबूत झाल्याने प्राणवायू योग्य प्रमाणात घेतला जातो, त्याचबरोबर सबंध शरीरात मूबलक प्रमाणात पोचवला जातो. हे झाले फक्त शारीरिक फायदे. नियमित सूर्यनमस्कार सरावामुळे मानसिक स्थैर्य, भावनांवरील ताबा, हजरजबाबीपणा (किंवा एखाद्या परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता) इत्यादी व असे अनेक फायदे होतात. मुख्य म्हणजे स्वतःमध्ये शिस्तता, शिस्तबद्धता येते. आणि ही शिस्त फक्त नमस्कारांपुरतीच नाही तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत दिसून येते.

मला सूर्यनमस्काराची सवय अगदी बालवयातच लागली. सूर्यनमस्कार किंवा एकंदर योगाभ्यासाबद्दल मला प्राथमिक शिक्षण देणारे माझे योग गुरुजी, तसेच माझ्या योगज्ञानात भर घालणारी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी यांचा मी सदैव ऋणी राहीन. दैवयोगाने मला सूर्यनमस्कार या क्षेत्रात आतापर्यंत चार विश्वविक्रम करता आले. ते करत असताना कितीतरी मंडळींनी मदत केली, ज्यामुळे फक्त विक्रम करण्यासाठीच नव्हे तर एकंदर आयुष्यात त्याची मला खूप मदत झाली. प्रत्येक विक्रम करतानाचे अनुभव सूर्यनमस्कार या विषयातील खोली, गहनता समजावून गेले. सूर्यनमस्कारांचे अमुक अंक झाल्यानंतर शरीरातील स्थिती कशी आहे, आपली शारीरिक क्षमता किती आहे आणि आपण ती किती, कशी वाढवू शकतो हे आणि अशा पद्धतीच्या अनुभवांची शिदोरी रोजच्या सरावात नेहमीच कामी येते. समाजाला योग-अभ्यासाचे धडे देताना त्यांचा अनुभव व त्यांचे अभिप्राय खूप काही शिकवून जातात. त्यांच्या शारीरिक समस्या कमी करण्यात माझाही खारीचा वाटा आहे, ही भावना किंवा हा विचार मनाला समाधान देतो. त्याचबरोबर आणखीनही कामं करण्यास प्रवृत्त करतो. एका गृहस्थाने मला येऊन सांगितले की, तुम्ही केलेल्या सूर्यनमस्कार विक्रमांमुळे प्रेरित होऊन माझा मुलगा नियमित सूर्यनमस्कार घालू लागलाय. तुम्ही त्याचे प्रेरणास्रोत आहात. हे ऐकून आनंद तर होतोच पण अशा प्रतिक्रिया जबाबदारीही वाढवतात.

सूर्यनमस्कारांमुळे माझ्यावर असे चांगले संस्कार झालेत आणि आज देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जो सामूहिक सूर्यनमस्कारांचा उपक्रम चालू आहे ते पाहून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपलाही सहभाग झाला असावा अशी भावना मनात येते. हा सूर्यनमस्काराचा उपक्रम इथेच मर्यादित न ठेवता नित्यक्रम व्हावा अशी कामना करतो.