‘सुपर ओव्हर’मध्ये भारताची बाजी

0
104

>> सलग दुसर्‍या लढतीत न्यूझीलंडची हाराकिरी

सलग दुसर्‍या ‘सुपर ओव्हर’मध्ये न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. चौथ्या लढतीत निर्धारित २० षटकांत भारताने ८ बाद १६५ धावा केल्यानंतर न्यूझीलंडला ७ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचता आले. त्यामुळे सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. या सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले १४ धावांचे लक्ष्य भारताने ५ चेंडूत गाठले.

भारतीय संघाने गोलंदाजीत आश्वासक सुरुवात करत मार्टिन गप्टिलला लवकर माघारी धाडले. मात्र यानंतर कॉलिन मन्रो आणि टीम सायफर्ट यांनी आक्रमक फटकेबाजी करत सूत्रे आपल्या हाती घेतली. भारतीय गोलंदाजांवर चौफेर हल्लाबोल चढवत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान मन्रोने आपले अर्धशतकही साजरे केले. या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केलेली असतानाच मन्रो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.यानंतर लगेचच चहलने टॉम ब्रुसला माघारी धाडत न्यूझीलंडची ३ बाद ९७ अशी स्थिती केली.

अखेरच्या षटकांतमध्ये भारतीय गोलंदाज वरचढ होत असल्याचं दिसताच, टीम सेफर्टने पुन्हा एकदा फटकेबाजी करत सामन्यावर न्यूझीलंडचं वर्चस्व प्रस्थापित केलं. नवदीप सैनीने १९ व्या षटकात भेदक मारा करत केवळ चार धावा दिल्या. त्यामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने मनीष पांडेचे नाबाद अर्धशतक आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर १६५ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्मा, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यांना विश्रांती देत भारताने संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर व नवदीप सैनी यांना संधी दिली. सैनीचा अपवाद वगळता इतर दोघांनी निराश केले. सॅमसन अवघ्या ८ धावा काढत कुगलेनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यामुळे भारताला चांगल्या सुरुवातीपासून वंचित रहावे लागले.यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनादेखील छाप पाडता आली नाही. एका टोकाने गडी बाद होत असताना राहुलने परिस्थितीनुरुप खेळ केला. डावातील नवव्या षटकात राहुल तर ११व्या षटकात दुबे परतला. त्यामुळे भारताची ५ बाद ८४ अशी स्थिती झाली होती. मधल्या फळीत मनीष पांडे याने समयोचित खेळ दाखवत मैदानी फटक्यांना पसंती दिली. त्याने एकेरी-दुहेरी धावांवर अधिक भर देत धावफलक सतत हलता ठेवला. शार्दुल ठाकूरने २० व सैनीने ११ धावांचे योगदान दिल्याने भारताला १५०च्या पार जाता आले.
न्यूझीलंडकडून फिरकीपटू ईश सोधीने ३, हॅमिश बेनेटने २ तर टिम साऊथी-कुगलेन आणि सेंटनर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
सुपर ओव्हर
सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने १ गडी गमावून १३ धावा केल्या. पहिल्या दोन चेंडूंत दहा धावा करून तिसर्‍या चेंडूवर राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीने पुढील चेंडूवर दोन धावा व यानंतर चौकार ठोकत भारताचा विजय साकार केला. न्यूझीलंडला या लढतीत केन विल्यमसनची कमतरता जाणवली. खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात त्याला खेळता आले नाही.

धावफलक
भारत ः लोकेश राहुल झे. सेंटनर गो. सोधी ३९, संजू सॅमसन झे. सेंटनर गो. कुगलेन ८, विराट कोहली झे. सेेंटनर गो. बेनेट ११, श्रेयस अय्यर झे. सायफर्ट गो. सोधी १, शिवम दुबे झे. ब्रुस गो. सोधी १२, मनीष पांडे नाबाद ५० (३६ चेंडू, ३ चौकार), वॉशिंग्टन सुंदर त्रि. गो. सेंटनर ०, शार्दुल ठाकूर झे. साऊथी गो. बेनेट २०, युजवेंद्र चहल झे. सायफर्ट गो. साऊथी १, नवदीप सैनी नाबाद ११, अवांतर १२, एकूण २० षटकांत ८ बाद १६५
गोलंदाजी ः टिम साऊथी ४-०-२८-१, स्कॉट कुगलेन ४-०-३९-१, मिचेल सेंटनर ४-०-२६-१, हॅमिश बेनेट ४-०-४१-२, ईश सोधी ४-०-२६-३
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. राहुल गो. बुमराह ४, कॉलिन मन्रो धावबाद ६४ (४७ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार), टिम सायफर्ट धावबाद ५७ (३९ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार), टॉम ब्रुस त्रि. गो. चहल ०, रॉस टेलर झे. अय्यर गो. ठाकूर २४, डॅरेल मिचेल झे. दुबे गो. ठाकूर ४, मिचेल सेंटनर धावबाद २, स्कॉट कुगलेन नाबाद ०, अवांतर १०, एकूण २० षटकांत ७ बाद १६५
गोलंदाजी ः शार्दुल ठाकूर ४-०-३३-२, नवदीप सैनी ४-०-२९-०, जसप्रीत बुमराह ४-०-२०-१, युजवेंद्र चहल ४-०-३८-१, वॉशिंग्टन सुंदर २-०-२४-०, शिवम दुबे २-०-१४-०

शार्दुल ठाकूरचे संस्मरणीय षटक
यजमान न्यूझीलंडला सहा चेंडूंत केवळ सात धावांची आवश्यकता होती. कोहलीने भरवशाच्या शार्दुल ठाकूरकडे चेंडू सोपविला. ठाकूरने पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरला तंबूचा रस्ता दाखवला. डीम मिडविकेटवर श्रेयसने त्याचा झेल घेतला. या मालिकेतील आपला पहिल्याच चेंडूवर डॅरेल मिचेलने चौकार ठोकत चार चेंडूंत केवळ तीन धावा असे लक्ष्य अवाक्यात आणले. या स्थितीतून न्यूझीलंडचा संघ ‘सुपर ओव्हर’पर्यंत जाईल, असे वाटत नव्हते. परंतु, षटकातील नाट्य सुरूच होते. षटकातील तिसर्‍या चेंडूवर मिचेलच्या बॅटचा चेंडूला स्पर्श होऊ शकला नाही. चेंडू यष्टिरक्षकाकडे गेल्यामुळे चोरटी धाव घेण्याचा मिचेलने प्रयत्न केला. पण, राहुलच्या फेकीने यष्ट्यांचा वेघ घेतल्यामुळे स्थिरावलेल्या टिम सायफर्टला धावबाद होऊन तंबूची वाट धरावी लागली. चौथ्या चेंडूवर सेंटनरने एक धाव घेत मिचेलला स्ट्राईक दिली. षटकातील पाचव्या चेंडूवर ठाकूरने मिचेलला बाद केले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज असताना सॅमसन-राहुल यांनी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेंटनरला धावबाद केले. यामुळे हातातोंडाशी आलेल्या. विजयापासून न्यूझीलंडला सलग दुसर्‍यांदा दूर रहावे लागले.