सुनंदा पुष्कर यांची हत्याच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद

0
85

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती असा दावा करत दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी काल दिली. यामुळे या प्रकरणाने आणखी एक धक्कादायक कलाटणी घेतली आहे.पोलिस आयुक्त बस्सी माहिती देताना म्हणाले की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. पण त्यानंतर शंका व्यक्त करण्यात आल्याने, त्यांनी आत्महत्या केली होती, की त्यांची हत्या करण्यात आली होती, याचा तपास घेण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात केलेल्या या चाचण्यांच्या वैद्यकीय अहवालावर आधारीत तथ्यांचा अभ्यास केल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे बस्सी म्हणाले.
सुनंदा पुष्कर यांचा गेल्या वर्षी दिल्लीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरूवातीला त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले जात होते. मात्र ऑक्टोबरमध्ये पुष्कर यांच्या व्हिसेराच्या चाचणीत त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूविषशी संशय व्यक्त होत होता. अखेरीस दिल्ली पोलिसांनी तब्बल वर्षभरानंतर पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एम्सच्या मेडिकल बोर्डाने दिलेल्या अहवालानुसार पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेने झाला होता. तोंडाद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे त्यांना विष दिले गेले असावे, असे बस्सी यांनी सांगितले. याप्रकरणी आवश्यक कारवाई लागेल ती करणार असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस-भाजपात आरोप-प्रत्त्यारोप
दरम्यान, सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरून कॉंग्रेस भाजपमध्ये आरोप – प्रत्त्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. मृत्यूनंतर तब्बल वर्षभरानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याने कॉंग्रेसने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. भाजपने पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले आहे.