पाककडून कुरापती काढणे सुरूच

0
97
सीमेपलिकडून होणार्‍या गोळीबारामुळे सुरक्षित जागी स्थलांतर करताना जम्मू-काश्मीरातील नागरिक.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर भारताच्या कुरापती काढणे सुरूच ठेवले असून काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना हिरानगर आणि कथुआ भागात बेछूट गोळीवार केला. पाकिस्तानच्या रेंजर्सनी कथुआ जिल्ह्यातील लोकवस्तीत मारा करण्याबरोबरच सीमा सुरक्षा दलाच्या पाच चौक्यांना लक्ष्य केल्याने भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमाभागातील ५७ गावांतील पाच हजार लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद, तर एक महिला ठार झाली होती. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी रेंजर्सचे पाच जवान ठार झाले होते. त्यानंतर मात्र पाकिस्तानकडून गोळीबार झाला नव्हता. मात्र, एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने पहाटे दोनपासून जोरदार तोफांचा मारा केला. हा मारा एवढा तीव्र होता, की भारतीय हद्दीतील गावांमध्ये तीन ते चार किलोमीटर परिसरापर्यंत तोफगोळे पडत होते. सीमा सुरक्षा दलांनीही या मार्‍याला चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे सरसंचालक डी. के. पाठक जम्मू-काश्मीरातील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. ‘‘आम्ही कधीच प्रथम गोळीबार केलेला नाही. लोकवस्त्यांना लक्ष्य करण्याचा आमचा हेतू नाही. मात्र, पाकिस्तानी रेंजर्स आमच्या लोकवस्त्यांना लक्ष्य करीत आहे’’ पाठक म्हणाले. सध्या सीमा भागातील ४ हजार लोक स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहेत. सीमेपलिकडून करण्यात येणारा गोळीबार थांबल्यानंतर गावांतील लोकांना सुरक्षित स्थळे नेण्यात येणार आहे. सुमारे १५,००० लोकांना स्थलांतरित करावे लागणार असल्याचे कथुआचे डीएम शाहीद इक्बाल चौधरी म्हणाले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुप्तचर संस्था तसेच सीमा सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून पाकिस्तानी रेंजर्सच्या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सांगितले आहे.