Home बातम्या ‘सीसीई’ म्हणजे नेमके काय?

‘सीसीई’ म्हणजे नेमके काय?

0

संकलन : विजयसिंह आजगावकर, अस्नोडा

‘सीसीई’ म्हणजे ‘कॉम्प्रिहेन्सीव्ह अँड कंटिन्युअस इव्हॅल्यूएशन’ होय. यालाच मराठीत ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ असे म्हणतात. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २९ (१) व (२) नुसार सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी ही मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेचे सातत्यापूर्ण मूल्यमापन आणि वर्तन निष्पत्ती अशा दोन प्रमुख उद्दीष्टांवर या कार्यपद्धतीत भर देण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने व विविध अंगाने केलेले मूल्यमापन म्हणजेच ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ होय.

या कार्यपद्धतीत आकारक मूल्यमापन (फॉर्मेटिव्ह इव्हॅल्यूएशन) व संकलित मूल्यमापन (समेटिव्ह इव्हॅल्यूएशन) या दोन पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होत असतानाच किंवा आकार घेत असतानाच शिक्षकांनी जे मूल्यमापन करायवयाचे आहे त्याचा समावेश आकारिक मूल्यमापनात किंवा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्यूएशनमध्ये होतो, तर ठराविक काळानंतर एकत्रितपणे जे मूल्यमापन करायचे आहे त्याचा सामावेश संकलित मूल्यमापनात होतो.

शिक्षकांनी निरीक्षण, प्रश्‍नोत्तरे, भाषण-संभाषण, प्रकट वाचन, भूमिकाभिनय, गटचर्चा, प्रयोग, उपक्रम, प्रकल्प, स्वाध्याय, वर्गकार्य, प्रश्‍नावली, स्वयंमूल्यमापन, सहाध्यायी मूल्यमापन वगैरे साधनतंत्रे वापरून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे अकारिक मूल्यमापन करायचे आहे. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी कमीतकमी तीन साधनतंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. वर्षभरात विद्यार्थी कमीत कमी एक तरी प्रकल्प करतील याकडे विषयशिक्षकाने लक्ष पुरविणे आवश्यक आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आकारिक मूल्यमापन अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा कायिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक अशा सर्व अंगांनी कसा विकास होत आहे हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन होय. हे मूल्यमापन करीत असताना विद्यार्थ्यांची जिज्ञासू, शोधक, चिकित्सक व प्रयोगशील वृत्ती, सर्जनशील विचार तसेच संवेदनशीलता, संवाद साधण्याची क्षमता आदी कौशल्यांची दखल घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचा विकास साधण्यासाठी शिक्षक तसेच पालकांकडून योग्य कृती आवश्यक आहे.

संकलित मूल्यमापन सत्राच्या अखेरीस करणे आवश्यक आहे. पहिल्या सत्राच्या अखेरीस पहिले संकलित मूल्यमापन तर द्वितीय सत्राच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करणे आवश्यक आहे. यात प्रत्येक विषयाची उद्दिष्टे लक्षात घेऊन मौखिक, लेखी तसेच प्रयोगात्मक प्रश्‍नांचा समावेश अनिवार्य आहे. अध्ययन, अध्यापन प्रक्रियेबरोबरच मूल्यमापन प्रक्रिया आनंददायी व उद्दिष्टानुवर्ती असणे गरजेचे आहे.

संकलित मूल्यमापन करताना संविधानातील मूल्य, गाभाघटक व जीवनकौशल्य यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. हे मूल्यमापन लेखी स्वरुपात करताना मुक्तोत्तरी प्रश्‍नांचा जास्तीत जास्त वापर करावा असे सूचित करण्यात आले आहे. मूल्यमापन प्रक्रिया सुटसुटीत व प्रोत्साहनात्मक असावी. या प्रक्रियेमुळे मुलांच्या मनावर कोणतेही दडपण येणार नाही याची दक्षता संबंधित विषयशिक्षकांनी घेणे आवश्यक आहे. विषयाचे उद्दिष्ट पाहूनच मूल्यमापन करणे अपेक्षित असून सर्व उद्दिष्टांना योग्य प्रकारे भारांश म्हणजेच गुण देणे आवश्यक आहे. संकलित मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे विषयज्ञान, आकलन, कौशल्य, अभिवृत्ती, उपयोजन (ऍप्लिकेशन) या गोष्टी विचारात घेतल्या जाव्यात.

संकलित मूल्यमापनासाठी प्रश्‍नावली तयार करताना पहिली ते चौथीसाठी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्‍न, तर इयत्ता पाचवी ते आठवीसाठी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्‍नांबरोबरच दीर्घोत्तरी प्रश्‍नांचाही समावेश असावा. हे मूल्यमापन करताना विषयनिहाय व वर्गनिहाय मूल्यमापनाचा मुद्दा ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. साधन-तंत्रे व प्रश्‍नपत्रिका स्वतःच्या असाव्यात. या बाबी इतरांकडून घेतल्या जाणार नाहीत याची दक्षता संबंधित विषयशिक्षकाने घेणे अनिवार्य आहे.

मूल्यमापन करतेवेळी मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन देणे, त्यांच्यातील उणिवा, त्रुटी यांचा शोध घेऊन त्यांना अपेक्षित पातळीपर्यंत आणण्याचे काम देखील संबंधित शिक्षकाला करायचे आहे, अशी ही कार्यपद्धती सांगते.