सीमा पुनियाला रौप्य तर नवजोतला कांस्य

0
108

सीमा पुनिया आणि नवजोत ढिल्लन यांनी २१व्या राष्ट्रकुल खेळातील थाळीफेक स्पर्धेत काल भारताला अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाची कमाई करून दिली. ऍथलेटिक्स विभागातील भारताची ही पहिली दोन पदके ठरली.

सीमा पुनियाने ६०.१४ मीटर थाळी फेकत रौप्य पदकाला गवसणी घातली. तिचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग चौथे पदक होय. यापूर्वी तिने २००६ मध्ये रौप्य, २०१०मध्ये रौप्य तर २०१४मध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली होती. तर नवजोत ढिल्लनने ५७.४३ मीटरचे अंतर कापत कांस्य पदक प्राप्त केले.

पुनियाला आपल्या दुसर्‍या प्रयत्नात ५९.५७ मीटरचे अंतर कापता आले. तर तिचा तिसरा व चौथा प्रयत्न बाद ठरला होता. ऑस्ट्रेलियाच्या माजी विश्वजेत्या दानी स्टीव्हेन्सने ६८.२६ मीटर दूर थाळी फेकत नवीन राष्ट्रकुल विक्रमासह सुवर्ण पदक प्राप्त केले. महिलांच्या लांब उडीत मात्र भारताच्या दोन्ही ऍथलिट्‌सनी निराशा केली. व्ही. नीना (६.१९ मीटर) १०व्या तर नयना जेम्स (६.१४ मीटर) सर्वात तळाला १२व्या स्थानावर राहिली.

पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताच्या दोन्ही ऍथलिट्‌सनी अंतिम फेरीत धडक दिली आहे. अरपिंदर सिंग आपल्या ब गटात अव्वल राहताना अंतिम फेरीत पोहचला आहे. अरपिंदरने १६.३९ इतके अंतर कापले, तर अ गटात एव्ही राकेश बाबूने १५.९८ मीटर उडी मारली. तिहेरी उडीची अंतिम फेरी १४ एप्रिल रोजी होणार आहे.