आज आणि उद्या पणजी व मडगाव येथे किनारी विभाग व्यवस्थापन नकाशाच्या मसुद्यावरील जनसुनावणी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने गोवा नागरी सेवेतील अधिकारी श्रीनेत कोठावळे, आग्नेल फर्नांडिस व जॉन्सन फर्नांडिस यांची नियुक्ती केली आहे.
आज व उद्या ९ रोजी पणजी येथील कांपाल मैदानावर व दक्षिण गोव्यात मडगाव येथील एसजीपीडीए मैदानावर ही जनसुनावणी होणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने सोमवारी वरील मसुद्याला अंतिम रूप व मान्यता देण्यासाठी अतिरिक्त सहा महिन्यांची मागणी करणारी गोवा फाऊंडेशनची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती. तत्पूर्वी लवादाने ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गोव्याला दिले होते. गोवा फाऊंडेशनने जनसुनावणीच्या वेळी सहभागींना प्रत्येकी केवळ १५ मिनिटांची बोलण्याची मुदत उठवण्याची विनंती केली होती.