सिनेमा व बातम्यांनी पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे. त्यामुळे त्यात सुधारणा होण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काल व्यक्त केले. गुवाहाटी येथे आयोजित पोलीस महासंचालक, महानिरीक्षक यांच्या परिषदेत मोदी बोलत होते. आपल्या देशाची गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याला प्राधान्य द्यायला हवे असल्याचेही ते म्हणाले. ज्या देशांची गुप्तचर यंत्रणा उत्तम असते त्या देशांना शस्त्रास्त्रांवर अवलंबून रहावे लागत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.आपले कर्तव्य पार पाडीत असताना आतापर्यंत ३३ हजार पोलीस शहीद झाले आहेत याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की पोलीस जनतेच्या सेवेसाठी शहीद झाले हे जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला हवे. शहीद पोलिसांच्या गौरवार्थ विशेष कृती दलाची स्थापना करावी त्याद्वारे या शाहीदांचे कार्य जनतेपर्यंत पोचवले पाहिजे. त्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल असेही मोदी म्हणाले.