सिद्धूची सिक्सर!

0
100

नवज्योतसिंग सिद्धूने राज्यसभेला रामराम ठोकल्याने भारतीय जनता पक्षाने पंजाबमधील एक लोकप्रिय चेहरा गमावला. आता सिद्धू आम आदमी पक्षात जातो की कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या आमंत्रणावरून कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल होतो, हे अद्याप स्पष्ट नसले, तरी पंजाबमधील राजकारणामध्ये मात्र सिद्धूमुळे रंगत वाढली आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र असू शकत नाही. त्यामुळे एकेकाळी अरविंद केजरीवालांची ‘नौटंकी कंपनीवाला केजरीवाल’ म्हणून खिल्ली उडविणारा आणि ज्यांना स्वतःचा खोकला बरा करता येत नाही, तो दिल्लीचे काय बरे करणार अशी टर उडवणारा सिद्धू आता केजरीवालांचे गुणगान गाऊ लागला किंवा केजरीवाल सिद्धूच्या नेकीचे प्रशंसक बनले, तर त्यात नवल नाही. राजकारणात हे नेहमीचेच आहे. भारतीय जनता पक्षाला पंजाबमध्ये स्थानिक लोकप्रिय नेतृत्वाची वानवा आहे आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांना पक्षाला शिरोमणी अकाली दल (बादल) च्या साथीने पुन्हा एकवार तोंड द्यायचे आहे. यावेळी तेथे ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसण्याची धास्ती भाजपाला आहे. अशावेळी सिद्धू सारख्या ‘पब्लिक’प्रिय हुकुमी एक्क्याने पक्षत्याग करणे नुकसानकारक ठरल्यावाचून राहणार नाही. क्रिकेटपटू म्हणून लोकप्रियता लाभलेला सिद्धू दोन दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर क्रिकेट समालोचक म्हणूनही चर्चेत राहिला होता. त्याची अखंड वटवट अनेकांसाठी तापदायक ठरत असली, तरी त्यातून त्याचे नाव घरोघरी स्मरणात राहिले. त्याचाच फायदा उठवीत भाजपाने त्याला दोनवेळा लोकसभेत पोहोचवले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र त्याची अमृतसरची जागा अरूण जेटलींसाठी मोकळी करण्याचा डाव भाजपाने टाकला आणि साहजिकच सिद्धू नाराज झाला. त्याची समजूत काढण्यासाठी त्याला गेल्या एप्रिलमध्ये राज्यसभेची खासदारकी दिली गेली खरी, परंतु मंत्रिपदापासून मात्र दूरच ठेवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडच्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी आपल्याला स्थान मिळेल अशी त्याची अपेक्षा असावी. ती सफल झाली नाही तेव्हा ‘पंजाबच्या हिता’चे कारण देत सिद्धूने राज्यसभेच्या बिनकामाच्या खासदारकीचा त्याग केला आहे. सिद्धूबरोबर त्याची पत्नीही राजकारणात आहे. ती पूर्व अमृतसरची भाजपची आमदार आहे. पतीने भाजपापासून दूर जाण्याचा मार्ग पत्करला तरी आपण अजून भाजपात आहोत असे तिचे म्हणणे आहे. पण तिचेही भाजपाशी किंवा अकाली दलाशी सख्य नाही. पंजाब सरकारने आपल्या विधानसभा मतदारसंघाची उपेक्षा चालवलेली असल्याची जाहीर तक्रार तिने केलेली होती. त्यामुळे सिद्धूच्या पावलांवर पाऊल टाकून तिनेही भाजपाला रामराम ठोकला तर आश्‍चर्य नसेल. सिद्धूच्या पुढच्या पावलांबाबत अद्याप सूतोवाच त्याने अथवा त्याच्या पत्नीने केलेले नाही. आम आदमी पक्षाला पंजाब आणि गोव्यातही मुख्यमंत्रिपदासाठीच्या उमेदवारांचा शोध आहे. ‘आप’ कडून गोव्यात राजदीप सरदेसाईच्या नावाचे पिल्लू सोडून पाहिले गेले, परंतु राजदीप सरदेसाईला गोव्यात लोकमान्यता नाही हेही तात्काळ स्पष्ट झाले. पण सिद्धूचे तसे नाही. सिद्धू पंजाबात आम जनतेमध्ये लोकप्रिय आहे. त्याचा फायदा आप उठवू पाहते आहे. ते टाळण्यासाठी कॉंग्रेसनेही सिद्धूसाठी गळ टाकला आहे. खरे तर सिद्धूचे कुटुंबीय पक्के कॉंग्रेसजन. त्याच्या आईने कॉंग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्याचे वडील सरदार भगवंतसिंग पतियाळा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते. शिवाय अमरिंदर सिंग आणि सिद्धूची मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळे भाजपाला रामराम करणार्‍या सिद्धूला पक्षात घेण्यास अमरिंदरही उत्सुक आहेत. सिद्धू राजकीय नेता म्हणून प्रभाव दाखवू शकलेला नसला तरी स्टार प्रचारक ठरू शकतो. त्यामुळे हे अस्त्र त्यांना मिळाल्यास हवेच आहे. गेल्या निवडणुकीत सिद्धूला भाजपने अमृतसरमधून लोकसभेला उभे केले असते, तर त्याचा सामना कॅप्टन अमरिंदरसिंगांशी झाला असता, पण तेथे अरुण जेटलींना उभे करण्याची दुर्बुद्धी भाजपला सुचली आणि जेटलींचा दणदणीत पराभव झाला. सिद्धू प्रचारापासून दूर राहिला होता. त्याच्या नाराजीची तमा न बाळगता भाजपाने त्याची उपेक्षाच चालवली होती. त्याला पंजाबच्या राजकारणात लुडबूड करू देण्यास ना भाजपचे स्थानिक नेते इच्छुक होते, ना मित्रपक्ष अकाली दल. त्यामुळे त्याला राज्यसभेवर घेतले तरी पंजाबच्या राजकारणापासून दूर ठेवण्यात आले होते. या नाराजीचा भडका त्याच्या राजीनाम्यातून उडाला. सिद्धूने आपले पत्ते अद्याप खोललेले नाहीत. पण राजीनाम्याची सिक्सर सीमेपार गेली आहे.