सिद्धूचा खासदारकीचा राजीनामा

0
75

>> भाजपला धक्का ः ‘आप’ प्रवेशाची शक्यता

 

एका नाट्यमय घडामोडीत माजी क्रिकेटपटू तथा भाजपचे राज्यसभा खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील भाजपला हादरा देताना आपल्या खासदारपदाचा तडकाङ्गडकी राजीनामा दिला. तेवढ्याच तातडीने राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ५२ वर्षीय सिद्धू आम आदमी पार्टीत प्रवेश करणार असून पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांना पुढे केले जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
पंजाबात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या घडामोडीनंतर सिद्धू यांची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना मिळू शकली नाही. मात्र ‘आप’चे ज्येष्ठ नेते संजय सिंग व खासदार भगवंत सिंग मान यांनी या घटनेचे स्वागत केले. मात्र त्यांच्या आप प्रवेशाबद्दल मौन बाळगले.
आपल्या राजीनामा पत्राच्या छोट्या निवेदनात सिद्धू यांनी आपल्या भावी योजनेविषयी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. पक्षातील व्यवहारामुळे आपण व्यथित असल्याचे मात्र त्यांनी म्हटले आहे. आपण पंतप्रधानांच्या विनंतीला मान देऊन पंजाबच्या भल्यासाठी राज्यसभा खासदारकी स्वीकारली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सिद्धूऐवजी अरुण जेटली यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हापासून सिद्धू नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर पूर्व अमृतसर मतदारसंघाच्या आमदार आहेत. उभयतांनी तेथील आपल्या सरकारला घरचा अहेर दिला होता.