सिद्धार्थ कौलला संधी

0
71

>> टीम इंडियाचा आयर्लंड- इंग्लंड दौरा

आयपीएलमध्ये सातच्या इकॉनॉमीने १३ बळी घेतलेला सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. फलंदाज श्रेयस अय्यर व अंबाती रायडू यांचीदेखील तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात वर्णी लागली आहे. सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वात या दुकलीने आत्तापर्यंत अनुक्रमे ३५१ व ४२३ धावा जमवल्या असून त्यांची स्ट्राईकरेट १५०च्या आसपास आहे. आयर्लंड व इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांसाठी मात्र या दोघांचा विचार करण्यात आलेला नाही.

किंग्स इलेव्हन पंजाबतर्फे १६३च्या स्ट्राईकरेटने ३७६ धावा कुटलेल्या राहुलचा देखील दोन्ही संघांसाठी विचार करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये १७०च्या स्ट्राईकरेटने ४००च्या आसपास धावा जमवूनही ऋषभ पंतला आपली जागा गमवावी लागली आहे. निदाहास करंडक स्पर्धेत खेळलेल्या पंतची जागी महेंद्रसिंग धोनीने घेतली आहे. कृणाल पंड्या किंवा रविचंद्रन अश्‍विन या दोघांचा टी-२० साठी विचार करण्यात आलेला नाही. कृणालने यंदाच्या मोसमात फलंदाजी तसेच गोलंदाजीतही मुंबई इंडियन्सकडून निर्णायक कामगिरी केली असून अश्‍विनने आपल्या धारदार गोलंदाजीला नेतृत्वकौशल्याची जोड देत किंग्स इलेव्हनचे नशीब पालटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मनगटी फिरकीपटूंचा भरणा असलेल्या टी-२० संघात वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात एकमेव पारंपरिक ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतरही त्याने वनडे संघातही स्थान प्राप्त केले आहे. आरसीबी संघातील सुंदरचा साथी उमेश यादवने आपल्या १४ बळींच्या जोरावर टी-२० व वनडे संघात पुनरागमन केले आहे. त्याने मोहम्मद शामीची जागा घेतली आहे. मनीष पांडे व अजिंक्य रहाणे यांना वनडेत खेळविण्याच्या प्रयोगाला अल्पविराम देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. दुखापतीमुळे केदार जाधवचा विचार करण्यात आलेला नसून यामुळे कामचलाऊ गोलंदाजाची कमतरता भारताला जाणवू शकते. टी-२० संघातून अक्षरसह जयदेव उनाडकट व शार्दुल ठाकूर यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. विराट कोहलीची टी-२० कर्णधारपदी निवड करण्यात आली असली तरी आयर्लंडविरुद्ध तो खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. आयर्लंडविरुद्धचे दोन टी-२० सामने अनुक्रमे २७ जून व २९ जून रोजी होणार असून २५ जून ते २८ जून या कालावधीत सरेचा यॉर्कशायरविरुद्धचा सामना आहे.
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३, ६ व ८ जून रोजी टी-२० सामने तर १२, १४ व १७ जून रोजी एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे.

वनडे संघ ः विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव व भुवनेश्‍वर कुमार.
टी-२० संघ विरुद्ध आयर्लंड व इंग्लंड ः विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल व उमेश यादव.