सिंधू, सायना ‘जैसे थे’

0
118

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांचे काल बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत महिला एकेरीमध्ये अनुक्रमे पाचवे व आठवे स्थान कायम आहे. मुग्धा आग्रे व रितुपर्ण दास यांनी अनुक्रमे सहा व एका स्थानाची सुधारणा करत ६२वे व ६५वे स्थान प्राप्त केले आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत (१०) व समीर वर्मा (१३) यांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. जपान ओपनच्या अंतिम फेरीत केंटो मोमोटाकडून पराजित झालेल्या बी. साई प्रणिथ याने चार स्थानांची सुधारणा करत विसावा क्रमांक आपल्या नावे केला आहे. एचएस प्रणॉय (३१, + ३), पारुपल्ली कश्यप (३५, + २), शुभंकर डे (४१, + १), सौरभ वर्मा (४४, + १) यांनी पुरुष एकेरीत सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे.

पुरुष एकेरील अन्य भारतीयांमध्ये अजय जयराम ६७व्या तर लक्ष्य सेन ६९व्या स्थानी आहे. पुुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी दोन स्थानांची उडी घेत १६वा क्रमांक प्राप्त केला आहे. मनू अत्री व बी. सुमिथ रेड्डी २५व्या स्थानी कायम आहे. भारताची उदयोन्मुख जोडी एमआर अर्जुन व श्‍लोक रामचंद्रन यांनी सात स्थानांनी वर सरकताना ४८वा क्रमांक मिळविला आहे. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांना दोन स्थानांची नुकसान सोसावे लागले आहे. ही दुकली २४व्या स्थानी आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी दोन स्थानांच्या घसरणीसह २२व्या तर पोनप्पा-रंकीरेड्डी जोडी २३व्या स्थानी आहे.