सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

0
158

>> सायना नेहवालला पराभवाचा धक्का

फ्रेंच ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. द्वितीय मानांकित पी.व्ही. सिंधूने जपानच्या सायाका ताकाहाशी हिला २१-१४, २१-१३ नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली तर सायना नेहवालला जपानच्या पाचव्या मानांकित अकाने यामागुची हिने २१-९, २३-२१ असे नमवून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. सिंधूने ३९ मिनिटांत विजयाला गवसणी घातली तर याच वेळेत सायनाला पराभवाचे तोंड पहावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत आठव्या मानांकित किदांबी श्रीकांतने आपला झंझावात कायम ठेवत तैवानच्या वॉंग वी की व्हिन्सेंट याला २१-१९, २१-१७ असे हरविले.

महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी या जोडीची अव्वल मानांकित जपानी जोडी मिसाकी मात्सुटोमो व अयाका ताकाहाशी यांच्यासमोर डाळ शिजली नाही. मिसाकी-अयाका जोडीने भारतीय जोडीला २१-१६, २१-१४ असे पराजित केले.

सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने सनसनाटी निकालाची नोंद करताना मॅड्‌स कॉनरड पीटरसन व मॅड्‌स पिएलर कोल्डिंग या डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित जोडीचा २२-२०, १२-२१, २१-१९ असा पराभव केला. यासह त्यांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. हा सामना जवळपास तासभर चालला. अंतिम ८मध्ये त्यांचा सामना ओंग यिव सिन व तान वी कियॉंग किंवा मथायस बो व कर्स्टन मॉर्गनसन या द्वितीय मानांकित जोडीशी होणार आहेत. तत्पूर्वी, बुधवारी रात्री झालेल्या लढतीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीने बास्टियन केरसोवडी व ज्युलियन मायो यांना २१-१२, २१-१४ असे हरवून दुसरी फेरी गाठली होती.
अन्य महत्त्वाचे निकाल ः महिला एकेरी ः सुंग जी ह्यून (३) वि. वि. पोर्नपावी चोचुवॉंग २१-१४, २१-१७, ताय त्झू यिंग (१) वि. वि. साईना कावाकामी २१-१३, २१-१४, पुरुष एकेरी ः अँडर्स आंतोनसेन वि. वि. चेन लॉंग (६) १५-२१, २१-१६, २१-१६.