सावरकरांच्या बदनामीमागील सत्य

0
150
  • देवेश कु. कडकडे
    (डिचोली)

सावरकरांनी लिहिले ते अगदी निर्भीडपणे आणि सडेतोड. कोण दुखावेल म्हणून हटले नाहीत किंवा कोणाला बरे वाटेल म्हणून वस्तुनिष्ठ लिखाणाकडे तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या जीवनात स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्त्वनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा अशा तीन निष्ठा जोपासल्या. त्यांच्या साहित्यातून तत्त्वज्ञ सावरकर, कलावंत सावरकर आणि प्रबोधनकर्ते सावरकर अशी तीन व्यक्तिमत्त्वे अभिव्यक्त झाली आहेत.

कॉंग्रेस पक्षाचे पदमुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली तुलना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी करणे हेच मुळी हास्यास्पद आहे. मी माफी मागणार नाही, कारण मी ‘राहुल सावरकर’ नव्हे, तर ‘राहुल गांधी’ आहे, असे वक्तव्य त्यांनी करणे आवश्यक नव्हते, असे अनेकांना वाटत असले तरी त्यामध्ये राजकारण लपलेले आहे. सावरकरांची देशभक्ती, त्यांचा त्याग, त्यांचे समाजकार्य आणि त्यांची विद्वत्ता यांच्या तुलनेत राहुल गांधींचे कार्य नखाएवढेही नाही. राहुल गांधींचा भूतकाळ, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांच्या परदेशी दौर्‍यांबद्दल राखलेली गुप्तता आणि त्यांचे ‘गांधी’ हे आडनाव कसे आले हे आता सर्व देशाला माहीत झालेले आहे. देशात जेव्हा कॉंग्रेस पक्ष प्रबळ होता आणि त्यांच्या अस्तित्वाला धोका नव्हता, तेव्हा कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्याने सावरकरांबद्दल अनुद्गार काढले नाहीत. इंदिरा गांधींनी त्यांच्यावर टपाल तिकीट काढून सावरकर स्मारकाला ११ हजारांची देणगी दिली होती. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनी सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत; तसेच लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या योगदानाबद्दल मानधन जाहीर केले होते.

कॉंग्रेस पक्षाने फाळणीनंतरच्या अवघड काळातही देश सांभाळण्याचे काम केले. अनेक कल्याणकारी योजना मार्गी लावल्या. जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण केला. कॉंग्रेसने आपली ‘धर्मनिरपेक्ष पक्ष’ ही प्रतिमा जपण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्याचा त्यांना सत्ता राखण्यात फायदाही झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाला जनतेचे एवढे प्रचंड प्रेम मिळाले की हा पक्ष लोकप्रियतेच्या शिखरावर होता. कॉंग्रेस पक्षाशिवाय देश चालवणे ही कल्पनाच त्यावेळी बहुसंख्य भारतीयांच्या पचनी पडणे शक्य नव्हते. कालांतराने कॉंग्रेसच्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष या धोरणाचा चुकीचा अर्थ लावला. ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणजे तुष्टीकरण करणे असा नवा सिद्धांत या पक्षाने मांडला. त्याचा कडेलोट झाला तो शाहबानो प्रकरणानंतर. त्यावेळी कॉंग्रेसचा असली चेहरा देशासमोर सपशेल उघडा पडला. याचाच फायदा हिंदुत्ववादी पक्षांनी उठवत अनेक राज्यांत आपली पाळेमुळे रुजवली आणि कॉंग्रेस पक्षासमोर भक्कम पर्याय उभा केला. भाजपाने आपली हिंदुत्ववादी भूमिका मांडताना सदैव सावरकर यांना आदर्श मानले आहे. सध्या देशात कॉंग्रेसचे महात्मा गांधी आणि भाजपचे सावरकर अशी विभागणी झाली आहे, हे दुर्दैवी आहे. याच्या आधी हिंदुत्ववादी पक्षाच्या अनेक उठवळ नेत्यांनी महात्मा गांधींची मानहानी केली आहे. आता कॉंग्रेस आणि डावे पक्ष सावरकरांची बदनामी करीत आहेत. कॉंग्रेसमध्ये मार्क्सवादी डाव्या विचारसरणीचा एक गट आहे, जो सातत्याने सावरकरांचा द्वेष करीत आहे. २०१४ सालानंतर हा द्वेष अधिक तीव्रतेने समोर येत आहे. यात मणिशंकर अय्यरांसारखे अग्रेसर होते.
२०१९ च्या लोकसभा निकालानंतर राहुल गांधी संभ्रमित झाले आहेत. आता अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षातच वेगळे पडले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास कॉंग्रेसच्या संजय निरुपम, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण या राहुल गांधी गटातील नेत्यांचा विरोध होता, तर सोनिया गांधींच्या गटातील अहमद पटेल सारख्या नेत्यांचे असे म्हणणे होते की, जर महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर शिवसेनेला आपल्या बाजूने वळवून सत्ता स्थापन करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार ते स्थापनही झाले. मात्र शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाला समर्थन दिल्याने राहुल गांधी नाराज झाले. त्यामुळे शिवसेनेने राज्यसभेत सौम्य भूमिका घेत या विधेयकाला जरी प्रत्यक्ष पाठिंबा दिला नसला तरी मतदान न करत सभात्याग केला आणि आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेचा पीळ कायम ठेवला. हीच गोष्ट राहुल गांधी गटाला जिव्हारी लागली.

सावरकरांवर अनेक आक्षेप घेतले जातात. त्यावर उत्तर देऊनही विरोधकांचे कधी समाधान होत नाही, कारण त्यांचा विरोध हा द्वेषावर उभा आहे. मात्र ज्यांना सावरकरांच्या कार्याची माहिती नाही, अशा सामान्य लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपल्या देशात क्रांतिकारकांचा इतिहास अगदी संक्षिप्तरित्या शिकवण्यात येतो. आजच्या पिढीतील काहीजणांना अंदमान, काळेपाणी याबद्दल माहिती नाही. सावरकरांच्या माफीनाम्याबद्दलची भूमिका समजून न घेता त्यांनी अंदमानात सडून मरायला पाहिजे होते, मात्र काही अटी स्वीकारून सुटका करून घ्यायला नको होती अशी मुक्ताफळे बाहेर बसून पाजळणे सोपे आहे. कोठडीत सडून राहून त्यांना देशहितासाठी कार्य करत राहणे महत्त्वाचे वाटले, म्हणून सावरकरांनी स्वतःबरोबर अनेक क्रांतिकारकांची सुटका करून घेतली. पुढे रत्नागिरीत स्थानबद्ध असतानाही सावरकरांनी देशहिताच्या कार्याबरोबर समाजसुधारणेचेही कार्य केले. आधी स्वातंत्र्य की समाजसुधारणा यावर अनेक नेत्यांमध्ये मतभेद होते. सावरकर स्वातंत्र्याबरोबर समाजसुधारणाही तितकीच महत्त्वाची आहे अशा मताचे होते. जाती-पातीमध्ये अडकलेल्या हिंदू समाजात सुधारणा घडवून आणणे हे सुद्धा राष्ट्रीय कार्य आहे असे त्यांना वाटे. गांधी हत्या खटल्यात सावरकरांची निर्दोष सुटका झाली होती.
न्यायालयाने आपल्या अंतिम निकालात स्पष्ट केले आहे की ते दोषी नाहीत. त्यांना संशयाचा फायदा मिळाला असे कुठेही नमूद केलेले नाही. त्यांना इंग्रजांकडून भत्ता मिळत असे, असाही आरोप केला जातो. वस्तुस्थिती अशी होती की, त्यांनी बॅरिष्टर पदवी नाकारली होती. मुंबई विद्यापीठाने त्यांची बी.ए. ही पदवी काढून घेतली होती. त्यामुळे वकिली करणे शक्य नव्हते. तसेच भगुरसारख्या दुर्गम ठिकाणी व्यवसाय करणेही शक्य नव्हते, कारण तशी अनुमती नव्हती. त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ते भाड्याच्या घरात राहत होते. अशा वेळी खर्चासाठी मासिक भत्ता १०० रुपये मागणे भाग होते. असा भत्ता केवळ एकट्या सावरकरांनाच मिळत नव्हता तर अनेक राजबंदिवानांना मिळत होता. सावरकर हे गुन्हेगार नव्हेत तर राजबंदी होते हे लक्षात घेतले पाहिजे. डाव्या विचारसरणीचे अनेक नेते क्रांतिकारकांचा सदैव द्वेषच करीत, कारण त्यांना आपले महत्त्व कमी होण्याचे भय होते. ते महात्मा गांधींना रोज शिव्या देत. सावरकरांनी लिहिले ते अगदी निर्भीडपणे आणि सडेतोड. कोण दुखावेल म्हणून हटले नाहीत किंवा कोणाला बरे वाटेल म्हणून वस्तुनिष्ठ लिखाणाकडे तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या जीवनात स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्त्वनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा अशा तीन निष्ठा जोपासल्या. त्यांच्या साहित्यातून तत्त्वज्ञ सावरकर, कलावंत सावरकर आणि प्रबोधनकर्ते सावरकर अशी तीन व्यक्तिमत्त्वे अभिव्यक्त झाली आहेत. सध्या कॉंग्रेस पक्षाचे अनेक समर्थक आहेत, ज्यांना सावरकरांचे कार्य माहीत नाही. त्यांनी कधी त्यांच्या साहित्यसंपदेतील १० हजारांहून अधिक पानांमधील एकही पान वाचले नसेल. तेही राहुल गांधींच्या वक्तव्याची री ओढतात, हेच खरे दुर्दैव आहे!