सावध होऊया!

0
17

कोरोनाबाबत जनतेमध्ये भीती उत्पन्न करण्याचा आमचा तीळमात्र इरादा नसला, तरी गेल्या एक जानेवारीपासूनची राज्यातील कोरोनाची स्थिती तपासली तर चिंता नक्कीच वाटते. त्यामुळेच त्यावर सातत्याने लिहिणे भाग पडते आहे. १ जानेवारीला राज्यातील टेस्ट पॉझिटिव्हिटी प्रमाण ६.२५ टक्के होते. २ तारखेला ते १०.७६ म्हणजे जवळजवळ अकरा टक्क्यांवर गेले आणि ३ तारखेला तब्बल २६.४ टक्क्यांवर जाऊन पोहोचले. ह्या तीन दिवसांत राज्यात कोरोनाचे १३२९ नवे रुग्ण आढळले. ३ जानेवारीला एकाच दिवशी जे ६३१ रुग्ण सापडले, त्यापेक्षा अधिक म्हणजे ७०२ रुग्ण गोव्यात तब्बल सात महिन्यांपूर्वी म्हणजे २ जून २०२१ रोजी सापडले होते. गेल्या वर्षीचा एप्रिल आणि मे महिना हा डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरियंटने उसळलेल्या दुसर्‍या लाटेने व्यापला होता हे तर सर्वज्ञात आहे. म्हणजेच गेल्या तीन दिवसांतील रुग्णसंख्या ही दुसर्‍या लाटेतील चढत्या संख्येच्या समकक्ष आहे आणि ही चिंतेची बाब आहे. गोव्यात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे तब्बल ३१२४ रुग्ण ११ मे २०२१ रोजी सापडले होते. दुसर्‍या लाटेचे ते शिखर होते. सुदैवाने नंतर ती लाट जूनपर्यंत ओसरत गेली. पण यंदा नववर्षाच्या प्रारंभीच ज्या वेगाने चढती रुग्णसंख्या दिसते आहे तिचे चढते प्रमाण आणि तिचा प्रचंड वेग या दोन्ही गोष्टी चिंता करण्याजोग्या आहेत हे नमूद करणे भाग आहे.
गेल्या तीन दिवसांतील एक गोष्ट मात्र थोडा दिलासादायक आहे ती म्हणजे जरी रुग्णसंख्या चढती असली तरी यावेळी इस्पितळात दाखल कराव्या लागणार्‍या रुग्णांचे प्रमाण अल्प आहे. १ जानेवारीला ३, २ तारखेला ४ आणि ३ तारखेला ५ जणांना इस्पितळात दाखल करावे लागले. म्हणजे नव्या रुग्णांच्या केवळ एक टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात लोकांना इस्पितळात दाखल व्हावे लागले आहे. पण येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे जसजशी रुग्णसंख्या वाढेल तसतसे त्यातील एक टक्का रुग्ण इस्पितळात दाखल करावे लागतील असे जरी आपण गृहित धरले, तरी वाढत्या रुग्णांच्या संख्येबरोबरच इस्पितळात दाखल कराव्या लागणार्‍या रुग्णांची ही संख्याही वाढत जाईल. आपल्याकडची एकूण आरोग्य यंत्रणा रुग्णांच्या चाचण्या आणि उपचार याला तेव्हा पुरी पडेल का हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने याचाच विचार करून राज्यांना तात्पुरती कोरोना चाचणी केंद्रे आणि इस्पितळे उभी करण्यास सांगितलेले आहे. गोव्यात मात्र त्या आघाडीवर काही प्रयत्न आजवर झालेले दिसत नाही. तज्ज्ञांच्या समितीने या आघाडीवरही सरकारला जागे करण्याची वेळ आलेली आहे.
रुग्णांची वाढती संख्या, पण इस्पितळात भरती करायचे कमी प्रमाण हे ओमिक्रॉन व्हेरियंटचे लक्षण मानले जाते. गोव्यात हे जे रुग्ण सापडत आहेत, त्यात डेल्टा वा डेल्टा प्लसचा वाटा किती आणि ओमिक्रॉनचा किती हे कळायला उशीर होतो, कारण आपल्याकडे अजूनही जिनॉम सिक्वेन्सिंग यंत्र नाही. त्यामुळे पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतून अहवाल येईपर्यंत दिवस जातात. त्यासाठी किती नमुने तेथे पाठवले जातात हाही प्रश्न आहे. पण एकूण स्थितीचे विश्लेषण केले तर ओमिक्रॉनचा संसर्ग स्थानिक जनतेत झाला असल्याच्या संशयास पुष्टी देणारीच परिस्थिती भोवताली दिसते आहे.
सरकारने वेळीच जनतेवर निर्बंध घातले असते तर नाताळ आणि नववर्ष प्रारंभीच्या सार्वत्रिक बेफिकिरीवर थोडा लगाम कसला गेला असता हे आम्ही कालच्या अग्रलेखात म्हटलेच आहे. आता जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. आता पुढे काय करायला हवे त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
तज्ज्ञ समितीने शिफारस करूनही जनतेवर निर्बंध घालण्यास सरकार उत्सुक दिसत नाही, कारण अर्थातच पुढे निवडणुका आहेत. राज्यात सारे काही आलबेल आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे हेच सरकारला भासवायचे आहे. परंतु ही धूळफेक शेवटी जनतेच्या जिवाशी येते. त्यामुळे जनतेने सरकारवर विसंबून न राहता अधिकाधिक खबरदारी घेणेच या घडीस हितकर ठरेल. राजकीय नेत्यांवर विसंबून राहाल तर पस्तावाल. बँक ऑफ इंडियाची कांपाल पणजीची शाखा अनेक कर्मचारी कोरोनाबाधित सापडल्याने काल सीलबंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांत हजारो ग्राहक तेथे येऊन गेले असतील. कोरोना फैलावतो तो अशा कारणाने. त्यामुळे जनतेनेच अत्यंत सावधगिरी बाळगण्याशिवाय आता प्रत्यवाय नाही. कोरोना अवतरला तेव्हा राज्यात सरकारच्याही आधी जनतेने स्वयंप्रेरणेने लॉकडाऊन सुरू केलेले होते हे विसरले जाऊ नये. लॉकडाऊन कोणालाच नको आहे, पण कोरोना फैलावाची ही साखळी तोडावी लागेल.