Home बातम्या सार्वजनिक गणेशोत्सव : काल, आज आणि उद्या

सार्वजनिक गणेशोत्सव : काल, आज आणि उद्या

0

– डॉ. सचिन कांदोळकर

लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून शंभर वर्षांचा काळ लोटला. पुण्यापाठोपाठ महाराष्ट्रात मुंबईसह इतर ठिकाणीही हा उत्सव थाटामाटात साजरा केला जाऊ लागला. पोर्तुगिजांची राजवट नसती तर गोव्यातही या सार्वजनिक उत्सवाने शंभरी ओलांडली असती. गोव्यातील लोकमानसात सार्वजनिक गणेशोत्सवाऐवजी घरोघरी साजर्‍या केल्या जाणार्‍या गणेशचतुर्थीला अधिक महत्त्व आहे.

पारतंत्र्याच्या काळात लोकांमध्ये जागरण व्हावे, या उद्देशाने टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. गोव्यात भारतीय स्वातंत्र्यानंतर आणि गोवा मुक्तीनंतर हा सार्वजनिक उत्सव सुरू झाला. तरीही येथील सार्वजनिक गणेशोत्सवाचे टिळकांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या ‘श्रीगणपत्युत्सवा’शी नाते सांगता येईल. पण आज तसे ते आहे का? खुद्द पुण्या-मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये काय चालले आहे? तेथील व्याख्याने, सामाजिक विषयांवर चर्चा, नावीन्यपूर्ण उपक्रम इत्यादीसंबंधी इथपर्यंत काही ऐकू येत नाही, पण तेथील एखाद्या सार्वजनिक गणपतीसमोर लागणार्‍या लांबलचक रांगा, नवसाला पावणारा एखादा सार्वजनिक गणपती, एखाद्या फंडपेटीत जमलेला निधी, सार्वजनिक गणपतीचे ‘सेलिब्रिटीं’नी घेतलेले दर्शन यांसंबंधी वर्तमानपत्रांमधून भरपूर वाचायला मिळते. वाहिन्यांचे ‘कॅमेरे’ तर ‘सेलिब्रिटीं’च्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत मंडपातच उभे असावेत!

उत्सव सार्वजनिक झाला

गणेशोत्सव तसा जुनाच आहे. पूर्वी काही राजेरजवाडे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करीत असत. उत्सवाच्या निमित्ताने त्यांचे वाडे रंगसफेती लावून सजत. मुख्य मंडपात गणपतीसमोर भजने, कीर्तने, आख्याने इत्यादी कार्यक्रम पार पडत. त्याकाळीही इतर लोक आपापल्या परीने घरोघरी गणेशचतुर्थी साजरी करीत होते. मात्र ठरावीक लोकांपुरताच मर्यादित असलेल्या ‘गणपती उत्सवाला’ टिळकांनी व्यापक स्वरूप दिले. टिळकांमुळेच घराबाहेर गणपतीपूजन, सार्वजनिक विसर्जन, मेळे इत्यादी प्रकार रूढ झाले. १८९३ च्या गणपती उत्सवात म्हणजे मुंबईतील हिंदू-मुसलमानांच्या दंग्यानंतर सुमारे सहा आठवड्यांनी गणपती उत्सव वाढविण्याची कल्पना निघाली असा टिळकचरित्रात उल्लेख आहे. ‘यंदा येथे गणपती पोचविण्याचा समारंभ सालाबादपेक्षा निराळ्या तर्‍हेने होऊन त्यास बरेच सार्वजनिक स्वरूप आले आहे’ असे त्या सालच्या ‘केसरी’च्या अंकातील वाक्य हेच या उत्सवाचे उगमस्थान मानले जाते.

त्याकाळी सार्वजनिक गणेशोत्सव हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जात होता. राष्ट्रीय भावनेने हा उत्सव साजरा केला जावा हा त्यामागील उद्देश होता. यासंदर्भात ‘राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता’, ‘राष्ट्रीय महोत्सवाचे वेळी सुशिक्षितांनी काय केले पाहिजे’ इत्यादी लेखही ‘केसरी’मधून प्रसिद्ध झाले होते.

अन् नवचैतन्य निर्माण झाले

लोकमान्य टिळकांच्या आवाहनानुसार अशा सार्वजनिक गणेशोत्सवात तरुणांचे ‘मेळे’ भाग घेऊ लागले. या मेळ्यांसाठी काही कवी पदे लिहून देत असत. अशा पदांनी मराठीतील राष्ट्रीय कवितांमध्ये भर घातलेली आहे. या मेळ्यांना काव्य या दृष्टीने कुणी मोल देत नसतीलही, पण टिळकांच्याच नव्हे तर इतरही चळवळींचा इतिहास म्हणून या मेळ्यांकडे पाहावे लागेल.

‘मेळे’ लिहिणार्‍या कवींचे टिळक हे स्फूर्तिस्थान होते. लोकांमध्ये पारतंत्र्याची चीड निर्माण करण्यासाठी काही कवींनी स्वराज्याच्या इतिहासावरून मेळे व पोवाडे लिहिले. शिवाजी, बाजी, महादजी, लक्ष्मीबाई इत्यादींवरील त्यांच्या काव्याला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला. थंडावलेल्या गोळ्यासारख्या समाजात नवचैतन्य निर्माण करणे हा राष्ट्रीय उत्सव सुरू करण्यामागील उद्देश होता. राष्ट्रवादी कवींनी स्वतंत्रतेची उर्जःस्वल गीते गाऊन हा उद्देश सफल केला.

स्वराज्य आले! सुराज्य कोठे?

आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे अथवा पोवाडे यांवर कार्यक्रम व्हावेत, असे कुणी म्हणणार नाही. पण गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्रीय भावना जागृत करणारे उपक्रम का राबवू नयेत? स्वराज्य हा टिळकांचा जन्मसिद्ध हक्क होता. तो मिळविण्यासाठी त्यांचा अटोकाट प्रयत्न चाललेला होता. लोकांमध्ये पारतंत्र्याची घृणा उत्पन्न केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. सार्वजनिक गणेशोत्सव हे एक निमित्त होते. या निमित्ताने टिळकांना लोकांमध्ये स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करावयाचे होते. जनजागरण हा या उत्सवामागील एकमेव हेतू होता. पुढे स्वराज्य मिळाले. टिळकांनी बाहेर आणलेला गणपतीही तिथेच राहिला. स्वराज्य मिळाले पण सुराज्य कुठे आहे? स्वराज्यासमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत. गेल्या काही वर्षांत तर अनेक अपप्रवृत्ती उफाळून वर येत आहेत. अशा परिस्थितीत टिळकांच्या गणेशोत्सवाचा ‘प्रबोधन’ हा आत्मा हरवता कामा नये. या गणेशोत्सवाचे ‘सुराज्य’ हेच एक उद्दिष्ट बनले पाहिजे. मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायला हवेत, पण मनोरंजनाबरोबरच प्रबोधनदेखील होण्याची गरज आहे.

गोव्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये सुरुवातीच्या काळात दर्जेदार कार्यक्रम सादर होत असत. व्याख्याने, परिसंवाद, सुगमसंगीत, पुण्या-मुंबईकडील दर्जेदार नाटके असा एकंदर या उत्सवाचा थाटमाट होता. त्यामुळे आसपासचे लोक अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायचे. काही गणेशोत्सवांमध्ये ‘अभिरूप न्यायालय’ यासारख्या कार्यक्रमांना विलक्षण दाद मिळत होती. पूर्वी पावसाळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची वानवाच होती. आता वर्षभर अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे खरे तर कार्यक्रमांची निवड करणे हे गणेशोत्सव मंडळांपुढील आव्हान असायला हवे. गर्दी खेचणारे आणि त्याचबरोबर गर्दीला आव्हान करणारे कार्यक्रम आज कुठे आहेत? गणेशोत्सवात एखाद-दुसरा (पुण्या-मुंबईकडील) ‘ऑर्केस्ट्रा’ ठेवला म्हणून कुणी हरकत घेणार नाही. पण नुसते ऑर्केस्ट्रा, सुमार दर्जाची नाटके, सत्यनारायण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव नव्हे. अशा उत्सवांमधून नवीन गायक, नवीन वक्ते, कथाकथनकार उदयास आले पाहिजेत. त्यासाठी कार्यक्रमांची अशी आखणी व्हायला हवी की ज्यातून भोवतालच्या विद्यार्थ्यांमधील संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी कलागुणांना वाव मिळेल. काही गणेशोत्सव मंडळे अशा तर्‍हेचा प्रयत्न करताना दिसतात, हेही नसे थोडके!

विद्यार्थी दत्तक घ्या!

अनेक ठिकाणी परिसरातील शाळांमधून शालान्त परीक्षेत उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बोलावून बक्षिसे दिली जातात. हुशार विद्यार्थ्यांचे सार्वजनिक ठिकाणी कौतुक करावेच, पण त्याचबरोबर हलाखीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांचाही आता शोध घ्यायला हवा. विद्यार्थ्यांना आता माध्यान्ह आहार, लॅपटॉप, बालरथ इत्यादी योजनांचा लाभ मिळत आहे. इंग्रजी प्राथमिक शाळांनाही अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शिक्षणापासून आता कुणी वंचित होणार नाही, असा आपण समज करून घेऊ नये. आजही अनेक विद्यार्थी आपले शिक्षण अर्धवट सोडून देतात. काही होतकरू मुलांना आवड असूनही कलेचे शिक्षण घेता येत नाही. गणेशोत्सव मंडळांनी अशा मुलांच्या पंखांना बळ द्यायला हवे. हुशार विद्यार्थी वरच्या वर्गात जातीलच, पण परिस्थितीपुढे हतबल झालेल्या गरीब विद्यार्थ्यांचे काय?

पर्यावरणविषयक उपक्रम हवेत

गणेशोत्सव मंडळांनी परिस्थितीनुसार कार्यक्रमांमध्ये बदल केले पाहिजेत. त्यात नवनवीन उपक्रमांची भर घातली पाहिजे. सध्या पर्यावरणविषयक काही उपक्रम राबविता येतील. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात जल व ध्वनी प्रदूषण होत असते. याबाबत सार्वजनिक गणेशोत्सवात पथनाट्ये, पोस्टर स्पर्धा व प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करता येतील. यावेळी भडक रंगांच्या दुष्परिणामांचीही जाणीव करून देता येईल. भडक रंगातील मूलद्रव्ये पाण्यातून शरीरात जाऊन काही अवयवांवर कसा परिणाम करू शकतात, देखाव्यासाठी वापरण्यात येणार्‍या प्लॅस्टिक व थर्माकोलमुळे कशी हानी होते, इत्यादींविषयी आता गणेशोत्सव मंडळांनीच जागृती करायला हवी. आजची गणेशोत्सव मंडळे प्रदूषणाचे आव्हान स्वीकारतील काय?

वाचनसंस्कृती रुजविण्याचे प्रयत्न

गणेशोत्सव मंडळांना खूप काही करता येण्याजोगे आहे. टिळकांच्या ‘श्रीगणपत्युत्सवां’मधील ‘मेळ्यां’मुळे अनेक कवी निर्माण झाले. त्यातील काही कवी ‘ट’ला ‘ट’ लावणारे होते, अशी टीका त्याकाळीही झाली. हौसेपोटी काहीजण कशाही कविता लिहीत होते खरे, पण कवींप्रमाणे अनेक दर्जाचे श्रोतेदेखील असतात. ते चांगले तेवढे घेत असतात. सार्वजनिक गणेशोत्सवात दर्जेदार श्रोत्यांकडून दाद मिळाल्यामुळे काहीजण कवी म्हणून पुढे नावारूपास आले. आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांत काव्यगायनाचे कार्यक्रम होताना दिसत नाहीत. अशा ठिकाणी कविसंमेलनांना फारसा प्रतिसादही मिळणार नाही. गणेशोत्सव मंडळांनी विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन वा काव्यगायन स्पर्धा ठेवाव्यात. तसेच त्यांच्यामध्ये काव्यविषयक गोडी निर्माण होईल असे उपक्रमही राबवावेत. वाचनसंस्कृती लोप पावत चालल्यामुळे गणेशोत्सवातील वाङ्‌मयीन कार्यक्रमांना फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळे प्रगल्भ वाचनसंस्कृती रुजविणे ही केवळ वाङ्‌मयीन संस्थांचीच नव्हे तर गणेशोत्सवादी मंडळांची जबाबदारी आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून टिळक थांबले नाहीत तर ‘केसरी’मधून त्यांचे लिखाणही चालू होते. त्यावेळचे लोक कार्यक्रमांना हजेरी लावीत असत आणि टिळकांचे लिखाणही वाचीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रंथांनी माणसे घडवलेली आहेत. ग्रंथसमूह हे समाजसुख आहे, असे इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटले होते. ‘ग्रंथ वाचल्याने मनुष्य विचार करू लागतो, विचारांचा खल झाल्यावर आचार बनतात व नंतर समाजाचे पाऊल पुढे पडते’ असे त्यांचे म्हणणे होते. आज सामाजिक व राजकीय क्षेत्रात जे काही चालले आहे ते हितावह नाही. लोकांमध्ये आता दर्जेदार ग्रंथांची अभिरुची रुजविण्याची गरज आहे. यादृष्टीने गणेशोत्सव मंडळाला ‘वाचनसंस्कृती अभियान’ सुरू करता येईल.

व्याख्याने कोठे गेली?

गणेशोत्सव मंडळांतूनच नव्हे तर एकूणच सार्वजनिक जीवनातून हद्दपार होत असलेल्या मराठी व्याख्यानमाला ही एक चिंतेची बाब आहे. व्याख्यानमाला सोडाच, निदान यावर्षी एखादे व्याख्यान ठेवून मंडळांना खंडित होऊ पाहणारी व्याख्यानांची परंपरा सुरू ठेवता येईल. लोकांमध्ये व्याख्यानांची आवड निर्माण होईल अशाच विषयांवर- सुरुवातीच्या काळात- व्याख्याने ठेवावीत. गोव्यात काही व्याख्याते आहेत. शिवाय नवीन व्याख्याते तयार करण्याचे काम गणेशोत्सवादी मंडळांवाचून कोण बरे करील?

जनसेवा हीच ईश्‍वरसेवा

गणेशोत्सव मंडळांना लोकांकडून देणग्या मिळतात पण त्यातून खर्च भरून येत नाही. मंडळांना मंडप, मूर्ती, मनोरंजनाचे कार्यक्रम, रोशणाई इत्यादींवर भरपूर खर्च करावा लागतो. आज गोव्यात अनेक बेकायदेशीर उद्योग चालले आहेत. मंडळांचे देवभक्त कार्यकर्ते अशा उद्योगातून मिळविलेल्या पैशातून देवकार्य करणार नाहीत असे म्हणूया. त्यामुळे त्यांना सोडतीचा आधार घ्यावा लागतो. सोडतींवर आता मोठमोठी बक्षिसे लावली जातात. त्यामुळे सोडत शंभर रुपयांची असो वा हजार रुपयांची, लोक ती विकत घेतात. त्यामुळे गणेशमंडळांकडे पुरेसा निधी जमलेला असतो. त्या उपक्रमांमधून गणेशोत्सव मंडळांना काही सामाजिक उपक्रम हाती घेता येतील. एखाद्या मंडळाने वह्यावाटप सुरू केले म्हणून इतरांनीही वह्या वाटत का सुटावे? शिवाय पहिली सहामाही परीक्षा जवळ आली. आता वह्यांची फारशी गरज नाही. गरज आहे नावीन्यपूर्ण उपक्रमांची! टिळक- आगरकरांच्या पत्रकारितेची परंपरा चालविणार्‍या गोव्यातील पत्रकार भारतकार हेगडे-देसाईंच्या एका अग्रलेखाचे याठिकाणी स्मरण होते. गोव्यातील देवळांतून जमा होणारा पैसा लोकोपयोगी व राष्ट्रोपयोगी कामासाठी लावला पाहिजे, असा विचार त्यांनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. ते म्हणतात- ‘नुसते तीळ-तांदूळ जाळून अगर मोठमोठे उत्सव करण्यापेक्षा या जनरूपी देवाकडे त्या पैशांचा विनियोग केल्यास खरी ईश्‍वरसेवा केल्यासारखे होईल. देवाकरिता मनुष्ये नसून, मनुष्यांकरिताच देवाचे अस्तित्व आहे.’ गणेशोत्सवातून जमा होणार्‍या निधीतून अपघातग्रस्त बालकांना आर्थिक मदत, सार्वजनिक ठिकाणी पाणपोई, वाचनकेंद्र असे कितीतरी उपक्रम हाती घेता येतील. गरज आहे ती सेवाभावी कार्यकर्त्यांची!

आज काही सार्वजनिक संस्थांचे कार्य ठप्प होत चालले आहे आणि याचे कारण म्हणजे कार्यकर्त्यांची कमतरता. काही संस्थांची अनुदानसंस्कृतीमुळेही वाट लागलेली आहे. आता संस्था अनुदानावर विसंबून राहू लागलेल्या आहेत, कार्यकर्त्यांवर नव्हे! असे असतानाही दरवर्षी नवनवीन गणेश मंडळे कशी स्थापन होत आहेत? मंडळांना कार्यकर्ते कोठून मिळत आहेत? मुळात यांना नवीन मंडळ स्थापन का करावेसे वाटते? सार्वजनिक गणपती हा माणसांना जोडणारा उत्सव आहे, मग एखादा कार्यकर्ता एखाद्या मंडळातून बाहेर पडून नवीन मंडळ का स्थापन करतो? काही सोडतींवर लोक शंका का घेतात? यावर्षी तर एका मंडळाच्या निधीवरून मोठा गहजब झाला. गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये- पुण्या-मुंबईकडील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मानाने- अपप्रवृत्ती घुसलेल्या नाहीत. (वर्तमानपत्रातून तरी वाचायला मिळत नाहीत!) नजीकच्या काळात त्या घुसू शकतील असा इशारा द्यावासा वाटतो. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दक्ष राहायला हवे.

टिळकांनी घरातील गणपती रस्त्यात आणला याचे कारण त्यांना लोकसंग्रह करावयाचा होता अन् लोकांचे नाते राष्ट्राशी जोडावयाचे होते. त्यामुळे सार्वजनिक गणपती उत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आहे याचेही भान या कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे. माणूस जोडला तर राष्ट्र जोडले जाईल हे टिळकांना ठाऊक होते. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवात (धन जोडणारे नव्हे तर-) माणूस जोडणारे कार्यक्रम ठेवले तर राष्ट्र जोडण्यास थोडाफार हातभार लागेल.