सात सुवर्णांसह भारताची बाजी

0
131

हरमीत देसाई व अयहिका मुखर्जी यांनी २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. देसाईने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या जी. साथियान याचा ४-३ (९-११, ६-११, ११-५, ११-८, १७-१५, ७-११, ११-९) असा पराभव केला. ०-२ अशा पिछाडीनंतर हरमीतने जोरदार पुनरागमन करताना सात सेटपर्यंत चाललेला हा सामना आपल्या नावे केला. भारताने या स्पर्धेत ७ सुवर्ण, ५ रौप्य, ३ कांस्यपदकांसह प्रथम क्रमांक मिळविला. इंग्लंड (२ रौप्य, ३ कांस्य) दुसर्‍या तर सिंगापूर (६ कांस्य) तिसर्‍या स्थानी राहिला.

मलेशिया व नायजेरिया यांनी प्रत्येकी १ कांस्यपदक जिंकले. तत्पूर्वी, अँथनी अमलराज व मानव ठक्कर यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावताना अव्वल मानांकित साथियान व शरथ कमल यांना ३-१ (८-११, ११-६, १३-११, १२-१०) असा धक्का दिला. महिला एकेरीत मुखर्जीने आपले पहिले अजिंक्यपद पटकावताना माजी राष्ट्रीय विजेत्या मधुरिका पाटकरला ४-० (११-६, ११-४, ११-९, १९-१७) असे गारद केले. पूजा सहस्रबुद्धे व कृत्विका सिन्हा रॉय यांनी श्रीजा अकुला व मौसमी पॉल यांचा प्रतिकार ३-१ (११-९, ११-८, ९-११, १२-१०) असा मोडून काढत महिला दुहेरीत बाजी मारली.