सात्विक-अश्‍विनीचा विजयारंभ

0
89

भारताची मिश्र दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल मंगळवारी विजय प्राप्त करून मिश्र दुहेरी प्रकाराच्या ‘अंतिम ३२’मध्ये प्रवेश केला. भारतीय जोडीने पहिल्या फेरीच्या लढतीत गर्नसेच्या स्टुअर्ट हार्डी व क्लोए टिसिएर यांच्यावर मात केली. जागतिक क्रमवारीत ५७व्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने केवळ २० मिनिटांत २१-९, २१-५ असा विजय मिळविला. पहिला गेम १० मिनिटांत जिंकल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये १०-१ अशी मोठी आघाडी भारतीय जोडीने घेतली.

यानंतर स्टुअर्ट-क्लोए यांनी काही गुण घेतले परंतु, पहिल्या गेमपेक्षा जास्त गुण त्यांना घेता आले नाहीत. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारतीय जोडीला आज लेन बेन व पुघ जेसिका या इंग्लंडच्या जोडीविरुद्ध खेळावे लागणार आहे. बॅडमिंटनच्या एकेरीतील सामन्यांना आजपासून प्रारंभ होत असून महिला एकेरीत सायना वि. एल्सी डेव्हिस (द. आफ्रिका), पी.व्ही. सिंधू वि. आंद्रा व्हाईटसाईड (फिजी), रुत्विका गड्डे वि. ग्रेस अटिपाका (घाना) यांचे सामने होतील. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत वि. आतिश लुबा (मॉरिशस), एच.एस.प्रणॉय वि. ख्रिस्तोफर जॉन पॉल (मॉरिशस) असे सामने रंगतील. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी आपल्या मोहिमेची सुरुवात फिजीच्या मॉलिया बर्टी व कॅरन गिब्सन यांच्याविरुद्धच्या सामन्याने करतील.