वास्को (न. प्र.)
यंदाच्या सागरी पर्यटन हंगामाला काल दि. ११ रोजीपासून सुरूवात झाली असून २०१८-१९ या सागरी पर्यटन हंगामातील पहिले पर्यटक जहाज ‘बॉटिक्का’ मुरगाव बंदरात दाखल झाले. यंदाच्या पर्यटन हंगामाला दि. ४ ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली होती. तर सागरी पर्यटन हंगामातील सदर पहिले जहाज मुंबईमार्गे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाले. यात अमेरिका राष्ट्रीयत्वाचे ४९६ पर्यटक, फिलीपाईन्स (२५३), भारतीय (१७), इंडोनेशिया (२४), अमेरिका (३३), थायलंड (३०) आदी राष्ट्रातील पर्यटक म्हणून या जहाजावरील ३८८ कर्मचारी वर्ग मिळून एकूण ९०० देशी विदेशी पर्यटक या जहाजातून गोव्यात दाखल झाले. या जहाजाचे मेसर्स ट्रेल ब्लेजर टूर्स संयोजक असून त्यांच्या व्यवस्थापनाखाली या जहाजातील पर्यटकांनी गोवा, भ्रमंतीसाठी विविध पर्यटक गाड्यामधून कुच केली. दरम्यान मुंबईमार्गे गोव्यात दाखल झालेले हे जहाज काल मुरगाव बंदरात वास्तव्यास राहिले. तर आज संध्याकाळी हेच जहाज न्यू पोर्ट कोचीनला रवाना होणार आहे.
या पर्यटकांचे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी वर्ग, एमपीटी अधिकारी तसेच या जहाजाचे प्रायोजक जे एम बक्सी यांनी पर्यटकांना गुलाब पुष्प भेटवस्तू तसेच बँण्ड वादनासह दिमाखात केले. क्रुझबर्थवर इमीग्रेशनद्वारे ईलेन्डींग कार्डची छाननी केल्यानंतर पर्यटकांनी गोवा भ्रमंती केली.
पहिल्या टप्प्याची डिसेंबरमध्ये सांगता
दरम्यान सागरी पर्यटन हंगामातील पहिल्या टप्प्यातील हे पहिले जहाज असून या पर्यटन हंगामाच्या पहिल्या टप्प्याची सांगता २६ डिसेंबर रोजी ‘सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन’ या जहाजाद्वारे होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ९ पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. या ९ जहाजातून एकूण १९, ३१८ देशी विदेशी पर्यटक पहिल्या गोव्यात दाखल होणार आहेत. यात १३, ९५० प्रवासी तर ५३६९ कर्मचारी वर्गाचा समावेश असेल. तसेच पर्यटक जहाजांच्या दुसर्या टप्प्यात एकूण २६ पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार असून याची सुरुवात ३ जानेवारी २०१९ या दिवशी ‘कॉस्ता नियोरिवेरा’ या जहाजाद्वारे होणार आहे. तर या सागरी पर्यटन हंगामाची सांगता ८ मे २०१९ रोजी ‘ईनसीग्नीया’ या पर्यटन जहाजाद्वारे होणार आहे.