हसवणार्‍या कलाकारांना थांबवू नका : श्रीवास्तव

0
125
पत्रकार परिषदेत बोलताना राजू श्रीवास्तव. सोबत मान्यवर.

पणजी (सां. प्र.)
स्टॅण्डअप कॉमेडी करणारे बरेच कलाकार सिनेअभियंनेत्यांपेक्षा लोकप्रिय झाले आहेत तेव्हा त्यांना चित्रपट करायची आवश्यकता वाटत नाही. अमेरिकासारख्या देशात स्टॅडअप कॉमेडी करणार्‍यांना चित्रपटात वाव असून त्यांना चित्रपट करायला वेळ नसतो. असे सांगत आजच्या घडीचे लोकप्रिय विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हसवणार्‍या कलाकारांना थांबवू नका असे आवाहन केले.
‘स्वस्तिक’च्या चतुरंग बहुभाषिक नाट्य महोत्सवात राजू श्रीवास्तव यांचा आज दि. १२ रोजी उद्घाटनादिवशी सायंकाळी ६.३० वा. कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात ‘हिंदी स्टॅण्डअप कॉमेडी’ प्रयोग होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी काल येथे पत्रकारांशी संवाद साधला. बॉलीवूडच्या चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात तसेच टीव्हीवरील लाफ्टर शोमध्ये विनोदी कार्यक्रम करून अफाट लोकप्रियता मिळविलेले राजू श्रीवास्तव म्हणाले की, हसवणार्‍या कलाकारांना थांबवू नका. आपल्या देशात जास्तीत जास्त कॉमेडियन निर्माण झाले तर स्पर्धा निर्माण होईल. कॉमेडीचा दर्जा सुधारेल.
आव्हान नेहमीच स्वीकारायला हवे असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, गोविंदापासून सुरू झालेला कॉमेडीचा प्रवास, राजपाल, जॉनी लिव्हर यांनी लोकप्रिय केला. बॉम्बे टू गोवा, प्रेम की दिवानी अशा चित्रपटांतून छोट्या भूमिका केल्या व त्यापेक्षा अशा शोमधून मला जास्त लोकप्रियता मिळाली कारण इथे स्वतंत्रपणे मी एकटाच करत असल्याने थेट प्रेक्षकांना सामोरा जातो. चित्रपटात बारीकसारिक कितीतरी भूमिका असतात, मात्र लक्ष कुठे जाते तर स्टॅडअप कॉमेडीकडे.
मी राजकारणात सक्रीय नाही. ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘बेटी पढाव बेटी बचाव’ या समाजाभिमुख जागृती कार्यक्रमांसाठी मात्र मी कार्यक्रम करतो, असे संबंधित प्रश्‍नावर स्पष्ट करून राजू श्रीवास्तव यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गोव्यात दोन वेळा व दिल्लीत तीन-चार वेळा भेटण्याची संधी मिळाली. मात्र मुख्यमंत्र्यांकडे बोलतोय असे कधी वाटले नाही असे सांगितले. या पत्रकार परिषदेला स्वस्तिकचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर, सदस्य विनयकुमार मंत्रवादी, राधाकृष्ण मालवणकर, मुर्गेश रमण, ९२.७ बिग एफएमच्या नम्रता हे उपस्थित होते.
चतुरंग महोत्सव
दि. १३ रोजी दुपारी ३.३० वा. मुक्ता बर्वे व दिनेश पेडणेकर प्रस्तुत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या मैत्रीवर आधारलेले चॅलेंज हे प्रभावी नाटक सादर होणार आहे. दि. १३ रोजी संध्याकाळी ७.३० वा. आजच्या तरूणाईला आवडणारा लोकप्रिय इंग्लिश स्टॅडअप कॉमेडी हा प्रयोग सादर होणार आहे. या प्रयोगात आजचे आघाडीचे हास्य कलाकार सौरभ पंत व अनिरबन दासगुप्ता हे सहभागी आहेत. दि. १४ रोजी सकाळी ११ वा. भद्रकाली प्रॉडक्शनचे मच्छिद्र कांबळी यांनी गाजवलेले व विक्रमी ५००० प्रयोग झालेले सदाबहार मालवणी विनोदी नाटक वस्त्रहरण सादर होणार आहे. दुपारी ३.३० वा. यंदाचे सर्वाधिक ३७ पुरस्कार विजेते सर्वोत्कृष्ट संगीत नाटक देवबाभळी सादर होणार आहे. या महोत्सवाची सांगता प्रसिद्ध कलाकार भरत दाभोळकर दिग्दर्शित दॅट्‌स माय गर्ल या इंग्रजी नाटकाने होणार आहे. या नाट्यमहोत्सवाची तिकिटे कांपाल येथील पेस्ट्री कॉटेजमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बुक माय शो या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिटे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ७७१९९६२४५२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.