सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा

0
161
सत्तरी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळात एका घरावर पडलेले झाड.

वाळपई (न. प्र.)
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सत्तरी तालुक्यातील मलपण, असोडे, शेळ, आंबेली व इतर गावांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसून कृषीबागायती बरोबरच घरांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. नुकसानाचा आकडा जवळपास दहा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गवाणे येथील शरद जोशी यांच्या घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे वाळपई ते मोले मार्गावर ठिकठिकाणी झाडे पडल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झाला असून वाळपईच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेकरवी रस्ता मोकळा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे वाळपई – मोले दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक वाहने अडकून पडल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्याच आठवड्यात सत्तरी तालुक्यातील गुळेली पंचायत क्षेत्रामधील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसून जवळपास चाळीस लाखांची नुकसान झाल्याची बाब ताजी असतानाच आता पुन्हा एकदा याच पंचायत क्षेत्रातील जवळच्या गावांना चक्रीवादळाचा फटका बसल्याने भागातील कृषी उत्पादकांसमोर गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की कालच्या सप्ताहातील शुक्रवारी संध्याकाळी गुळेली पंचायत शेत्रातील धडा शेळ मेळावली आदी भागांमध्ये चक्रीवादळाचा फटका बसून जवळपास चाळीस लाखांची हानी झालेली आहे. यात मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनाचे व अनेक घरांची पडझड झाल्याने सदर भागातील नागरिक पूर्णपणे हतबल झालेले आहेत .सध्या कृषी खात्यातर्फे सदर भागातील कृषी नुकसानीचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून सत्तरी तालुक्याच्या मामलेदार कार्यालयाच्यावतीने घरांची पडझड व इतर स्वरूपाच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे. सदर बाब ताजी असतानाच आज बुधवार संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गुळेली पंचायत क्षेत्रानजीक ठिकाणी असलेल्या खोतोडा पंचायत शेत्रातील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. जवळपास अर्धा तास झालेल्या चक्रीवादळाने लाखो रुपयांची नुकसानी झाली असून नुकसानीचा आकडा निश्चितपणे सांगता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून काही घरांचे छप्पर उडून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली.
गव्हाणे येथील शरद जोशी यांच्या घराचे सर्वात जास्त प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्या घराचे छप्पर उडून गेले आहे. त्यामुळे त्यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसापासून सत्तरी तालुक्यात संध्याकाळी रोज पावसाची सर सुरू असते तर दोन दिवसापासून तालुक्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा व चक्रीवादळाचा फटका बसत आहे. शहरापासून जवळपास १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खोतोडा पंचायत क्षेत्रातील गवाणे, मलपण, असोडे, शिरसोडी, शेळपे आदी भागांनाही चक्रीवादळाचा फटका बसला. या भागात मोठ्या प्रमाणात बागायती असून या चक्रीवादळामुळे बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही जणांच्या घरावर झाडे पडल्याने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडल्याने रस्ता मोकळा होईपर्यंत अग्निशामक दलाच्या यंत्रणेला घराच्या पडझडीसंदर्भात काम हाती घेता आले नाही. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान रस्ता मोकळा करण्याच्या कामास युद्धपातळीवर गुंतल्याचे समजते. दरम्यान वाळपई व मोले आदी भागातील रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला असून दोन्ही बाजूची वाहतूक रात्री उशिरापर्यंत अडकून पडली होती.