Home Featured साखळीतील 80 हजार चौ. मी.जमिनीची भूरुपांतरे तातडीने रद्द

साखळीतील 80 हजार चौ. मी.जमिनीची भूरुपांतरे तातडीने रद्द

0

नगरनियोजन खात्याच्या कलम 39 अ च्या साहाय्याने साखळी मतदारसंघातील सुमारे 80,926 चौरस मीटर जमीन रुपांतराचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथे मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यानंतर रात्री नगरनियोजन खात्याने आदेश काढत 80 हजार चौ. मी. जमीन रुपांतराचा प्रस्ताव रद्द केले.

साखळी मतदारसंघातील सुमारे 80,926 चौरस मीटर जमीन टीसीपीच्या कलम 39 अ अंतर्गत रूपांतरित करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. यासंबंधीची एक नोटीस टीसीपी खात्याने जारी केली आहे. नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी साखळीतील जमीन रुपांतराच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. या जमीन रुपांतराच्या प्रस्तावाला देण्यात आलेल्या तात्पुरती मंजुरी मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. सदर जमीन एक दरी असून, तिचे रूपांतरण करू नये, असा निर्देश देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अन्य काही निर्णयांना मंजुरी
माशेल बस स्थानकातील तिवरे वरगाव पंचायतीचे भाडे माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाकडून पशुखाद्य खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही खरेदी शासन-ते-शासन तत्त्वावर केली जाईल. त्यामुळे राज्यात पशुखाद्याचा पुरवठा आणि उपलब्धता सुरळीत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीनंतर राज्य
मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरणार

फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेली जागा भरण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘माझे घर’ योजनेला 1 वर्ष मुदतवाढ
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझे घर योजनेसाठी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सरकारी, कोमुनिदाद, खासगी जागेतील बेकायदा घरे नियमित करण्यासाठी माझे घर योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची मुदत मार्च 2026 मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे माझे घर योजनेला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.