>> सांताक्रुझ, कुडका, बांबोळीला अजूनही पाण्याची प्रतीक्षा
>> कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे संकट
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणार्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कालापूर – सांताक्रुझ येथे प्रमुख जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या बांबोळी, कुडका, सांताक्रुझ आदी भागातील लोकांचे पाण्याविना अनंत हाल झाले. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी रुद्रावतार धारण करत ठेकेदार व पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
केरये – खांडेपार येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर बांबोळी, कुडका व इतर भागातील नागरिक नळाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, कालापूर येथे जलवाहिनी फुटल्याने आठव्या दिवशीही त्यांना पाणीपुरवठा झाला नाही. ही जलवाहिनी फुटल्याने बांबोळी, कुडका, सांताक्रुझ (भाग) या भागातील पाणी पुरवठ्यावर विपरीत परिमाण झाला आहे. स्थानिक आमदार आंतोनियो फर्नांडिस यांनी फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी करून ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला आहे.
जलवाहिनीची दुरुस्ती सुरू
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे कालापूर येथे जलवाहिनी फुटल्याचे आढळून आले आहे. ही जलवाहिनी सहा मीटर खोल असल्याने खोदकाम करून जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्ता पार्सेकर यांनी दिली.
बांबोळी, कुडका, सांताक्रुझ या भागात गेले सात दिवस पाण्याचा पुरवठा बंद होता. बुधवारी केरये – खांडेपार य्ेथील जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर बांबोळी, कुडका, सांताक्रुझ आदी भागातील नागरिक गुरूवारी नळाद्वारे पाणी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून होते. तथापि, गुरूवारी सकाळी कालापूर येथे जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असल्याचे नागरिकांना आढळून आले. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलला योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे.
कालापूर, सांताक्रुझ येथील महामार्गाचे काम करताना जलवाहिनी अन्यत्र न हटविता रस्ता रुंदीकरणाचे काम केले जात आहे. जलवाहिनी अन्य ठिकाणी घालण्यासाठी जागा संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी जलवाहिनी हटविण्याची गरज होती. जलवाहिनीवरच मातीचा भराव घालून रस्ता तयार केला जात असल्याने जलवाहिनी फुटली आहे.
कुंभारजुवा, माशेलात आज पाणीपुरवठा
कुंभारजुवा, माशेल या भागात पाण्याचा पुरवठा करणार्या ७५० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून मध्यरात्रीपासून जलवाहिनीतून हळूहळू पाणी सोडण्यात प्रारंभ केला जाणार आहे. कुंभारजुवा व इतर भागातील नागरिकांना शुक्रवारपासून नळाद्वारे पाणी पुरवठ्याला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्ता निवृत्ती पार्सेकर यांनी दिली. कुंभारजुवा, माशेल, बाणस्तारी आदी भागातील नळ गेले आठ दिवस कोरडे आहेत. या भागात टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा योग्य नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पणजीकरांना अखेर दिलासा
राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यात आठव्या दिवशी सकाळीपासून नळाद्वारे पाणी पुरवठ्याला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नळाद्वारे पाण्याचा पुरवठा कमी दाब आणि मर्यादित स्वरूपात करण्यात येत आहे. येत्या एक – दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. नळाद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने पणजी शहरातील विविध भागांना संध्याकाळपर्यंत नळाच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. नळाद्वारे सुरुवातीला गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता. पणजी शहरातील सांतइनेज, टोंक, करंजाळे आदी भागात सकाळच्या सत्रात पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. या भागात दुपारनंतर पाण्याचा पुरवठा होण्यास प्रारंभ झाला, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.