टीम इंडिया अडखळली

0
89

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानासाठी पावसामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला त्यावेळी टीम इंडिया ४ बाद १३४ अशी संघर्ष करत होती.

वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले.
मयंक अगरवाल, चेतेश्‍वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांना स्वस्तात माघारी पाठवून विंडीजने भारताची ३ बाद २५ अशी केविलवाणी स्थिती केली. राहुलने यानंतर अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी रचली. फलंदाजी करणे कठीण असताना राहुलने शानदार खेळ दाखवला. परंतु, ऑफ स्पिन गोलंदाज चेज याचा लेगसाईडला जाणार्‍या चेंडूची छेड काढण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट विंडीजला बहाल केली. रहाणेने यानंतर विहारीच्या साथीने संघाची धावसंख्या १३४ पर्यंत नेली आहे. रहाणेने या दरम्यान आपले १८वे कसोटी अर्धशतक झळकावताना ७ चौकार लगावले.

विंडीजचा संघ या सामन्यात चार स्पेशलिस्ट गोलंदाजासह उतरला. किमो पॉल दुखापतग्रस्त झाल्याने ऐनवेळी त्यांनी मिगेल कमिन्सला संघात घेतले. मधल्या फळीतील फलंदाज शमराह ब्रूक्स याला कसोटी पदार्पणाची संधी विंडीजने दिली. दुसरीकडे भारताने रवींद्र जडेजाच्या रुपात एकमेव फिरकीपटू उतरवला आहे. त्यामुळे अश्‍विन व कुलदीपला बाहेर बसावे लागले. वेगवान गोलंदाज उमेश यादव तसेच फलंदाज रोहित शर्मा यालादेखील संघात जागा मिळाली नाही.

धावफलक
भारत पहिला डाव ः लोकेश राहुल झे. होप गो. चेज ४४, मयंक अगरवाल झे. होप गो. रोच ५, चेतेश्‍वर पुजारा झे. होप गो. रोच २, विराट कोहली झे. ब्रूक्स गो. गेब्रियल ९, अजिंक्य रहाणे नाबाद ५०, हनुमा विहारी नाबाद १८, अवांतर ६, एकूण ४७.२ षटकांत ४ बाद १३४
गोलंदाजी ः किमार रोच ११-४-२४-२, शेन्नन गेब्रियल १०-२-३८-१, जेसन होल्डर १२-७-२१-०, मिगेल कमिन्स ७.२-०-२४-०, रॉस्टन चेज ७-१-२२-१